TEXT 30
sarve ’py ete yajña-vido
yajña-kṣapita-kalmaṣāḥ
yajña-śiṣṭāmṛta-bhujo
yānti brahma sanātanam
सर्वे-सर्व; अपि-वरकरणी भिन्न असले तरी; एते-हे सर्व; यज्ञ-विद:- यज्ञ करण्याचे प्रयोजन चांगल्या तर्हेने जाणणारे; यज्ञ-क्षपित-अशा प्रकारचे यज्ञकर्म केल्याने; कल्मषा:- पापकर्म; यज्ञ-शिष्ट-अशा यज्ञकर्मांचे फळ; अमृत-भुज:- ज्यांनी अमृताची चव घेतली आहे; यान्ति-प्राप्त करतात; ब्रह्म-ब्रह्म; सनातनम्-सनातन अस्तित्व.
यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणाणारे हे सर्व यज्ञकर्ते पापकर्मांतून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अवशिष्टरुपी अमृताची चव घेतल्यामुळे, ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात.
तात्पर्य: विविध प्रकारच्या यज्ञांच्या पूर्वोक्त वर्णनावरून (द्रव्ययज्ञ, वेदाध्ययन किंवा ज्ञानयज्ञ आणि योगयज्ञ) कळून येते की, इंद्रियसंयम करणे हाच या सर्वांचा मूळ उद्देश आहे. इंद्रियतृप्तीमुळेच मनुष्य भौतिक अस्तित्वात गुंतून राहतो. म्हणून जोपर्यंत तो इंद्रियतृप्तीविरहित स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो सच्चिदानंद स्तरापर्यंत उन्नत होऊ शकत नाही. हा स्तर म्हणजेच सनातन किंव ब्रह्मस्तर होय. वर सांगण्यात आलेले सर्व यज्ञ मनुष्याला भौतिक जीवनाच्या पापकर्मांतून शुद्ध होण्यास साहाय्यक होतात. जीवनातील या प्रगृतीमुळे मनुष्यजीवनात ऐश्वर्यवान आणि आनंदी होतो, इतकेच नव्हे तर अंतसमयी निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन किंवा भगवान श्रीकृष्णांचे सान्निध्य प्राप्त करून तो शाश्वत भगवद्धामात प्रवेश करतो.