No edit permissions for मराठी

TEXT 15

nādatte kasyacit pāpaṁ
na caiva sukṛtaṁ vibhuḥ
ajñānenāvṛtaṁ jñānaṁ
tena muhyanti jantavaḥ

-कधीच नाही; आदत्ते-स्वीकार करतात; कस्यचित्-कोणाचेही; पापम्-पाप; -नाही; -सुद्धा; एव-निश्‍चितच; सु-कृतम्-पुण्यकर्मे; विभु:- परमेश्‍वर किंवा भगवंत; अज्ञानेन-अज्ञानाद्वारे; आवृतम्-आवृत्त किंवा आच्छादित झालेले; ज्ञानम्-ज्ञान; तेन-त्यामुळे; मुह्यन्ति- मोहित होतात; जन्तव:- जीव.

तसेच भगवंत कोणाचेही पाप किंवा पुण्यकर्मे ग्रहण करीत नाहीत. तथापि, देहधारी जीव हे त्यांच्या वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या अज्ञानामुळे मोहित होतात.

तात्पर्य: संस्कृत शब्द विभु म्हणजेच अमर्यादित पूर्ण ज्ञान, ऐश्‍वर्य, बल, यश, सौंदर्य आणि वैराग्याने परिपूर्ण असणारे भगवंत होत. ते आत्माराम आहेत आणि पुण्य किंवा पापकर्मांनी कधीच विचलित होत नाहीत. ते कोणत्याही जीवासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण करीत नाहीत. परंतु अज्ञानाने मोहित झाल्यामुळे जीव विशिष्ट परिस्थितीत राहण्याची इच्छा करतो आणि याप्रमाणे त्याच्या कर्मांची आणि कर्मफलांची श्रृंखला सुरु होते. जीव हा पराप्रकृतीरूप असल्यामुळे ज्ञानमयी असतो, तरीही त्याची भक्ती मर्यादित असल्याकारणाने  तो अज्ञानाने प्रभावित होऊ शकतो. भगवंत सर्वशक्तिमान आहेत, पण जीव सर्वशक्तिमान नाही. भगवंत हे विभु किंवा सर्वज्ञ आहेत तर जीव हा अणुरुप आहे. जीव हा चेतन असल्यामुळे स्वतंत्र इच्छा करू शकतो. अशा इच्छेची पूर्तता मात्र सर्वशक्तिमान भगवंतांद्वारे केली जाते आणि म्हणून जेव्हा जीव आपल्यासाठी इच्छा करण्यामध्ये गोंधळून जातो तेव्हा भगवंत, जीवला त्याच्या इच्छा पूर्ण करण्याची मुभा देतात. परंतु जीवाने केलेल्या इच्छेमुळे विशिष्ट परिस्थितीरूप निर्माण होणार्‍या कर्मांना आणि कर्मफलांना भगवंत जबाबदार नसतात. यास्तव भ्रमित अवस्थेमधील देहधारी जवी, आनुषंगिक भौतिक देहाशी स्वत:चे तादात्म्य करतो आणि जीवनातील क्षणभंगुर सुखदु:खांच्या अधीन होतो. भगवंत हे परमात्मारुपाने जीवाचे नित्य सहचर आहेत आणि म्हणून ज्याप्रमाणे मनुष्य  फुलांच्या सान्निध्यात राहून फुलांचा सुगंध घेऊ शकतो त्याचप्रमाणे भगवंत प्रत्येक जीवाच्या इच्छा जाणू शकतात. इच्छा हे जीवाच्या बद्धावस्थेचे सूक्ष्मरूप आहे. भगवंत, जीवाच्या योग्यतेप्रमाणे त्याची इच्छा पूर्ण करतात. मनुष्य पुष्कळ योजना करतो आणि परमेश्वर त्या पूर्ण करतो असे नाही. म्हणून आपली इच्छा पूर्ण करण्याइतपत जीव शक्तिमान नाही. तथापि, भगवंत सर्व इच्छाची पूर्तता करू शकतात आणि सर्वांसाठी भगवंतांकडे समभाव असल्यामुळे ते सूक्ष्मरीत्या स्वतंत्र असणाऱ्या जीवांच्या इच्छांमध्ये व्यत्यय आणीत नाहीत. तरीही जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांच्या प्राप्तीची इच्छा करतो तेव्हा भगवंत त्याची विशेष काळजी घेतात आणि त्याला अशी इच्छा करण्यात प्रेरित करतात की, जेणेकरून जीव भगवत्प्राप्ती करू शकेल आणि नित्य आनंदी होऊ शकेल. म्हणून वैदिक मंत्र सांगतात की, एष उ ह्येव साधु कर्म कारयतितं यमेभ्यो लोकेभ्य उन्निनीषते, एष उ एवासाधु कर्म कारयति यमधो निनीषते- ‘‘भगवंत, जीवाला पुण्यकर्मांमध्ये कार्यरत करतात, जेणेकरून त्याची उन्नती होऊ शकेल आणि तेच जीवाला पापकर्मांमध्ये कार्यरत करतात, जेणेकरून तो नरकात जाईल.’’ (कौषीतकी उपनिषद् 3.8)

अज्ञो जन्तुरनीशोऽयमान्मन: सुखद:खयो।
ईश्वरप्रेरितो गच्छेत् स्वर्गं वाश्वभ्रमेव च॥

     ‘‘जीव आपल्या सुखदु:खांमध्ये पूर्णपणे अवलंबून आहे. ज्याप्रमाणे वायूद्वारे ढग ओढले जातात, त्याचप्रमाणे भगवंतांच्या इच्छेद्वारे जीव स्वर्ग किंवा नरकामध्ये जाऊ शकतो.’’

     म्हणून देहधारी जीवाची, कृष्णभावनेची उपेक्षा करण्याची अनादी कालापासून चालत आलेली इच्छाच त्याच्या भ्रमित होण्यास कारणीभूत होते. म्हणून स्वरुपत: जीव जरी सच्चिदानंद असला तरी त्याच्या सूक्ष्मत्वामुळे त्याला आपल्या भगवतसेवेच्या वास्तविक मूळ स्वरूपाचे विस्मरण होते आणि तो अज्ञानग्रस्त होतो. अज्ञानाच्या  प्रभावामुळे जीव म्हणतो की, भगवंत हेच आपल्या बद्धावस्थेस जबाबदार आहेत. वेदान्त सूत्रही (2.1.34) याला पुष्टी देते वैषम्य नैर्घृण्ये न सापेक्षत्वात् तथा हि दर्शयति- ‘‘ वास्तविकपणे भगवंत कोणाचा द्वेषही करीत नाहीत आणि कोणावर आसक्तीभावही ठेवीत नाहीत, केवळ वरकरणी असे दिसते.’’

« Previous Next »