TEXT 17
tad-buddhayas tad-ātmānas
tan-niṣṭhās tat-parāyaṇāḥ
gacchanty apunar-āvṛttiṁ
jñāna-nirdhūta-kalmaṣāḥ
तत्-बुद्धय:- ज्यांची बुद्धी सदैव भगवत्परायण असते; तत्-आत्मान:- ज्यांचे मन सदैव भगवत्परायण असते; तत्-निष्ठा:- ज्यांची निष्ठा केवळ भगवंतांकरिताच असते; तत्-परायणा:- ज्यांनी भगवंतांचा पूर्णपणे आश्रय घेतला आहे; गच्छन्ति-जाता; अपुन:- आवृत्तिम्-मुक्तीला; ज्ञान-ज्ञानाद्वारे; निर्धूत-धुऊन गेली आहेत; कल्मषा:- कल्मष किंवा दोष.
जेव्हा मनुष्याची बुद्धी, मन, निष्ठा आणि आश्रय हे सर्व भगवंतांवर स्थिर होते तेव्हा पूर्ण ज्ञानाद्वारे त्याची सर्व कल्मषे धुतली जातात आणि याप्रमाणे तो सहज मुक्तिपथावर अग्रेसर होतो.
तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण हे दिव्य, परम सत्य आहेत. श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्रीभगवान आहेत या उपदेशावरच संपूर्ण भगवद्गीता केंद्रित झाली आहे. सर्व वैदिक शास्त्रांचेही हेच मत आहे. ‘परतत्व’ म्हणजेच परम सत्य होय आणि तत्ववेत्ते या परतत्वालाच ब्रह्म, परमात्मा आणि भगवान म्हणून जाणतात. भगवान हेच सर्वोच्च परतत्व आहेत. भगवंतांहून अधिक दुसरे काहीही नाही. भगवान सांगतात की, मत्त: परतरं नान्यत् किञ्चिदस्ति धनञ्जय. निर्विशेष ब्रह्माचा आधारही श्रीकृष्णच आहेत. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम. म्हणून सर्व प्रकारे श्रीकृष्ण हेच परम सत्य आहेत. ज्याचे मन, बुद्धी, निष्ठा आणि आश्रय सदैव श्रीकृष्णांमध्ये स्थित आहेत किंवा दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, जो पूर्णपणे कृष्णभावनाभावित आहे, नि:संशय त्याची सर्व कल्मषे पूर्णपणे धुतली जातात आणि त्याला परम सत्याचे संपूर्ण ज्ञान होते. कृष्णभावनाभावित मनुष्य निश्चितपणे जाणतो की, श्रीकृष्णांमध्ये द्वैत (एकाच वेळी भेद आणि अभेद) आहे आणि अशा दिव्य ज्ञानाने युक्त झालेला मनुष्य मुक्तिपथावर उत्तरोत्तर प्रगती करू शकतो.