No edit permissions for मराठी

TEXT 26

kāma-krodha-vimuktānāṁ
yatīnāṁ yata-cetasām
abhito brahma-nirvāṇaṁ
vartate viditātmanām

काम-इच्छांपासून; क्रोध-आणि क्रोध; विमुक्तानाम्-जे मुक्त आहेत; यतीनाम्-संतांच्या; यत-चेतसाम्-ज्यांचे मनावर पूर्णपणे नियंत्रण आहे; अभित:- निकट भविष्यकाळात निश्चित केलेली असते; ब्रह्म-निर्वाणम्-ब्रह्मामध्ये मुक्ती; वर्तते-असते; विदित-आत्मनाम्-जे आत्साक्षात्कारी आहेत.

जे क्रोध आणि सर्व भौतिक इच्छांपासून मुक्त आहेत, आत्मसाक्षात्कारी, आत्मसंयमी आहेत आणि सतत पूर्णत्वाकरिता प्रयत्न करीत आहेत, त्यांना निकट भविष्यकाळात ब्रह्मामधील मुक्तीची निश्‍चिती असते.

तात्पर्य: मोक्षासाठी निरंतर प्रयत्न करणाऱ्या संतजनांमध्ये जो कृष्णभावनाभावित मनुष्य असतो तो सर्वोत्तम आहे. या वस्तुस्थितीची पुष्टी श्रीमद्भागवतात पुढीलप्रमाणे (4.22.39) करण्यात आली आहे.

यत्पादपंकजपलाशविलासभक्त्या
कर्माशयं ग्रथितमुदग्रथयन्ति सन्त:।
तद्वन्न रिक्तमतयो यतयोऽपि रूद्ध-
स्रोतोगणास्तमरणं भज वासुदेवम्॥

‘‘भक्तीपूर्ण सेवेद्वारे पुरुषोत्तम भगवान श्रीवासुदेव यांची भक्ती करण्याचा प्रयत्न कर. जे सकाम कर्माच्या तीव्र आणि सखोल इच्छांचे समूळ उच्चाटन करून भगवंतांच्या चरणकमलांची सेवा करण्याच्या दिव्य आनंदात युक्त झाले आहेत, त्यांनी जितक्या प्रभावीपणे इंद्रियवेग नियंत्रित केले आहेत, तितक्या प्रभावीपणे इंद्रियवेग नियंत्रित करण्याचे सामर्थ्य मोठमोठ्या ऋषींमध्येही नाही.’’

     बद्ध जीवामध्ये कर्मफलांचा उपभोग घेण्याची इच्छा इतक्या खोलवर मूळ धरून असते की, मोठमोठ्या ऋषींना महत् प्रयास करूनही अशा इच्छा नियंत्रित करणे अत्यंत कठीण असते. भगवद्भक्त हा कृष्णभावनाभावित भक्तीपूर्ण सेवेमध्ये सतत युक्त असल्यामुळे आणि आत्साक्षात्कारामध्ये परिपूर्ण असल्यामुळे त्याला ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती अत्यंत शीघ्र होते. आत्मसाक्षात्काराचे त्याला संपूर्ण ज्ञान असल्यामुळे तो सदैव समाधिस्थच असतो. यासाठी योग्य उदाहरण द्यावयाचे झाल्यास,

     दर्शनध्यानसंस्पर्शे: मत्स्यकूर्मविहंगमा:।
     स्वान्यपत्यानि पुष्णन्ति तथाहमपि पद्मज॥

     ‘‘दर्शन, ध्यान आणि स्पर्श यांद्वारे मासा, कास आणि पक्षी आपापली पिल्ले पोसतात.त्याचप्रमाणे हे पद्मजा मी देखील करतो.’’

     मत्स्य आपल्या संततीकडे केवळ पाहून त्यांचे पालनपोषण करतो. कासव केवळ ध्यानाद्वारे आपल्या संततीचे पालनपोषण करतो. कासवाची अंडी जमिनीवर घातली जातात आणि कासव पाण्यात असतानाच अंड्यावर ध्यान करतो. त्याचप्रमाणे कृष्णभावनायुक्त भक्त, जरी भगवद्धामापासून अत्यंत दूर असला तरी तो कृष्णभावनाभावित सेवेद्वारे, सतत केवळ त्यांचे स्मरण करून भगवद्धामात उन्नत होऊ शकतो. त्याला सांसारिक दु:खांची व्यथा भासत नाही आणि जीवनाच्या या अवस्थेलाच ‘ब्रह्म-निर्वाण’ म्हटले जाते, अर्थात सतत ब्रह्मामध्ये तल्लीन असल्यामुळे भौतिक दु:खे नाहीशी होतात.

« Previous Next »