No edit permissions for मराठी

TEXT 25

labhante brahma-nirvāṇam
ṛṣayaḥ kṣīṇa-kalmaṣāḥ
chinna-dvaidhā yatātmānaḥ
sarva-bhūta-hite ratāḥ

लभन्ते-प्राप्त करतात; बह्म-निर्वाणम्-ब्रह्मामधील मुक्ती; ऋषय:- जे अंतरातून सक्रिय असतात; क्षीण-कल्मषा:-जे सर्व कल्मषे किंवा पापांपासून मुक्त आहेत; छिन्न-छिन्न किंवा नष्ट झाल्यावर; द्वैधा:- द्वंद्व; यत-आत्मान:- आत्साक्षात्कारामध्ये युक्त; सर्व-भूत-सर्व जीवाच्या; हिते-हितामध्ये किंवा कल्याणार्थ; रता:- मग्न झालेला.

जे संशयापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वाच्या पलीकडे आहेत, ज्यांचे मन अंतरातच रममाण झाले आहे, जे सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये नेहमी व्यस्त असतात आणि जे सर्व पापांपासूनच मुक्त आहेत, ते ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती करतात.

तात्पर्य: पूर्णपणे कृष्णभावनाभावित असलेला मनुष्यच खऱ्या अर्थाने जीवाच्या कल्याणार्थ कार्य करू शकतो. श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींचे उद्गम आहेत याचे ज्ञान वास्तविकपणे जेव्हा मनुष्याला होते, तेव्हा त्या भावनेमध्ये तो जे कार्य करतो ते सर्वांच्या कल्याणार्थ असते. श्रीकृष्ण हे परमभोक्ता, सर्वश्रेष्ठ अधिपती आणि परममित्र आहेत या गोष्टींची विस्मृती ही मानवसमाजाच्या दु:खास कारणीभूत असते. म्हणून संपूर्ण मानवसमाजामध्ये या भावेनची पुनर्जागुती करणे हे सर्वोच्च कल्याणकारी कर्म आहे. ब्रह्मामध्ये मुक्ती प्राप्त झाल्यावाचून मनुष्य अशा प्रकारचे सर्वोत्तम कल्याणकारी कर्म करू शकत नाही. कृष्णभावनाभावित मनुष्याला श्रीकृष्णांच्या सर्वश्रेष्ठत्वाविषयी मुळीच संदेह नसतो कारण तो सर्व पापांतून पूर्णपणे मुक्त झालेला असतो. हीच दिव्य भवगत्प्रेमाची स्थिती आहे.

     मानवसमाजाच्या केवळ भौतिक कल्याणार्थ कार्यरत असणारा मनुष्य वस्तुत: कोणाचीही मदत करू शकत नाही. स्थूल शरीर आणि मन यांचा तात्पुरता दु:खपरिहार हा संतोषजनक नसतो. मनुष्याला, त्याच्या भगवंतांशी असणाऱ्या संबंधाची विस्मृती हीच त्याच्या जीवनाच्या कठीण संघर्षातील अडचणींचे वास्तविक कारण असते. जेव्हा मनुष्याला श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या संबंधाची पूर्णपणे जाणीव होते तेव्हा तो जरी भौतिक जंजाळात असला तरी तो मुक्त जीवच असतो.

« Previous Next »