TEXT 10
yogī yuñjīta satatam
ātmānaṁ rahasi sthitaḥ
ekākī yata-cittātmā
nirāśīr aparigrahaḥ
योगी-योगी; युञ्जीत-कृष्णभावनेत एकाग्र झाले पाहिजे; सततम्- सतत; आत्मनम्-स्वत: (शरीर, मन आणि आत्म्याद्वारे); रहसि- एकांतस्थळी; स्थित:- स्थित राहून; एकाकी-एकटा; यत-चित्त-आत्मा- मनामध्ये सतत सावध असणारा; निराशी:-इतर कोणत्याही गोष्टींद्वारे आकर्षित झाल्याविना; अपरिग्रह:- स्वामित्व किंवा संग्रहाच्या भावनेपासून मुक्त असलेला.
योगी व्यक्तींने नेहमी आपले शरीर, मन आणि आत्मा भगवंतांच्या ठायी युक्त केले पाहिजे. त्याने एकांतस्थळी एकटे राहावे आणि काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे. त्याने आकांक्षा आणि संग्रहाच्या किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजे.
तात्पर्य: श्रीकृष्णांचा साक्षात्कार, ब्रह्म, परमात्मा आणि पुरुषोत्तम श्री भगवान या तीन विविध रूपांमध्ये होतो. थोडक्यात, कृष्णभावना म्हणजे दिव्य प्रेममयी भगवत्सेवेमध्ये युक्त होणे होय, परंतु जे निर्विशेष ब्रह्म किंवा अंतर्यामी परमात्मा रुपावर आसक्त आहेत ते सुद्धा अंशत: कृष्णभावनाभावित असतात, कारण निर्विशेष ब्रह्म म्हणजे श्रीकृष्णांचेच आध्यात्मिक किरण आहेत आणि परमात्मा हे श्रीकृष्णांचे सर्वव्यापी आंशिक विस्तार -रुप आहे. याप्रमाणे निर्विशेषवादी आणि ध्यानयोगी हे सुद्धा अप्रत्यक्षपणे कृष्णभावनाभावित असतात. प्रत्यक्षपणे कृष्णभावनाभावित असणारा मनुष्य हा सर्वोत्तम योगी असतो. कारण अशा भक्ताला ब्रह्म आणि परमात्म्याचे ज्ञान असते. त्याला परम सत्याचे परिपूर्ण ज्ञान असते. तर निर्विशेषवादी आणि ध्यानवादी योगी हे पूर्णरुपाने कृष्णभावनाभावित नसतात.
तथापि, या सर्वांना, या ठिकाणी, आपल्या विशिष्ट प्रयत्नात सतत संलग्न राहण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून त्याना यथासमय परमसिद्धीची प्राप्ती होऊ शकेल. योग्याचे सर्वप्रथम कार्य म्हणजे आपले मन निरंतर श्रीकृष्णांवर एकाग्र करणे होय. सदैव श्रीकृष्णांचे स्मरण केले पाहिजे आणि क्षणभरही त्यांचे विस्मरण होऊ देऊ नये. भगवंतांवरील मनाच्या एकाग्रतेलाच समाधि असे म्हणतात. मनाची एकाग्रता साधण्यासाठी, मनुष्याने नेहमी एकांतवासात राहिले पाहिजे आणि बाह्य विषयांपासून होणारा व्यत्यय टाळला पाहिजे. त्याने अत्यंत काळजीपूर्वकरीत्या, आपल्या साक्षात्कारासाठी अनुकूल असणाऱ्या परिस्थितीचा स्वीकार केला पाहिजे. परिपूर्ण निश्चयाने युक्त होऊन त्याने, स्वामित्वाच्या भावनेत गुंतविणार्या अनावश्यक भौतिक वस्तूंच्या प्राप्तीसाठी अतिप्रयास करू नये.
जेव्हा मनुष्य वास्तविकपणे कृष्णभावनाभावित होतो तेव्हा या सर्व पूर्णावस्थांचे आणि नियमांचे पालन पूर्ण रीतीने होते. कारण प्रत्यक्ष कृष्णभावना म्हणजे आत्मसंयम होय आणि यामध्ये स्वामित्वाच्या भावनेला मुळीच वाव नाही. श्रील रुप गोस्वामी कृष्णभावनेचे स्वरुप पुढीलप्रमाणे सांगतात.
अनासक्तस्य विषयान् यथार्हमुपयुञ्जत:।
निर्बन्ध: कृष्णसम्बन्धे युक्तं वैराग्यमुच्यते॥
प्रापञ्जिकतया बुद्धया हरिसम्बन्धिवस्तुन:।
मुमुक्षुभि: परित्यागो वैराग्यं फल्गु कथ्यते॥
‘‘जेव्हा मनुष्य कोणत्याही गोष्टीवर आसक्त नसतो. पण त्याच वेळी तो जेव्हा श्रीकृष्णांशी संबंधित सर्व गोष्टींचा स्वीकार करतो तेव्हा तो स्वामित्वाच्या भावनेपासून वास्तविकपणे मुक्त झालेला असतो. उलटपक्षी प्रत्येक वस्तूचा संबंध श्रीकृष्णांशी असल्याचे न जाणता जो सर्व वस्तूंचा त्याग करतो त्याचे वैराग्य अपूर्ण असते.’’ (भक्तिरसामृतसिंधू 2.225-256)
कृष्णभावनाभावित मनुष्य उत्तमपणे जाणतो की, सर्व काही श्रीकृष्णांच्या मालकीचे आहे आणि याप्रमाणे तो नेहमी वैयक्तिक स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असतो. म्हणून त्याला आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी कोणत्याही गोष्टीची लालसा नसते. कृष्णभावनेसाठी अनुकूल गोष्टींचा स्वीकार कसा करावा आणि कृष्णभावनेसाठी प्रतिकूल असणार्या गोष्टींचा त्याग कसा करावा हे तो जाणतो. तो सतत अध्यात्मामध्ये स्थित असल्याने नेहमी भौतिक गोष्टींपासून अलिप्तच असतो आणि कृष्णभावनारहित असलेल्या व्यक्तीशी त्याला काहीच कर्तव्य नसल्याने तो नेहमी एकटाच राहतो. म्हणून कृष्णभावनाभावित मनुष्य हा परिपूर्ण योगी असतो.