No edit permissions for मराठी

TEXT 47

yoginām api sarveṣāṁ
mad-gatenāntar-ātmanā
śraddhāvān bhajate yo māṁ
sa me yukta-tamo mataḥ

योगिनाम्—सर्व योग्यांमध्ये; अपि -सुद्धा; सर्वेषाम्—सर्व प्रकारच्या; मत्-गतेन-माझ्यामध्येच वास करणारा किंवा मत्परायण झालेला; अन्तः-आत्मना-अंत:करणात; श्रद्धा-वान्-पूर्ण श्रद्धेने; भजते—दिव्य प्रेममयी सेवा करतो; यः-जो मनुष्य; माम्-माझी; सः-तो; मे-माझे; युक्ततमः-सर्वश्रेष्ठ योगी; मतः-मत आहे.

आणि सर्व योग्यांमध्ये, जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो; तोच सर्वश्रेष्ठ योगी होय, असे माझे मत आहे.

तात्पर्य: या श्लोकातील भजते शब्द महत्वपूर्ण आहे. 'भजते'यामध्ये भज हा मूळ धातू आहे आणि त्याचा अर्थ सेवा करणे असा आहे. वर्शिप (WORSHIP) हा इंग्रजी शब्द भज या अर्थाने वापरता येत नाही कारण 'वर्शिप' म्हणजे पूजन करणे किंवा योग्य मनुष्याबद्दल आदर व्यक्त करणे अथवा मान देणे होय, परंतु प्रेम आणि श्रद्धेने केलेली सेवा ही केवळ भगवंतांप्रीत्यर्थच असते. सन्माननीय व्यक्तींची किंवा देवतांची पूजा करण्याचे मनुष्याने टाळल्यास त्याला असभ्य म्हणता येईल, परंतु जर मनुष्याने भगवंतांची सेवा करणे टाळले तर त्याचे अध:पतन होईल. प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश आहे आणि म्हणून जीवाने आपल्या स्वरूपस्थितीला अनुसरून भगवंतांची सेवा केलीच पाहिजे. भगवंतांची सेवा न केल्याने जीवाचे पतन होते. श्रीमद्भागवतात (११.५.३) याला पुढीलप्रमाणे पुष्टी दिली आहे.

एषां पुरुषं साक्षादात्मप्रभवमीश्वरम्
न भजन्त्यवजानन्ति स्थानाद्‌भ्रष्टा: पतन्त्यध:।।

     ‘जो मनुष्य, सर्व जीवांचे उत्पत्तिकर्ता, आदिपुरुष भगवंत यांची सेवा करीत नाही किंवा भगवंतांप्रीत्यर्थ असलेल्या स्वकर्तव्यांचे पालन करीत नाही, त्याचे निश्चितपणे आपल्या स्वरूपस्थितीपासून पतन होते. ''

          या श्लोकातही 'भजन्ति' हा शब्द वापरण्यात आला आहे. म्हणून भजति हा शब्द केवळ भगवंतांच्याच संबंधात आहे आणि वर्शिप (पूजन) हा शब्द, देवतांच्या किंवा साधारण जीवांच्या संबंधात लागू होऊ शकतो. श्रीमद्भागवताच्या श्लोकात वापरण्यात आलेला अवजानति हा शब्द भगवद्गीतेतही वापरण्यात आला आहे अवजानति मां मूढाः-केवळ मूर्ख लोकच भगवान श्रीकृष्णांचा अवमान करतात. भगवंतांची सेवा करण्याची ज्यांची प्रवृत्ती नाही असे मूर्ख लोक भगवद्गीतेवर भाष्ये लिहितात. यामुळेच ते भजन्ति आणि वर्शिप या शब्दांमधील फरक जाणू शकत नाहीत.

          सर्व प्रकारच्या योगाभ्यासाची परिणती भक्तियोगामध्ये होते. इतर सर्व योग हे, भक्तियोगाप्रत येण्याची केवळ साधने आहेत. योग म्हणजेच वास्तविकपणे भक्तियोग होय आणि इतर योग हे भक्तियोगरूपी परम लक्ष्याकडे अग्रेसर होतात. कर्माच्या प्रारंभापासून भक्तियोगाच्या अंतापर्यंत जाणारा मार्ग म्हणजे आत्मसाक्षात्काराचा अत्यंत लांब पल्ला आहे. निष्काम कर्मयोग म्हणजे या मार्गाचा आरंभ आहे. जेव्हा कर्मयोगामध्ये ज्ञानाची आणि वैराग्याची वृद्धी होते, तेव्हा त्या अवस्थेला ज्ञानयोग म्हटले जाते. जेव्हा ज्ञानयोगामध्ये विविध आसनांद्वारे परमात्म्यावरील ध्यानाची वृद्धी होते आणि परमात्म्यावर मन स्थिर होते तेव्हा त्याला अष्टांगयोग म्हटले जाते आणि मनुष्य जेव्हा अष्टांगयोगाच्या पलीकडे जातो व भगवान श्रीकृष्णांप्रत येतो तेव्हा तो भक्तियोगयुक्त झाल्याचे म्हटले जाते, हीच संपूर्ण योगाची परमावधी आहे. वस्तुतः भक्तियोग हे अंतिम ध्येय आहे; परंतुभक्तियोगाचे सूक्ष्मपणे विश्लेषण करण्यासाठी मनुष्याला इतर योगांचे ज्ञान होणे आवश्यक आहे. म्हणून उत्तरोत्तर प्रगती करणारा योगी हा शाश्वत भाग्याच्या वास्तविक मार्गावर मार्गक्रमण करीत असतो. जो मनुष्य एका विशिष्ट स्तराला चिकटून राहतो आणि पुढे प्रगती करीत नाही त्याला त्या विशिष्ट नावाने संबोधिले जाते. उदाहरणार्थ, कर्मयोगी, ज्ञानयोगी, ध्यानयोगी, राजयोगी, किंवा हठयोगी इत्यादी. भक्तियोगाप्रत उन्नत होण्याइतपत मनुष्य भाग्यवान असेल तर त्याने इतर सर्व योग पूर्वीच पार केल्याचे जाणले पाहिजे. म्हणून आपण जेव्हा हिमालयाबद्दल बोलतो तेव्हा आपण जगातील सर्वांत उंच पर्वताबद्दल बोलतो ज्यामध्ये जगामधील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट हे आहे. त्याचप्रमाणे कृष्णभावनाभावित होणे म्हणजे योगांची सर्वोच्च अवस्था आहे.

          वैदिक आज्ञांनुसार सुस्थिर होण्याकरिता भक्तियोगाचा मार्ग क्रमीत असताना कृष्णभावनाभावित होणे ही महत्-भाग्याची गोष्ट आहे. आदर्श योगी हा आपले ध्यान श्रीकृष्णांवर केंद्रित करतो. श्रीकृष्ण हे श्यामसुंदर म्हणून जाणले जातात. मेघाप्रमाणे त्यांचा सुंदर नीलवर्ण आहे, त्यांचे मुखकमल सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे, त्यांचे वस्त्र रत्नांप्रमाणेच त्यांचे झळझळीत तेज ब्रह्मज्योती म्हणून जाणले जाते. ते राम, नृसिंह, वराह आणि भगवान श्रीकृष्ण या विविध रूपांमध्ये अवतरित होतात आणि माता यशोदेचे पुत्र म्हणून मानवसदृश रूपामध्ये अवतीर्ण होतात. त्यांना कृष्ण, गोविंद आणि वासुदेव म्हणून ओळखले जाते; ते परिपूर्ण बालक, पती, सखा व स्वामी आहेत आणि ते समस्त ऐश्वर्य आणि दिव्य गुणांनी परिपूर्ण आहेत. ज्या मनुष्याला भगवंतांच्या या सर्व गुणांची पूर्ण जाणीव असते त्याला सर्वश्रेष्ठ योगी म्हटले जाते.

          सर्व वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे योगामधील परमसिद्धी ही केवळ भक्तियोगाद्वारेच प्राप्त करता येते.

यस्य देवे पराभक्तिर्यथा देवे तथा गुरो
तस्यैते कथिता हृर्था प्रकाशान्ते महात्मन: ।

          ‘‘ज्या महात्म्यांना भगवंत आणि आध्यात्मिक गुरू दोहोंवर दृढ श्रद्धा आहे, केवळ त्यांनाच वेदांच्या तात्पर्यांचा आपोआप उलगडा होतो.’’ (श्वेताश्वतर उपनिषद् ६.२३)

भक्तिरस्य भजनं तदिहामुत्रोपाधिनैरास्येनमुष्मिन् मनःकल्पनमेतदेव नैष्कम्यम्‌-‘‘या किंवा पुढील जन्मामध्ये भौतिक लाभाची इच्छा न ठेवता केलेली भगवंतांची सेवा म्हणजे भक्ती होय. अशा कामनांपासून रहित होऊन मनुष्याने आपले मन पूर्णपणे भगवंतांमध्ये रममाण केले पाहिजे. हाच नैष्कर्म्याचा  उद्देश आहे.' (गोपाल तापनी उपनिषद् १.१५)

     योगाची परमसंसिद्धी, भक्ती किंवा कृष्णभावनेच्या आचरणाकरिता ही काही साधने आहेत.

     याप्रकारे भगवद्‌गीतेच्या ‘ध्यानयोग’ या सहाव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.

« Previous