No edit permissions for मराठी

TEXT 28

yeṣāṁ tv anta-gataṁ pāpaṁ
janānāṁ puṇya-karmaṇām
te dvandva-moha-nirmuktā
bhajante māṁ dṛḍha-vratāḥ

येषाम्-ज्यांचे; तु-परंतु; अन्त-गतम्-पूर्णपणे नष्ट झाले आहे; पापम्-पाप; जनानाम्लोकांचे; पुण्य-पुण्य; कर्मणाम्-ज्यांची पूर्वकर्मे; ते-ते; द्वंद्व-द्वंद्वांच्या; मोह-मोहापासून; निर्मुक्ताः-मुक्त झालेले; भजन्ते-भक्तीमध्ये परायण होतात; माम्-माझ्या; दृढ-व्रताः-दृढ निष्ठेने,

ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात.

तात्पर्य: जे दिव्य स्तराप्रत उन्नत होण्यास पात्र आहेत त्यांचा या शलोकामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. पापी, नास्तिक, मूर्ख आणि कपटी व्यक्तींना इच्छा आणि द्वेषाच्या द्वंद्वातून पार होणे अत्यंत कठीण असते. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये धार्मिक विधिविधानांचे पालन केले आहे, ज्यांनी पुण्यकर्मे केली आहेत आणि पापकर्मे नष्ट केली आहेत, केवळ तेच भक्तियोग स्वीकारू शकतात आणि क्रमशः भगवंतांच्या विशुद्ध ज्ञानाप्रत उन्नत होऊ शकतात. त्यानंतर क्रमाक्रमाने ते समाधी अवस्थेत भगवंतांवर ध्यान करू शकतात. आध्यात्मिक स्तराप्रत उन्नत होण्याची हीच पद्धती आहे. अशी उन्नती कृष्णभावनाभावित शुद्ध भक्तांच्या सत्संगामध्ये शक्य होते, कारण महान भक्तांच्या संगामध्ये मनुष्य मोहापासून मुक्त होऊ शकतो.

          श्रीमद्भागवतात (५.५.२) सांगण्यात आले आहे की, जर खरोखरच मनुष्याला मुक्त व्हावयाचे असेल तर त्याने भक्ताची सेवा करणे अत्यावश्यक आहे (महत्सेवां द्वारमाहुविंमुक्ते), परंतु जो विषयी लोकांचा संग करीत आहे तो प्रकृतीच्या अंधकारमय प्रदेशाकडे अग्रेसर होत आहे (तमोद्वारं योषितां सङ्गिसङ्गम्). बद्ध जीवांचा मोहापासून उद्धार करण्याकरिताच सर्व भगवद्भक्त या पृथ्वीतलावर भ्रमण करीत असतात. निर्विशेषवाद्यांना माहीत नसते की, भगवंतांच्या अधीन असणा-या आपल्या स्वरूपस्थितीचे विस्मरण होणे म्हणजेच परमेश्वराच्या नियमांचे उल्लंघन आहे. जोपर्यंत मनुष्य आपल्या स्वरूपस्थितीमध्ये स्थित होत नाही तोपर्यंत तो भगवंतांना जाणू शकत नाही किंवा दृढ निष्ठेने त्यांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त होऊ शकत नाही.

« Previous Next »