No edit permissions for मराठी

TEXT 29

jarā-maraṇa-mokṣāya
mām āśritya yatanti ye
te brahma tad viduḥ kṛtsnam
adhyātmaṁ karma cākhilam

जरा-वार्धक्यातून; मरण-आणि मृत्यू; मोक्षाय-मुक्त होण्याकरिता; माम्-माझा; आश्रित्य -आश्रय घेऊन; यतन्ति-प्रयत्न करतात; ये-जे; ते-असे व्यक्ती; ब्रह्म-ब्रह्म; तत्-त्या; विदुः-ते जाणतात; कृत्स्नम्-सर्व काही; अध्यात्मम्-अध्यात्म किंवा दिव्य; कर्म-कर्म; च-सुद्धा; अखिलम्-संपूर्ण.

जरा-मरणातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करणारे जे बुद्धिमान मनुष्य आहेत, ते माझ्या भक्तीद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान आहे.

तात्पर्य: जन्म, मृत्यू जरा आणि व्याधी या भौतिक शरीराला पीडा देतात; परंतु आध्यात्मिक देहाला जन्म, मृत्यू जरा आणि व्याधी नसते. म्हणून जो आध्यात्मिक देहाची प्राप्ती करतो तो भगवंतांचा एक पार्षद बनतो आणि शाश्वत भक्तियोगामध्ये परायण झाल्यामुळे तो ख-या अर्थाने मुक्त असतो. अहं ब्रह्मस्मि-मी ब्रह्म आहे. असे सांगितले जाते की, मनुष्याने आपण ब्रह्म, आत्मा असल्याचे जाणले पाहिजे. या शलोकात सांगितल्याप्रमाणे जीवनविषयक ही ब्रह्म संकल्पना भक्तीमध्येही आहे. शुद्ध भक्त हे दिव्य ब्रह्म स्तरावर स्थित असतात आणि दिव्य क्रियाचे त्यांना पूर्ण ज्ञान असते.

दिव्य भगवत्सेवेमध्ये युक्त झालेले चार प्रकारचे अशुद्ध भक्त आपापली उद्दिष्टे प्राप्त करतात आणि भगवंतांच्या कृपेने जेव्हा ते पूर्णपणे कृष्णभावनाभावित होतात, तेव्हा त्यांना भगवंतांच्या दिव्य सत्संगापासून आनंद प्राप्त होतो, पंरतु जे देवतांचे उपासक आहेत तयांना भगवंतांच्या परमधामाची कधीच प्राप्ती होत नाही. ब्रह्मानुभूती झालेल्या अल्पज्ञ व्यक्तींनाही श्रीकृष्णांच्या परम गोलोक वृंदावन धामाची प्राप्ती होत नाही. जे कृष्णभावनाभावित कर्म करीत आहेत (माम् आश्रित्य) त्यांनाच केवळ ब्रह्म म्हणता येते, कारण तेच वास्तविकपणे कृष्णलोकाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा व्यक्तींना श्रीकृष्णांबद्दल मुळीच संशय नसतो आणि म्हणून ते वास्तविकपणे ब्रह्म आहेत.

केवळ भौतिक बंधनातून मुक्त होण्याकरिता जे भगवंतांच्या अर्चा-विग्रहाची आराधना करण्यात परायण झाले आहेत किंवा भगवंतांवर ध्यान करण्यात मग्न झाले आहेत, त्यांनासुद्धा भगवंतांनी पुढील अध्यायामध्ये सांगितलेल्या ब्रह्म, अधिभूत इत्यादींचे तात्पर्य कळते.

« Previous Next »