TEXT 8
raso ’ham apsu kaunteya
prabhāsmi śaśi-sūryayoḥ
praṇavaḥ sarva-vedeṣu
śabdaḥ khe pauruṣaṁ nṛṣu
रस:-रस किंवा रुची; अहम्-मी; अप्सु-पाण्यामध्ये; कौन्तेय-हे कुंतिपुत्रा; प्रभा-प्रकाश; अस्मि-मी आहे; शशि-सूर्ययोः—चंद्र आणि सूर्याचा; प्रणाव:-ॐकार; सर्व-सर्वांमध्ये; वेदेषु-वेद; शब्द:-शब्द किंवा ध्वनी: खे-आकाशातील; पौरुषम्— सामर्थ्य किंवा पौरुषत्व; नृषु-मनुष्यांमधील.
हे कौंतेया! पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रांमधील ॐकार मी आहे, आकाशातील शब्द मी आणि मनुष्यांमधील सामर्थ्य मी आहे.
तात्पर्य: आपल्या विविध परा आणि अपरा शक्तीद्वारे भगवंत सर्वव्यापी कसे आहेत, याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. भगवंतांना प्रथम त्यांच्या विविध शक्तींद्वारे जाणता येते आणि या रीतीने त्याची निर्विशेष अनुभूती होते. ज्याप्रमाणे सूर्यलोकातील अधिष्ठात्री देवता एक पुरुष आहे आणि त्याच्या सर्वव्यापी शक्ती, सूर्यप्रकाशाद्वारे त्याच्या सर्वव्यापी रूपाची अनुभूती होते त्याचप्रमाणे भगवंत जरी आपल्या शाश्वत धामामध्ये निवास करीत असले तरी त्यांच्या सर्वव्यापी विविध शक्तींद्वारे त्यांची अनुभूती होते. रुची किंवा रस हा पाण्याचा गुणधर्म आहे. समुद्राचे पाणी पिणे कोणालाही आवडत नाही, कारण पाण्याची शुद्ध चव मिठाच्या मिश्रणामुळे खारट झालेली असते. पाण्याबद्दलचे आकर्षण हे पाण्याच्या चवीच्या शुद्धतेवर अवलंबून असते आणि ही विशुद्ध चव किंवा रस म्हणजे भगवंतांची एक शक्ती आहे. निर्विशेषवादी हा पाण्याच्या चवीद्वारे भगवंतांची पाण्यातील उपस्थिती जाणतो आणि साकारावादीसुद्धा, भगवंतांनी कृपा करून मनुष्याची तहान भागविण्याकरिता शुद्ध गोड पाणी पुरविल्याबद्दल भगवंतांचे गुणगान करतो. भगवंतांच्या अनुभूतीचा हाच मार्ग आहे. वास्तविकपणे पाहता, साकारवादी आणि निराकारवादी यांच्यात मुळीच मतभेद नाही. जो भगवंतांना जाणतो त्याला माहीत असते की, साकारत्व आणि निराकारत्व हे दोन्ही एकाच वेळी सर्व पदार्थात विद्यमान असते आणि त्यांच्यात परस्परविरोधाभास नसतो. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी आपला अचिंत्य भेदाभेद तत्व नामक दिव्य सिद्धांत प्रस्थापित केला.
चंद्र आणि सूर्याचा प्रकाशही मूलत: ब्रह्मज्योतीपासून उत्सर्जित होतो आणि ब्रह्मज्योती म्हणजे भगवंतांचे निर्विशेष तेज आहे. प्रत्येक वैदिक मंत्राच्या आरंभी असलेला प्रणव अथवा ॐ कार हा दिव्य शब्द भगवंतांनाच संबोधितो. भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या असंख्य नावांनी संबोधण्यास निर्विशेषवादी घाबरतात. म्हणून ते अॅंकार या दिव्य ध्वनीचा उच्चार करणे पसंत करतात. परंतु ते जाणीत नाहीत की, अॅंकार म्हणजे श्रीकृष्णांचे शाब्दिक प्रतिनिधित्व आहे. कृष्णभावना ही सर्वव्यापी आहे आणि जो कृष्णभावना जाणतो तो धन्य होय. जे श्रीकृष्णांना जाणीत नाहीत ते मायेच्या बंधनात आहेत आणि म्हणून श्रीकृष्णांचे ज्ञान होणे म्हणजे मुक्ती आणि श्रीकृष्णांबद्दलचे अज्ञान म्हणजे बंधन होय.