No edit permissions for मराठी

TEXT 7

mattaḥ parataraṁ nānyat
kiñcid asti dhanañ-jaya
mayi sarvam idaṁ protaṁ
sūtre maṇi-gaṇā iva

मत्तः—माझ्यापेक्षा; पर-तरम्—श्रेष्ठ; —नाही; अन्यत् किञ्चित्—अन्य काही; अस्ति-आहे; धनञ्जय-हे धनंजया; मयि-माझ्यामध्ये; सर्वम्-सर्व काही; इदम्-जे दृष्टिगोचर आहे; प्रोतम्-ओवलेले ; सूत्रे-दो-यात; मणि-गणा:-अनेक मणी, इव-ज्याप्रमाणे.

हे धनंजया! माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्त्व नाही. दो-यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे.

तात्पर्य: परम सत्य साकार आहे की निराकार या विषयावर नेहमीच वाद घातला जातो. भगवद्गीतेनुसार, परम सत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि याला गीतेत पदोपदी पुष्टी मिळाली आहे. विशेषत: या श्लोकात, परम सत्य हे पुरुष असल्याचे निक्षून सांगण्यात आले आहे. परम सत्य म्हणजे पुरुषोत्तम श्रीभगवान आहेत. हे ब्रह्मसंहितेतही निश्चितपणे सांगण्यात आले आहे. ईश्वरः परमः कृष्णः सfच्चदानंद विग्रहः अर्थात, श्रीकृष्ण हेच परम सत्य पुरुषोत्तम श्रीभगवान आहेत. श्रीकृष्ण हेच आदिपुरुष, सर्व रसांचे राजा श्रीगोविंद आणि सच्चिदानंदरूप आहेत. या प्रमाणांवरून निर्विवादपणे सिद्ध होते की, परम सत्य म्हणजे सर्व कारणांचे कारण, परमपुरुष आहेत. तरीही निर्विशेषवादी श्वेताश्वतरोपनिषदात (३.१०) सांगितलेल्या प्रमाणांवरून वाद घालतात, ततो यदुतरतरं तदरूपमनामय/ य एतद्विदुरमृतास्ते भवन्यथेतरे दु:खमेवापियन्ति 'भौतिक जगतातील आदिजीव ब्रह्मदेवाला देवदेवता, मनुष्यप्राणी आणि पशू यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते. परंतु ब्रह्मदेवाच्याही अतीत परतत्व आहे आणि या परतत्त्वाला प्राकृत स्वरूप नाही आणि ते सर्व भौतिक विचारांपासून मुक्त आहे. जे कोणी परतत्वाला जाणू शकतात ते दिव्य होतात; परंतु जे त्याला जाणत नाहीत ते भौतिक जगातील दु:खे भोगतात.'

निर्विशेषवादी अरूपम् या शब्दावर अधिक जोर देतात. परंतु अरूपम म्हणजे निराकार नव्हे, तर वर उल्लेख केलेल्या ब्रह्मसंहितेतील श्लोकानुसार अरूपम् हा शब्द सच्चिदानंद रूप दाखवितो. श्वेताश्वतरोपनिषदातील (३८.९) इतर श्लोकांमध्ये याच विधानाला पुढीलप्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे.

वेदाहमेतं पुरुषं महान्तमादित्यवर्णं तमस: परस्तात्‌ ।
तमेव विद्वानति मृत्यूमेति नान्य: पन्था विद्यतेऽयनाय्‌ ।।

यस्मात्परं नापरमस्ति किञ्चिद यस्मान्नाणीयो नो ज्यायोऽस्ति किञ्चित्‌ ।
वृक्ष इव स्तब्धो दिवि तिष्ठत्येकस्तेनेदं पूर्णं पुरुषेण सर्वम्‌ ।।

          ‘‘भौतिक कल्पनारूपी अंधाराच्या अतीत असणा-या पुरुषोत्तम भगवंतांना मी जाणतो. जो त्यांना जाणतो तोच केवळ जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. त्या परमपुरुष भगवंतांच्या या ज्ञानावाचून मुक्तीचा इतर कोणताही मार्ग नाही.''

'भगवंत हे परमपुरुष असल्यामुळे त्यांच्याहून श्रेष्ठ असे इतर कोणतेही तत्व नाही. ते सूक्ष्मतम अणूपेक्षाही सूक्ष्म आणि महत्तम् तत्वापेक्षाही महान आहेत. ते एका वृक्षाप्रमाणे स्तब्ध आहेत, ते परमव्योमाला प्रकाशित करतात आणि ज्याप्रमाणे वृक्ष आपली मुळे पसरवितो त्याप्रमाणे ते आपल्या विविध शक्तींचा विस्तार करतात.''

या श्लोकांवरून निष्कर्ष निघतो की, परम सत्य म्हणजेच पुरुषोत्तम भगवान आहेत आणि आपल्या विविध परा आणि अपरा शक्तींद्वारे ते सर्वव्यापक आहेत.

« Previous Next »