TEXT 16
ā-brahma-bhuvanāl lokāḥ
punar āvartino ’rjuna
mām upetya tu kaunteya
punar janma na vidyate
आ-ब्रह्म-भुवनात्-ब्रह्मलोकासहित; लोकाः-लोकः; पुनः-पुन्हा; आवर्तिनः-फिरणारे; अर्जुन-हे अर्जुना; माम्-मला; उपेत्य-येऊन मिळाल्यावर; तु-परंतु; कौन्तेय-हे कुंतीपुत्रा; पुनः जन्म-पुनर्जन्म; न—कधीच नाही; विद्यते—होतो.
प्राकृत जगतातल्या अत्युच्च ब्रह्मलोकापासून ते सर्वांत खालच्या लोकांपर्यंत सर्व लोक दुःखाची स्थाने आहेत. या लोकांत वारंवार जन्म-मृत्यू होतात. परंतु हे कोंतेया! जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच पुनर्जन्म नसतो.
तात्पर्य: कर्म, ज्ञान, हठ इत्यादी सर्व प्रकारच्या योग्यांना श्रीकृष्णांच्या दिव्य धामाची प्राप्ती करून आणि तेथून पुन्हा कधीच परतून न येण्यासाठी भक्तियोग किंवा कृष्णभावनेमध्ये परिपूर्णता प्राप्त करणे आवश्यक आहे. जे देवदेवतांच्या सर्वोच्च प्राकृत लोकांची प्राप्ती करतात ते सुद्धा जन्म-मृत्यूच्या अधीन असतात. पृथ्वीवरील मनुष्य ज्याप्रमाणे उच्चतर लोकांप्रत उन्नत होतात, त्याचप्रमाणे ब्रह्मलोक, चंद्रलोक आणि इंद्रलोक इत्यादी उच्चतर लोकांतील मनुष्यांचे पृथ्वीवर पतन होते. छांदोग्य उपनिषदात् सांगितलेल्या पंचग्नि-विद्या नामक यज्ञामुळे मनुष्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते, परंतु जर ब्रह्मलोकात त्याने कृष्णभावनेचा विकास केला नाही तर त्याला पुन्हा या भूतलावर परतून यावे लागते. उच्चतर लोकांमधील जे कृष्णभावनेमध्ये प्रगती करतात ते क्रमश: अधिकाधिक उच्चतर लोकांप्रत उत्रत होतात आणि महाप्रलयाच्या वेळी त्यांना आध्यात्मिक जगताची प्राप्ती होते. श्रीधर स्वामी, आपल्या भगवद्गीतेवरील भाष्यामध्ये पुढील श्लोक सांगतात
ब्रह्मणा सह ते सर्वे सम्प्राप्ते प्रतिसञ्चरे ।
परस्यान्ते कृतात्मान: प्रविशन्ति परं पदम् ।।
‘‘जेव्हा प्राकृत विश्वाचा प्रलय होतो तेव्हा, निरंतर कृष्णभावनेमध्ये युक्त असणारे ब्रह्मदेव आणि त्यांच्या भक्तांना त्यांच्या इच्छेनुसार आध्यात्मिक विश्वातील विविष्ट आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते.’’