No edit permissions for मराठी

TEXT 15

mām upetya punar janma
duḥkhālayam aśāśvatam
nāpnuvanti mahātmānaḥ
saṁsiddhiṁ paramāṁ gatāḥ

माम्-मला; उपेत्य-प्राप्त केल्यावर; पुन:-पुन्हा; जन्म-जन्म; दुःख-आलयम-दुःखाचे स्थान; अशाश्वतम्-अनित्य; -कधीच नाही; आप्नुवन्ति-प्राप्त होतो; महा-आत्मानः-महात्मे; संसिद्धिम्—परमसिद्धी; परमाम्-परम; गताः-प्राप्त झालेले.

माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मेजन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत, कारण त्यांना परम सिद्धी प्राप्त झालेली असते.

तात्पर्य: हे अनित्य प्राकृत जग जन्म, मृत्यू जरा आणि व्याधी या चार दुःखांनी परिपूर्ण असल्याकारणाने, स्वाभाविकतःच जो परमसिद्धी प्राप्त करतो आणि परमधाम, कृष्णलोक, गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतो, तो पुन्हा या जगामध्ये परतून येण्याची इच्छा करीत नाही. वेदांमध्ये परम लोकाचे वर्णन 'अव्यक', 'अक्षर' आणि 'परम गती' असे करण्यात आले आहे. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, परमलोक प्राकृत दृष्टीच्या अतीत आणि अवर्णनीय आहे आणि हे परमलक्ष्य आहे व महात्माजनांचेही हेच अंतिम ध्येय आहे. साक्षात्कारी भक्तांकडून महात्मेजनांना दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि त्यानंतर कृष्णभावनायुक्त भक्तीचा त्यांच्यामध्ये क्रमश: विकास होतो. त्यायोगे दिव्य भगवत्सेवेमध्ये ते इतके रममाण होतात की, त्यांना कोणत्याही उच्चतर प्राकृत लोकाप्रत किंवा आध्यात्मिक लोकाप्रत उन्नती करण्याचीही अभिलाषा राहत नाही. त्यांना केवळ श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांच्या सान्निध्याशिवाय इतर काहीही नको असते. हीच जीवनाची पूर्णावस्था आहे. या श्लोकामध्ये विशेषरूपाने भगवान श्रीकृष्णांच्या साकारवादी भक्तांचा उल्लेख करण्यात आला आहे. या कृष्णभावनाभावित भक्तांना जीवनाची परमसिद्धी प्राप्त होते. दुस-या शब्दांत, असे महात्मेजन परमश्रेष्ठ असतात.

« Previous Next »