TEXT 6
yaṁ yaṁ vāpi smaran bhāvaṁ
tyajaty ante kalevaram
taṁ tam evaiti kaunteya
sadā tad-bhāva-bhāvitaḥ
यम्यम्—ज्या ज्या; वा अपि—कोणत्याही; स्मरन्—स्मरण करीत, भावम्—भाव, त्यजति—त्याग करतो; अन्ते—अंतसमयी; कलेवरम्—हा देह; तम्तम्—त्या त्या; एव—निश्चितच;एति-प्राप्त करतो; कौन्तेय-हे कुंतीपुत्रा; सदा-नित्य; तत्-त्या; भाव-भाव; भावित:-स्मरण करीत.
हे कौन्तेय! आपल्या देहाचा त्याग करीत असताना, मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो, त्या त्या भावाची तो निःसंदेह प्राप्ती करतो.
तात्पर्य: मृत्यूच्या बिकट क्षणी मनुष्याचा स्वभाव कशा प्रकारे बदलतो याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. जो मनुष्य मृत्यूसमयी श्रीकृष्णांचे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग करतो त्याला भगवंतांच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती होते, परंतु श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीचे स्मरण केल्यावरही त्याच दिव्य स्वभावाची प्राप्ती होते ही गोष्ट सत्य नाही व या मुद्दयावर आपण विशेष लक्ष दिले पाहिजे. मनाच्या योग्य भावस्थितीत मनुष्याला कसा मृत्यू येऊ शकतो? भरत महाराज जरी महान असले तरी मृत्यूच्या क्षणी त्यांनी हरिणाचे चिंतन केले आणि त्यांना पुढील जन्म हरिणाचा प्राप्त झाला. हरिणाच्या शरीरामध्ये जरी त्यांना आपल्या पूर्वकर्माचे स्मरण होते तरी त्यांना पशूचा देह स्वीकारावाच लागला, अर्थात, मनुष्याने आयुष्यभर केलेल्या चिंतनाचा प्रभाव, त्याच्या मृत्यूसमयीच्या चिंतनावर पडतो, म्हणून वर्तमान जन्मामुळे भावी जन्मांची निश्चिती होत असते. जर मनुष्याने आपल्या वर्तमान आयुष्यामध्ये, संपूर्ण सत्वगुणी जीवन व्यतीत केले आणि सदैव कृष्णचिंतन केले तर त्याला मृत्यूच्या क्षणी श्रीकृष्णांच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती होऊ शकेल. जर मनुष्य श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेत तलीन झाला तर त्याचा पुढील देह हा प्राकृत नसून दिव्य किंवा आध्यात्मिक असेल. म्हणून हरेकृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे / या महामंत्राचा जप हा मनुष्याचे भावी जीवन यशस्वीपणे बदलण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.