No edit permissions for मराठी

TEXT 9

kaviṁ purāṇam anuśāsitāram
aṇor aṇīyāṁsam anusmared yaḥ
sarvasya dhātāram acintya-rūpam
āditya-varṇaṁ tamasaḥ parastāt

कविम्-सर्वज्ञ; पुराणम्-पुरातन; अनुशासितारम्-नियंता; अणोः-अणूपेक्षाही; अणीयांसम्-सूक्ष्म; अनुस्मरेत्-नित्य चिंतन करतो; यः-जो; सर्वस्य-सर्वांचा; धातारम्-पालनकर्ता; अचिन्त्य-अचिंत्य; रूपम्-ज्याचे रूप; आदित्य-वर्णम्-सूर्याप्रमाणे देदीप्यमान; तमसः-अंधकारातून; परस्तात्-दिव्य किंवा पलीकडचा.

मनुष्याने परमपुरुषाचे, सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणूपेक्षाही सूक्ष्म, सर्व गोष्टींचे पालनकर्ता, सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे, अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत, ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत.

तात्पर्य: या शलोकात भगवंतांच्या चिंतनाच्या पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे. सर्वांत महत्वाची गोष्ट ही आहे की, भगवंत हे निराकार किंवा शून्य नाहीत. कोणत्याही निराकार अथवा शून्यावर मनुष्य ध्यान करू शकत नाही, कारण असे ध्यान करणे अतिशय कठीण असते. परंतु कृष्ण-चिंतन करण्याची पद्धत अत्यंत सुलभ आहे आणि वास्तविकपणे या पद्धतीचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे. सर्वप्रथम, भगवंत हे पुरुष आहेत. आपण राम किंवा कृष्ण या पुरुषरूपांचे चिंतन करतो आणि मनुष्य राम-चिंतन करो अथवा कृष्ण-चिंतन करो, ते कसे दिसतात याचे वर्णन भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. भगवंत हे कवि आहेत, अर्थात ते भूत, वर्तमान आणि भविष्य सर्व काही जाणतात. ते आद्य पुराणपुरुष आहेत कारण सर्व गोष्टींचे मूळ तेच आहेत, सर्व गोष्टींचे जन्मदाताही तेच आहेत. तसेच सृष्टीचे परमनियंता आहेत आणि मानवसमाजाचे पालनकर्ता आणि उपदेशक आहेत. ते सूक्ष्माहूनही सूक्ष्मतम आहेत. जीव हा केसाच्या अग्राच्या दशसहस्रांशाइतका आहे; परंतु भगवंतांची सूक्ष्मता इतकी अचिंत्य आहे की, ते या अणूच्याही अंतरात प्रवेश करतात. म्हणून त्यांना सूक्ष्माहूनही सूक्ष्म असे म्हटले जाते. भगवंत या नात्याने ते अणूमध्येही प्रवेश करतात आणि अत्यंत सूक्ष्मतर वस्तूंच्या अंतरातही प्रवेश करून ते परमात्मा रूपाने त्या वस्तूंचे नियंत्रण करतात. ते जरी इतके सूक्ष्म असले तरीही ते सर्वव्यापी आहेत आणि सर्व गोष्टींचे ते पालनपोषण करीत आहेत. त्यांनीच सर्व ग्रहलोक धारण केले आहेत. ब-याच वेळा आपल्याला आश्चर्य वाटते की, मोठमोठे प्रचंड ग्रह आकाशात कसे तरंगत असतील? या ठिकाणी सांगण्यात आले आहे की, भगवंतांनी आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे हे सर्व प्रचंड ग्रहलोक आणि मोठमोठ्या आकाशगंगांना धारण केले आहे. या संदर्भात अचिंत्य हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. परमेश्वराची शक्ती आपल्या कल्पनेच्या आणि विचारक्षेत्राच्याही पलीकडे आहे आणि म्हणून तिला अचिंत्य असे म्हटले जाते. या मुद्दयावर कोण वाद घालू शकेल? त्यांनी हे सर्व भौतिक जग व्यापले आहे आणि तरीही ते या जगताच्या पलीकडे आहेत. आध्यात्मिक जगताच्या तुलनेत अगदीच नगण्य असणा-या या भौतिक जगताचेही आपल्याला आकलन होऊ शकणार नाही, तर या जगताच्या पलीकडे असणा-या गोष्टींचे आपल्याला कसे आकलन होऊ शकेल? अचिंत्य म्हणजे जे भौतिक जगताच्या अतीत आहे, ज्याला आपला युक्तिवाद, तर्कशास्त्र आणि ज्ञान स्पर्शही करू शकत नाही आणि ते अतर्क्य आहे म्हणून बुद्धिमानांनी निरर्थक वादविवाद आणि तर्क इत्यादींना टाळून वेद, भगवद्गीता, श्रीमद्भागवत इत्यादींसारख्या शास्त्रांमधील उपदेशांचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यामध्ये सांगितलेल्या तत्वांचे आचरण केले पाहिजे. यामुळे मनुष्याला ज्ञानप्राप्ती होईल.

« Previous Next »