No edit permissions for मराठी

TEXT 8

abhyāsa-yoga-yuktena
cetasā nānya-gāminā
paramaṁ puruṣaṁ divyaṁ
yāti pārthānucintayan

अभ्यास-योग-अभ्यासाद्वारे; युक्तेन-ध्यानामध्ये युक्त होऊन; चेतसा-मन आणि बुद्धीद्वारे; अन्यगामिना—विचलित न होता; परमम्—परम; पुरुषम्—भगवान; दिव्यम्—दिव्य; याति— प्राप्त करतो; पार्थ—हे पार्था; अनुचिन्तयन्—निरंतर चिंतन करीत.

हे पार्था! आपले मन विचलित होऊ न देता, त्याला माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून, माझे, परमपुरुषाचे जो ध्यान करतो, तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो.

तात्पर्य: या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे स्मरण करण्याच्या महत्त्वावर जोर दिला आहे. मनुष्याच्या कृष्ण-स्मृतीची (कृष्णभावनेचे) पुनर्जागृती हरे कृष्ण महामंत्राच्या जपाने होते. भगवंतांच्या नामध्वनीचे श्रवण आणि कीर्तन या प्रक्रियांमुळे कान, जिह्वा आणि मन युक्त राहते. अशा प्रकारचे योगध्यान आचरण करण्यास अत्यंत सोपे आहे आणि यामुळे भगवत्प्राप्ती होण्यास मनुष्याला मदत होते. पुरुषम्‌ म्हणजे भोक्ता होय. जीव जरी भगवंतांची तटस्था शक्ती असले तरी ते भौतिक विकारामध्ये बद्ध झालेले असतात. ते स्वतःला भोक्ता समजतात; परंतु ते परमभोक्ता असू शकत नाहीत. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, भगवंत हेच आपल्या विविध रूपांद्वारे आणि नारायण, वासुदेव इत्यादी विभूतींच्या द्वारे परमभोक्ता आहेत.

          भक्त हे भगवंतांचे, त्यांच्या नारायण, कृष्ण, राम इत्यादी कोणत्याही रूपामध्ये हरे कृष्ण कीर्तनाद्वारे निरंतर स्मरण करू शकतो. अशा अभ्यासामुळे त्याची शुद्धी होईल आणि आयुष्याच्या शेवटी, त्याने केलेल्या निरंतर स्मरणामुळे त्याला भगवद्‌धामाची प्राप्ती होईल. योगाभ्यास म्हणजे परमात्म्यावर ध्यान करणे होय. त्याचप्रमाणे हरेकृष्ण जपामुळे मनुष्याचे मन भगवंतांच्या ठायी नित्य एकाग्र राहते. चंचच असल्यामुळे मनाला बळेच कृष्णचिंतनात युक्त करणे आवश्यक आहे. आपण फुलपाखरू व्हावे असे चिंतन करणा-या सुरवंटाचे एक उदाहरण वारंवार दिले जाते. असे चिंतन केल्यामुळे त्याच जीवनात सुरवंटाचे रुपांतर फुलपाखरामध्ये होते. त्याचप्रमाणे जर आपण सदैव कृष्णचिंतन केले तर निश्चितपणे आपल्याला आपल्या जीवनाच्या अंती श्रीकृष्णांच्या विग्रहाप्रमाणेच शरीर प्राप्त होईल.

« Previous Next »