No edit permissions for मराठी

TEXT 28

śubhāśubha-phalair evaṁ
mokṣyase karma-bandhanaiḥ
sannyāsa-yoga-yuktātmā
vimukto mām upaiṣyasi

शुभ-शुभ, अशुभ-अशुभ, फलै:-फल; एवम्-याप्रमाणे, मोक्ष्यसे-तू मुक्त होशील; कर्म-कर्माच्या; बन्धनैः-बंधनातून; सन्यास-संन्यासाच्या; योग-योग; युक्त-आत्मा-मन दृढपणे युक्त झाल्यावर; विमुक्त:-मुक्त झालेला; माम्-मला; उपैष्यसि-तू प्राप्त होशील.

याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनांच्या शुभाशुभ फलांपासून तुझी सुटका होईल. या संन्यासयोगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त होशील.

तात्पर्य: ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जो कृष्णभावनाभावित कर्म करतो त्याला युक्त असे म्हटले जाते. पारिभाषिक शब्दामध्ये यालाच युक्त वैराग्य असे म्हटले जाते आणि याचे वर्णन श्रील रूप गोस्वामी पुढीलप्रमाणे करतात.

अनासक्तस्य विषयान्यथार्हमुपयुञ्जतः।
निर्बन्धः कृष्णसम्बन्धे युक्त वैराग्यमुच्यते ।।

(भक्तिरसामृत सिंधू 1.२.२५५)

          श्रील रूप गोस्वामी म्हणतात की, जोपर्यंत आपण या भौतिक जगतात आहोत तोपर्यंत आपल्याला कर्म हे करावेच लागते. आपण कर्म करणे पूर्णपणे थांबवू शकत नाही. म्हणून जर आपण कर्म केले आणि त्याचे फळ श्रीकृष्णांना अर्पण केले तर त्याला युक्त वैराग्य असे म्हटले जाते. वस्तुतः संन्यासयोगात स्थित होऊन केलेल्या कर्मामुळे मनरूपी आरसा स्वच्छ होतो आणि अशा रीतीने कर्म करणा-याची जशी जशी आध्यात्मिक साक्षात्कारात क्रमाक्रमाने प्रगती होते तसा तसा तो भगवंतांना पूर्णपणे शरण जातो. शेवटी तो मुक्त होतो आणि या मुक्तीचेही विशेषकरून वर्णन करण्यात आले आहे. अशा मुक्तीमुळे तो ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होत नाही तर तो भगवद्धामात प्रवेश करतो. या गोष्टीचा या श्लोकात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे, माम् उपैष्यसि- तो माझ्याकडे येतो; म्हणजेच तो भगवद्धामात परत जातो. मुक्तीच्या पाच विविध अवस्था आहेत आणि या ठिकाणी निर्देशित केल्याप्रमाणे, ज्या भक्ताने भगवंतांच्या मार्गदर्शनानुसार आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले आहे तो अशा स्थितीप्रत येऊन पोहोचला आहे की, देहत्यागानंतर तो भगवद्धामात परत जातो आणि भगवंतांच्या प्रत्यक्ष सानिध्यात रममाण होतो.

          भगवंतांच्या सेवेत आपले जीवन समर्पित करण्याव्यतिरिक्त ज्याला इतर कोणत्याही गोष्टीत आसक्ती नाही तोच वास्तविक संन्यासी होय. असा मनुष्य भगवंतांच्या इच्छेवर पूर्णपणे अवलंबून असतो आणि तो स्वतःला भगवंतांचा शाश्वत दास समजतो. म्हणून तो जे काही करतो ते भगवंतांना संतुष्ट करण्याकरिताच आणि भगवत्सेवेप्रीत्यर्थ करतो. वेदोक्त विहित कमें आणि सकाम कर्म करण्याची त्याला मुळीच इच्छा नसते. सामान्यजन वेदोक्त नियत कर्माचे पालन करण्यास बांधील आहेत; परंतु भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न झालेला शुद्ध भक्त जरी कधी कधी वेदोक्त नियत कर्माचे उल्लंघन करीत असल्याचे दिसले तरी वस्तुतः तो नियमांचे उल्लंघन करीत नसतो.

          यास्तव वैष्णव आचार्यांनी म्हटले आहे की, अत्यंत बुद्धिमान मनुष्यालासुद्धा शुद्ध भक्ताच्या क्रियामुद्रांचे आकलन होऊ शकत नाही. तंतोतंत शब्द असे आहेत. तॉंर वाक्य, क्रिया, मुद्रा विज्ञेह न बुझया (चैतन्य चरितामृत मध्य २३.३९) याप्रमाणे जो मनुष्य नित्य भगवत्सेवेमध्ये युक्त असतो किंवा भगवंतांची सेवा कशी करावी यासंबंधी जो सतत चिंतन करीत असतो तो वर्तमान काळात मुक्तच असल्याचे जाणले पाहिजे आणि त्याचे भगवद्धामात परत जाणे हे सुनिश्चित असते. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण गुणदोषविवेचनांच्या पलीकडे आहेत त्याचप्रमाणे शुद्ध भक्तही गुणदोष विवेचना पलीकडे असतो.

« Previous Next »