TEXT 6
yathākāśa-sthito nityaṁ
vāyuḥ sarvatra-go mahān
tathā sarvāṇi bhūtāni
mat-sthānīty upadhāraya
यथा-ज्याप्रमाणे; आकाश-स्थितः-आकाशात स्थित असलेल्या; नित्यम्-नित्य; वायुः-वायू; सर्वत्र-गः-सर्वत्र वाहणारा; महान्-महान; तथा-त्याप्रमाणे; सर्वाणि भूतानि-सर्व सृष्ट प्राणी; मत्-स्थानि-माझ्यामध्ये स्थित आहेत; इति-याप्रमाणे; उपधारय-जाणून घे.
ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो, त्याचप्रमाणे सर्व सृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण.
तात्पर्य: इतकी प्रचंड आणि महाकाय सृष्टी भगवंतांच्या ठायी कशी स्थित आहे, हे साधारण मनुष्याला जाणणे केवळ अशक्य आहे. पण या ठिकाणी भगवंत असे एक उदाहरण देत आहेत की, ज्यामुळे आपण हे जाणू शकू. आपण कल्पना करू शकू अशी सर्वांत मोठी अभिव्यक्ती म्हणजे आकाश होय आणि आकाशामध्ये असणारा वायू म्हणजे या भौतिक जगतातील सर्वांत मोठी अभिव्यक्ती होय. वायूच्या गतीमुळे प्रत्येक वस्तूची गती प्रभावित होते; परंतु वायू इतका महान असला तरी तो आकाशांतर्गतच स्थित आहे, तो आकाशाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे सृष्टीच्या अद्भुत अभिव्यक्ती भगवंतांच्या इच्छेमुळे अस्तित्वात आहेत आणि त्या सर्व भगवंतांच्या इच्छेच्या अधीन आहेत. सामान्यत: आपण म्हणतो की, भगवंतांच्या इच्छेविना गवताचे पातेही हलू शकत नाही. त्यांच्या इच्छेनेच सर्व गोष्टींची उत्पत्ती, पोषण आणि प्रलय होतो. याप्रमाणे सर्व काही भगवंतांच्या इच्छेनुसार कार्यरत असते. ज्याप्रमाणे आकाश हे सदैव वायूच्या हालचालींपासून अलिप्त असते त्याप्रमाणे भगवंतही सर्व गोष्टींपासून अलिप्त असतात.
उपनिषदांत म्हटले आहे, यदभात वातः पवते-'भगवंतांच्या भयामुळेच वायू वाहतो.' (तैत्तिरीय उपनिषद् २.८.१) बृहदारण्यक उपनिषदात सांगण्यात आले आहे की, (३.८.९) एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गि सूर्यचन्द्रमसौ विधृतौ तिष्ठत: एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गि द्यावापृ.थिव्यौ विधृतौ तिष्ठत: ‘‘भगवंतांच्या आधिपत्याखाली त्यांच्या आज्ञेने चंद्र, सूर्य, आणि इतर मोठमोठे ग्रह परिभ्रमण करीत आहेत.’’ ब्रह्मसंहितेतही (५.५२) म्हटले आहे की,
यच्चक्षुरेषु सविता सकलग्रहाणां
राजा समस्तसुरमूर्तिरशेषतेजा:।
यस्याज्ञया भ्रमति सम्भुतकालचक्रो
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि।।
हा श्लोक म्हणजे सूर्याच्या परिभ्रमणाचे वर्णन आहे. असे सांगितले जाते की, सूर्य हा भगवंतांचा एक नेत्र आहे आणि प्रकाश व उष्णता प्रसारण करण्याची त्याच्यामध्ये अपरिमित शक्ती आहे. तरीही श्रीगोविंदांच्या इच्छा आणि आज्ञेनुसार तो आपल्या कक्षेत भ्रमण करीत असतो. म्हणून वेदांवरून आपल्याला कळून येते की, अद्भूत आणि प्रचंड वाटणारी ही भौतिक सृष्टी पूर्णपणे भगवंतांच्या नियंत्रणाखाली कार्य करते. या अध्यायाच्या पुढील श्लोकामध्ये यासंबंधी अधिक विस्तृत वर्णन करण्यात येईल.