No edit permissions for मराठी

TEXTS 12-13

arjuna uvāca
paraṁ brahma paraṁ dhāma
pavitraṁ paramaṁ bhavān
puruṣaṁ śāśvataṁ divyam
ādi-devam ajaṁ vibhum

āhus tvām ṛṣayaḥ sarve
devarṣir nāradas tathā
asito devalo vyāsaḥ
svayaṁ caiva bravīṣi me

अर्जुनः उवाच-अर्जुन म्हणाला; परम्-परम; ब्रह्म-सत्य; परम्-परम; धाम-धाम किंवा आधार; पवित्रम्-पवित्र; परमम्-परम; भवान्-तुम्ही; पुरुषम्-पुरुष; शाश्वतम्-शाश्वत किंवा मूळ; दिव्यम्-दिव्य; आदि-देवम्-आदिदेव; अजम्-अञ्जन्मा; विभुम्-विभू किंवा सर्वश्रेष्ठ; आहुः-म्हणतात; त्वाम्-तुम्हाला; ऋषयः--ऋषी; सर्वे-सर्व; देव-ऋषिः-देवर्षी; नारदः-नारद; तथा-सुद्धा; असितः-असितः; देवलः-देवल; व्यासः-व्यास; स्वयम्-स्वत:; -सुद्धा; एव-निश्चितपणे; ब्रवीषी-तुम्ही सांगत आहात; मे-मला.

अर्जुन म्हणाला : तुम्हीच पुरुषोत्तम भगवान, परम धाम, परम पवित्र, परम सत्य आहात. तुम्ही शाश्वत, दिव्य, आदिपुरुष, अजन्मा, विभू आहात. नारद, असित, देवल आणि व्यास यांसारख्या महर्षीनी तुमच्याबद्दलच्या या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता स्वत: तुम्हीही मला तेच सांगत आहात.

तात्पर्य: या दोन श्लोकांमध्ये भगवंतांनी आधुनिक तत्वज्ञान्यांना एक संधी दिली आहे. कारण या ठिकाणी स्पष्ट म्हटले आहे की, परतत्व हे जीवाहून भिन्न आहे. भगवद्गीतेच्या या अध्यायातील चार महत्वपूर्ण श्लोक ऐकल्यानंतर अर्जुन सर्व संशयातून पूर्णपणे मुक्त झाला आणि त्याने श्रीकृष्ण हे स्वयं पुरुषोत्तम भगवान असल्याचे मान्य केले. म्हणून तात्काळ स्पष्टपणे त्याने मी सर्वांचे आदिकारण आहे. प्रत्येक देवता आणि प्रत्येक मनुष्य त्यांच्यावर आश्रित आहे. अज्ञानवश मनुष्य आणि देवतांना वाटते की, आपण परिपूर्ण आहोत आणि भगवंताहून स्वतंत्र आहोत. भक्ती केल्याने हे अज्ञान पूर्णपणे नाहीसे होते. याचे स्पष्टीकरण यापूर्वीच्या श्लोकामध्ये भगवंतांनी केले आहे. आता त्यांच्या कृपेमुळेच अर्जुन त्यांचा परम सत्य म्हणून स्वीकार करीत आहे आणि हे वेदसंमतच आहे. असे नाही की, श्रीकृष्ण हे अर्जुनाचे मित्र असल्याकारणाने त्यांची खुशामत करण्यासाठी अर्जुन त्यांना परम सत्य, भगवान म्हणून संबोधित आहे. या दोन श्लोकांमध्ये अर्जुन जे काही म्हणत आहे ते वेदसंमतच आहे. वेद स्पष्टपणे सांगतात की, जो भगवद्‌भक्ती करीत आहे केवळ तोच भगवंतांना जाणू शकतो. भक्तांव्यतिरिक्त इतर कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही. अर्जुनाने या श्लोकात म्हटलेल्या प्रत्येक शब्दाला वेदांनी प्रमाणित केले आहे.

          केन उपनिषदात म्हटले आहे की, परमब्रह्म हे प्रत्येक गोष्टीचे आश्रयस्थान आहे आणि श्रीकृष्णांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे की, सर्व काही माझ्यावरच आश्रित आहे. मुंडक उपनिषदात म्हटले आहे की, जे निरंतर भगवंतांचे चिंतन करीत असतात केवळ त्यांनाच सर्वांचे आधार असणा-या भगवंतांची अनुभूती होऊ शकते. श्रीकृष्णांच्या निरंतर चिंतन करण्यालाच 'स्मरणम्' असे म्हटले जाते. नवविधा भक्तीमधील स्मरणम् ही एक क्रिया आहे. केवळ कृष्णभक्तीमुळेच मनुष्य आपली स्वरूपस्थिती जाणून या भौतिक देहातून मुक्त होऊ शकतो.

          वेदांमध्ये भगवंतांना परम पवित्र म्हणून संबोधण्यात आले आहे. जो श्रीकृष्णांना परम पवित्र म्हणून जाणतो तो सर्व पापांतून शुद्ध होतो. जोपर्यंत मनुष्य, भगवंतांना शरण जात नाही तोपर्यंत तो पापकर्माच्या दोषांपासून मुक्त होऊ शकत नाही. अर्जुनाने श्रीकृष्णांचा परम पवित्र म्हणून स्वीकार करणे हे वेदांशी सुसंगतच आहे. याचीही पुष्टी देवर्षी नारदांसारख्या महर्षीनी केली आहे.

          श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत आणि मनुष्याने सदैव त्यांच्यावर ध्यान करीत त्यांच्याशी असणा-या आपल्या दिव्य संबंधाचा आनंद घ्यावा. श्रीकृष्ण हे परम शाश्वत आहेत आणि ते शारीरिक गरजा, जन्म, मृत्यू इत्यादींपासून मुक्त आहेत. केवळ अर्जुनच हे सांगतो असे नाही तर सर्व वेद आणि पुराणेही हेच सांगतात. संपूर्ण वेदांमध्ये श्रीकृष्णांचे याप्रमाणे वर्णन करण्यात आले आहे आणि चौथ्या अध्यायामध्ये स्वत: भगवंत सांगतात की, 'मी जरी अजन्मा असलो तरी या पृथ्वीवर धर्माची पुनस्थापना करण्यासाठी मी भूतलावर अवतरित होतो.' ते परम कारण आहेत. त्यांचे कोणतेही कारण नाही, कारण तेच सर्व कारणांचे कारण आहेत. आणि सर्व काही त्यांच्यापासूनच निर्माण होते. असे हे परिपूर्ण ज्ञान केवळ भगवत्कृपेनेच होऊ शकते.

          श्रीकृष्णांच्या कृपेनेच अर्जुनाने या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले आहेत. जर आपल्याला भगवद्गीता जाणावयाची असेल तर, या दोन श्लोकांमधील विधानांचा आपण स्वीकार केला पाहिजे. यालाच परंपरा असे म्हणतात आणि हाच परंपरेचा स्वीकार होय. जो मनुष्य परंपरेत नाही तो भगवद्गीता जाणू शकत नाही. तथाकथित विश्वविद्यालयीन शिक्षणाने भगवद्गीता जाणणे शक्य नाही. वैदिक शास्त्रांची इतकी प्रमाणे असूनसुद्धा जे लोक दुर्दैवाने आपल्या उच्च शिक्षणामुळे मदांध झालेले आहेत ते आपल्या दुराग्रही विश्वासाला चिकटून म्हणतात की, श्रीकृष्ण हा साधारण मनुष्य आहे.

« Previous Next »