No edit permissions for मराठी

TEXT 11

teṣām evānukampārtham
aham ajñāna-jaṁ tamaḥ
nāśayāmy ātma-bhāva-stho
jñāna-dīpena bhāsvatā

तेषाम्-त्यांच्यावर; एव-निश्चितपणे; अनुकम्पा-अर्थम्-विशेष अनुग्रह करण्यासाठी; अहम्‌-मी; अज्ञान-जम्--अज्ञानामुळे; तमः-अंधकार; नाशयामि-नष्ट करतो; आत्म-भाव-त्यांच्या अंत:करणामध्ये; स्थ:-स्थित; ज्ञान-ज्ञानाच्या; दीपेन-दीपाने; भास्वता-तेजस्वी.

त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी, ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने, अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो.

तात्पर्यः जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू बनारसमध्ये राहून हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे | हरे राम हरे राम राम राम हरे हरे । या महामंत्राचा प्रसार करीत होते तेव्हा सहस्रावधी लोक त्यांचे अनुसरण करीत असत. बनारसचे तत्कालीन अत्यंत प्रभावशाली आणि विद्वान पंडित प्रकाशानंद सरस्वती हे श्री चैतन्य महाप्रभूचा भावुक म्हणून उपहास करीत. तात्विक कधी कधी भक्तांची आलोचना करतात, कारण त्यांना वाटते की, बहुतेक भक्त हे अज्ञानरूपी अंधकारात आहेत आणि तत्वज्ञानाच्या बाबतीत भोळेभाबडे, भावुक आहेत परंतु हे काही सत्य नाही. असे अनेकानेक विद्वान पंडित आहेत ज्यांनी भक्तीच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार केला आहे. परंतु एखाद्या भक्ताने जरी त्यांच्या किंवा आपल्या आध्यात्मिक गुरूच्या ग्रंथांचा लाभ करून घेतला नाही, तरीसुद्धा तो जर प्रामाणिकपणे भक्ती करीत असेल तर श्रीकृष्ण त्याला त्याच्या अंत:करणातून साहाय्य करतात. म्हणून कृष्णभावनेमध्ये युक्त असलेला प्रामाणिक भक्त अज्ञानी राहू शकत नाही. याकरिता आवश्यक ती पात्रता म्हणजे त्याने पूर्णपणे कृष्णभावनाभावित होऊन भक्ती केली पाहिजे.

          आधुनिक तत्वज्ञान्यांना वाटते की, विवेकबुद्धी असल्यावाचून मनुष्याला शुद्ध ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. तर अशा लोकांकरिता भगवंत या श्लोकात म्हणतात की, जे शुद्ध भगवद्भक्तीमध्ये निमग्न आहेत त्यांना जरी पुरेसे शिक्षण नसले किंवा पुरेसे वैदिक तत्वांचे ज्ञान नसले तरी मी त्यांना साहाय्य करतो.

          भगवंत अर्जुनाला सांगतात की, केवळ तर्कवादाने परम सत्याचे, पुरषोत्तम भगवंतांचे ज्ञान होणे शक्य नाही, कारण परम सत्य हे इतके महान आहे की, केवळ मानसिक प्रयासाने परम सत्याचे ज्ञान किंवा त्याची प्राप्ती करणे संभव नाही. मनुष्याने जरी लाखो वर्षे केवळ चिंतन केले, पण त्याच्या ठायी जर भक्ती नसेल किंवा भगवंतांवर प्रेम नसेल तर त्याला श्रीकृष्णांचे, परम सत्याचे कदापि ज्ञान होणार नाही. केवळ भक्तीनेच परम सत्य, भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे ते स्वतःला भक्ताच्या अंतरात प्रकट करतात. शुद्ध भक्ताच्या हृदयात श्रीकृष्ण सदैव वास करीत असतात आणि सूर्यसम श्रीकृष्णांच्या उपस्थितीमुळे अज्ञानरूपी अंधकार तात्काळ नष्ट होतो. शुद्ध भक्तावर श्रीकृष्णांनी केलेली ही असीम कृपाच होय.

          लाखो जन्मांत झालेल्या प्राकृतिक संसर्गाच्या प्रदूषणामुळे मनुष्याचे हृदय हे विषयरूपी धुळीने आवृत झालेले असते, परंतु जेव्हा तो भक्तीमध्ये निमग्न होतो आणि निरंतर हरेकृष्ण मंत्राचे नामस्मरण करतो तेव्हा ती धूळ त्वरित नाहीशी होते आणि त्याला शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते. अंतिम ध्येय, श्रीविष्णू हे केवळ या नामस्मरणाने आणि भक्तियोगानेच प्राप्त होऊ शकतात. आपल्या भौतिक गरजांबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नसते, कारण जेव्हा तो आपल्या अंतःकरणातील अंधकाराचा नाश करतो तेव्हा त्याच्या प्रेममयी भक्तीमुळे प्रसन्न झालेले भगवंत त्याला सर्व काही आपोआपच पुरवितात. हेच भगवद्गीतेच्या उपदेशांचे सार आहे. भगवद्गीतेच्या अध्ययनाद्वारे मनुष्य, भगवंतांना पूर्णपणे शरण जाऊन शुद्ध भगवद्भक्तीमध्ये युक्त होऊ शकतो. जेव्हा भगवंत, भक्ताचा भार आपल्यावर घेतात तेव्हा तो सर्व प्रकारच्या भौतिक प्रयासांतून पूर्णपणे मुक्त होतो.

« Previous Next »