No edit permissions for मराठी

TEXT 4

manyase yadi tac chakyaṁ
mayā draṣṭum iti prabho
yogeśvara tato me tvaṁ
darśayātmānam avyayam

मन्यसे-तुम्हाला वाटत असेल; यदि-जर; तत्-ते; शक्यम्-शक्य;मया-मी; द्रष्टुम्-पाहणे; इति—याप्रमाणे; प्रभो—हे प्रभू; योग-ईश्वर—हे योगेश्वर; ततः—तर मग; मे—मला; त्वम्— तुम्ही; दर्शय-दाखवा; आत्मानम्-आपले स्वरूप; अव्ययम्-शाश्वत.

हे प्रभो ! मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा! तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा.

तात्पर्य: असे म्हटले आहे की, भौतिक इंद्रियांद्वारे मनुष्य, भगवान श्रीकृष्णांना पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही तसेच त्यांचा अनुभवही करू शकत नाही; परंतु प्रारंभापासूनच जर मनुष्य, भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न झाला तर त्याला भगवंतांचा साक्षात्कार होऊ शकतो. प्रत्येक जीव हा केवळ एका स्फुलिंगाप्रमाणे आहे म्हणून तो भगवंतांना पाहू किंवा जाणू शकत नाही. भक्त म्हणून अर्जुन हा आपल्या तर्कशक्तीवर अवलंबून राहात नाही, उलट तो जीव या दृष्टीने आपल्या मर्यादत्वाचा स्वीकार करतो आणि श्रीकृष्णांचे अचिंत्य स्वरुप मान्य करतो. अर्जुन जणू शकत होता की, जीवाला अमर्यादित अनंताचे पूर्ण ज्ञान होणे शक्य नाही. जर अनंताने स्वतःला जीवासमोर प्रकट केले तर अनंताच्या कृपेनेच जीव, अनंताचे स्वरूप जाणू शकतो. या श्लोकातील योगेश्वर हा शब्द सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे, कारण भगवंतांची शक्ती अचिंत्य आहे. भगवंतांची इच्छा असेल तर ते स्वत: अनंत असूनही स्वत:च्या कृपेमुळे स्वत:ला प्रकट करू शकतात. म्हणून अर्जुन श्रीकृष्णांकडे त्यांच्या अहैतुकी कृपेची याचना करीत आहे. तो श्रीकृष्णांना आज्ञा करीत नाही. जोपर्यंत मनुष्य पूर्णपणे कृष्णभावनाभावित होऊन श्रीकृष्णांना शरण जात नाही आणि भक्तीमध्ये संलग्न होत नाही तोपर्यंत श्रीकृष्ण स्वत:ला प्रकट करण्यास बाध्य नाहीत. याप्रमाणे जे आपल्या तर्कशक्तीवर विसंबून आहेत ते श्रीकृष्णांना पाहू शकत नाहीत.

« Previous Next »