TEXT 15
sarvendriya-guṇābhāsaṁ
sarvendriya-vivarjitam
asaktaṁ sarva-bhṛc caiva
nirguṇaṁ guṇa-bhoktṛ ca
सर्व-सर्व; इन्द्रिय-इंद्रिये; गुण-गुणांचे; आभासम्-मूळ स्रोत; सर्व-सर्व; इन्द्रिय-इंद्रिये; विवर्जितम्—विरहित; असक्तम्—अनासक्त; सर्व–भूत्—सर्वाचा पालनकर्ता, च—सुद्धा; एव— निश्चितपणे; निर्गुणम्-प्राकृत गुणरहित; गुण-भोक्तृ-गुणांचा स्वामी; च-सुद्धा.
परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे; पण तरीही तो इंद्रियरहित आहे. तो सर्व जीवांचा पालनकर्ता असला तरी अनासक्तच आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामीही आहे.
तात्पर्य: भगवंत जरी जीवांच्या सर्व इंद्रियांचे उगमस्थान असले तरी त्यांची इंद्रिये ही जीवांच्या प्राकृत इंद्रियांप्रमाणे नसतात. वास्तविकपणे जीवात्म्याला आध्यात्मिक इंद्रिये असतात; परंतु बद्ध जीवनामध्ये ती भौतिक तत्वांनी आच्छादित असतात. म्हणून इंद्रियांच्या क्रिया पदार्थाद्वारे व्यक्त होतात. भगवंतांची इंद्रिये ही प्राकृत तत्वांनी आवृत्त होऊ शकत नाहीत, त्यांची इंद्रिये ही अलौकीक आणि दिव्य असतात. म्हणून त्यांना निर्गुण असे म्हटले जाते. गुण म्हणजे प्राकृतिक गुण होत; परंतु त्यांची इंद्रिये ही भौतिक आच्छादनविरहित असतात. ती आपल्या इंद्रियांप्रमाणे नसतात हे जाणले पाहिजे. भगवंत जरी आपल्या सर्व इंद्रियजन्य कर्माचे मूळ उद्गम असले तरी त्यांची इंद्रिये ही अविकारी आणि दिव्य आहेत. याचे सुंदर वर्णन श्वेताश्वतरीपनिषदात (३.१९) पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे, अपाणिपादी जवन ग्रहीत-भगवंतांचे हात हे प्राकृत नाहीत तर त्यांचे दिव्य हात आहेत आणि त्यांना अर्पिलेल्या सर्व गोष्टींचा ते स्वीकार करतात. हाच परमात्मा आणि बद्ध जीवात्मा यांच्यातील फरक आहे. भगवंतांना प्राकृत नेत्र नाहीत. परंतु त्यांना नेत्र आहेत, नाही तर ते कसे पाहू शकले असते? ते भूत, वर्तमान, भविष्य सर्व काही पाहू शकतात. ते जीवांच्या हृदयामध्ये वास करतात आणि आपण भूतकाळात काय केले आहे, सध्या काय करीत आहोत आणि भविष्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे हे सर्व ते जाणतात आणि याची भगवद्गीतेत पुष्टी केली आहे. ते सर्व काही जाणतात; परंतु त्यांना कोणीही जाणत नाही. असे म्हटले आहे की, भगवंतांना आपल्यासारखे पाय नाहीत, परंतु ते अंतरिक्षात कुठेही भ्रमण करू शकतात, कारण त्यांचे पाय अलौकिक आहेत. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर भगवंत हे निराकार नाहीत. त्यांना स्वतःचे नेत्र, पाय, हात आणि इतर सर्व काही आहे आणि आपण भगवंतांचे अंश असल्याकारणाने आपल्यालाही हात, पाय इत्यादी सर्व गोष्टी आहेत; परंतु त्यांचे हात, पाय, नेत्र आणि इंद्रिये ही भौतिक प्रकृतीमुळे विकारित होत नाहीत.
भगवद्गीतेतही सांगण्यात आले आहे की, जेव्हा भगवंत अवतीर्ण होतात तेव्हा ते आपल्या योगमायेद्वारे स्वतःच्या मूळ स्वरूपात प्रकट होतात. भगवंत मायाशक्तीने प्रदूषित होत नाहीत, कारण ते स्वतः मायाधिपती आहेत. वेदांवरून आपल्याला आढळून येते की, त्यांचा संपूर्ण विग्रह हा आध्यात्मिक आहे. भगवंत हे सच्चिदानंद आहेत; सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत, सर्व ऐश्वर्य आणि सर्व बल यांचे स्वामी आहेत, ते सर्वाधिक बुद्धिमान आणि ज्ञानमयी आहेत. भगवंतांचे हे काही गुण आहेत. ते सर्व जीवांचे पालनकर्ता आणि सर्व कर्माचे साक्षी आहेत. वेदांवरून आपण जाणू शकतो की, भगवंतांचे स्वरूप सदैव दिव्यच असते. आपण जरी त्यांचे मस्तक, मुख किंवा पाय इत्यादी पाहू शकत नसलो तरी या सर्व इंद्रियांनी ते युक्त आहेत आणि जेव्हा आपण दिव्य स्तराप्रत उन्नत होते तेव्हा आपण त्यांचे रुप पाहू शकतो. प्राकृतिक इंद्रियांमुळे आपण त्यांचे रूप पाहू शकत नाही. म्हणून मायाशक्तीने प्रभावित झालेले निर्विशेषवादी भगवंतांना जाणू शकत नाहीत.