No edit permissions for मराठी

TEXT 6

tatra sattvaṁ nirmalatvāt
prakāśakam anāmayam
sukha-saṅgena badhnāti
jñāna-saṅgena cānagha

तत्र-तेथे; सत्वम्-सत्वगुण; निर्मलत्वात्-भौतिक जगतात सर्वाधिक निर्मळ असल्यामुळे; प्रकाशकम्—प्रकाशित करणारा; अनामयम्-निष्पाप;सुख-सुखाने, सङ्गेन-संगाने; बध्नाति- बद्ध करती; ज्ञान-ज्ञानाने, सङ्गे-संगाने, -सुद्धा, अनघ-हे निष्पाप अर्जुना.

हे अनघा अर्जुना! सत्त्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि हा । मनुष्याला सर्व पापांतून मुक्त करतो. जे सत्त्वगुणामध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात.

तात्पर्य: भौतिक प्रकृतीने बद्ध झालेले जीव विविध प्रकारचे आहेत. कोणी सुखी, कोणी खूप उद्योगी तर कोणी असाहाय्य असतो. हे सर्व मानसिक विकार, जीवाच्या प्रकृतीतील बद्धावस्थेला कारणीभूत असतात. निरनिराळ्या प्रकारे ते कसे बद्ध होतात याचे वर्णन भगवद्गीतेच्या या विभागात करण्यात आले आहे. यामध्ये सत्वगुणाचा सर्वप्रथम विचार करण्यात येतो. प्राकृत जगतामध्ये सत्वगुणाचा विकास केल्याने मनुष्य इतर प्रकारे बद्ध झालेल्या मनुष्यांपेक्षा सुज्ञ किंवा बुद्धिमान होतो. सत्वगुणी मनुष्य हा भौतिक दुःखांनी तितकासा प्रभावित होत नाही आणि भौतिक ज्ञानामध्ये प्रगती करावयाची जाणीव त्याला असते. सत्वगुणाचा प्रातिनिधिक प्रकार म्हणजे ब्राह्मण होय, कारण तो सत्त्वगुणात स्थित असतो. सत्वगुणी मनुष्य पापकर्माच्या फळांपासून प्रायः मुक्त असतो व या पापाच्या अभावाच्या जाणिवेमुळे त्याला सुखाचा अनुभव येतो. वास्तविकपणे वेदांमध्ये म्हटले आहे की, सत्वगुण म्हणजे अधिक ज्ञान आणि अधिक सुख होय.

          येथे अडचण अशी आहे की, जेव्हा जीव सत्वगुणामध्ये स्थित होतो तेव्हा त्याला असा     भ्रम होतो की, आपणच अधिक ज्ञानी आहोत व इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत आणि या समजुतीमुळेच तो बद्ध होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञानी होत. प्रत्येकाला आपल्या ज्ञानाचा फार अभिमान असतो आणि सामान्यतः दोघांचेही राहणीमान उच्च दर्जाचे असल्यामुळे त्यांना एक प्रकारच्या भौतिक सुखाचा अनुभव येतो. बद्ध जीवनातील या सुखाच्या भावनेमुळेच ते सत्त्वगुणाद्वारे बद्ध होतात. याप्रमाणे त्यांना सत्वगुणी कर्म करण्याचे आकर्षण असते आणि जोपर्यंत त्यांना अशा प्रकारे कर्म करण्याचे आकर्षण असते तोपर्यंत त्यांना प्राकृतिक गुणांना अनुसरून कोणत्या ना कोणत्या प्रकारचे शरीर धारण करावेच लागते. म्हणून त्यांना मोक्षप्राप्ती किंवा वैकुंठलोकाची प्राप्ती होण्याची संभावना नसते. पुनः पुन्हा सत्त्वगुणी मनुष्य तत्ववेत्ता, वैज्ञानिक इत्यादी बनू शकतो आणि पुन्हा जन्म-मृत्यूच्या दुस्तर चक्रामध्ये त्याला भटकावे लागते; परंतु मायाजनित मोहामुळे मनुष्याला वाटते की, हेच जीवन सुखकारक आहे.

« Previous Next »