TEXT 16
manaḥ-prasādaḥ saumyatvaṁ
maunam ātma-vinigrahaḥ
bhāva-saṁśuddhir ity etat
tapo mānasam ucyate
मनः-प्रसादः-मानसिक समाधान; सौम्यत्वम्-इतरांशी दुटप्पीपणाचे वर्तन न करणे; मौनम्-गांभीर्य, आत्म-स्वत:चे; विनिग्रहः-संयमन; भाव-स्वभाव; संशुद्धिः-शुद्धीकरण; इति-याप्रमाणे; एतत्-हे; तपः-तपस्या; मानसम्-मनाचे; उच्यते-म्हटले जातात.
आणि समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम आणि भावशुद्धी हे मानसिक तप आहेत
तात्पर्यः मानसिक तप म्हणजेच मनाला इंद्रियतृप्तीमधून विरक्त करणे होय. मनाला असे प्रशिक्षण दिले पाहिजे की, जेणेकरून, ते इतरांचे हित कसे साधता येईल याचेच सदैव चिंतन करीत राहील. मनासाठी योग्य प्रशिक्षण म्हणजे विचारांचे गांभीर्य होय. मनुष्याने कृष्णभावनेपासून कधीही विचलित होऊ नये आणि इंद्रियतृप्ती करणे सदैव टाळले पाहिजे. मनुष्याच्या स्वभावाचे शुद्धीकरण करणे म्हणजेच कृष्णभावनाभावित होणे होय. इंद्रियोपभोगाच्या चिंतनापासून मनाला दूर ठेवल्यानेच मानसिक समाधान प्राप्त होऊ शकते. आपण जितके अधिक इंद्रियोपभोगाचे चिंतन करती तितके अधिक मन अतृप्त होते. सद्यस्थितीत, इंद्रियतृप्ती करण्यासाठी आपण मनाला अनावश्यकच निरनिराळ्या मार्गात प्रवृत्त करतो आणि यामुळेच आपले मन समाधानी होण्याची शक्यताच नसते. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे, आनंदमयी कथांनी युक्त अशा वेद, पुराण, महाभारत इत्यादींमध्ये मनाला संलग्न करणे होय. मनुष्य वैदिक ज्ञानाचा लाभ घेऊन शुद्ध बनू शकतो. मनामध्ये दुटप्पीपणा असू नये. सदैव इतरांचे हितचिंतन करावे. मौन म्हणजे सदैव आत्मानुभूतीचा विचार करणे होय. या दृष्टीने पाहिल्यास कृष्णभावनाभावित मनुष्य यथार्थ रूपाने मौनी असतो. मनाला इंद्रियोपभोगापासून विरक्त करणे म्हणजेच मनोनिग्रह होय. मनुष्याने आपल्या व्यवहारामध्ये सरळ आणि साधे असावे यामुळे त्याचे जीवन शुद्ध होते. या सर्व क्रियांचा समावेश मानसिक तपामध्ये होतो.