No edit permissions for मराठी

TEXT 20

na jāyate mriyate vā kadācin
nāyaṁ bhūtvā bhavitā vā na bhūyaḥ
ajo nityaḥ śāśvato ’yaṁ purāṇo
na hanyate hanyamāne śarīre

-कधीही नाही; जायते - जन्म घेतो; म्रियते - मृत होतो; वा-अथवा; कदाचित् - कोणत्याही काळी (भूत, वर्तमान आणि भविष्य); - कधीच नाही; अयम् - हा; भूत्वा - होऊन; भविता - होणारा; वा- अथवा; -नाही; भूय:- अथवा पुन्हा होणार आहे; अज:- अजन्मा; नित्य:- शाश्वत; शाश्वत:- स्थायी; अयम्- हा; पुराण:- सर्वांत प्राचीन किंवा पुरातन; - कधीच नाही; हन्यते - मारला जातो; हन्यमाने - मारले गेल्यावरही; शरीरे - शरीराचा.

कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य अस्तित्वा असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही.

तात्पर्य : गुणात्मकदृष्ट्या परमात्म्याचा सूक्ष्म अणुरुप अंश आणि परमात्मा एकरूप आहेत. शरीराप्रमाणे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. काही वेळा आत्म्याला कुटस्थ किंवा स्थिर असे म्हटले जाते. शरीरामध्ये सहा प्रकारची स्थित्यंतरे होतात. शरीर मातेच्या गर्भातून जन्म घेते, काही काळासाठी राहते, त्याची वाढ होते, त्यापासून काही परिणाम उत्पन्न होतात, हळूहळू त्याची झीज होते आणि शेवटी लुप्त होते; परंतु आत्मा अशा परिवर्तनातून जात नाही. आत्म्याचा जन्म होत नसतो; परंतु तो एक भौतिक शरीर धारण करीत असल्यामुळे त्या शरीराचा जन्म होतो. त्या ठिकाणी आत्मा जन्म घेत नाही आणि मरतही नाही. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू हा निश्चितपणे आहे आणि आत्म्याला जन्म नसल्यामुळे त्याला भूत, वर्तमान आणि भविष्यही नाही. आत्मा हा सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन अर्थात, ज्याचा जन्म झाला आहे अशी इतिहासातही नोंद नाही. शरीराच्या प्रभावाखाली आपण आत्म्याच्या जन्माचा इतिहास वगैरे शोधत असतो. शरीराप्रमाणे कोणत्याही काळी आत्मा वृद्ध होत नाही म्हणूनच तथाकथित वृद्ध मनुष्याला बालपणातील किंवा तारुण्यातील चैतन्य आपल्यातही आढळून येते. शरीरातील होणाऱ्या बदलांचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही.वृक्ष किंवा इतर कोणतीही भौतिक गोष्ट ज्याप्रमाणे क्षीण होते त्याप्रमाणे आत्मा क्षीण होत नाही. आत्म्यापासून इतर उपफलेही निर्माण होत नाहीत. शरीरापासून उत्पन्न होणारी उपफले म्हणजे मुलेबाळे आहेत व ती म्हणजे विविध स्वतंत्र जीवात्मेच असतात आणि केवळ शरीराच्या प्रभावामुळेच ती विशिष्ट मनुष्याची आहेत असे वाटतात. आत्म्याच्या उपस्थितीमुळे शरीराची वाढ होते; पण आत्म्याला उपफले नसतात किंवा त्याच्यामध्ये स्थित्यंतरही होत नाही. म्हणून आत्मा हा सहा प्रकारच्या शारीरिक स्थित्यंतरांच्या पलीकडे असतो.

कठोपनिषदातही (1.2.18) याच प्रकारचा श्‍लोक आपल्याला आढळतो.

न जायते म्रियते वा विपश्चिन्नायं कुताश्चिन्नं बभूव कश्चित् ।
अजो नित्य: शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे॥

     या श्लोकाचा अर्थ आणि आशय हा भगवद्गीतेत असणाऱ्या श्‍लोकाप्रमाणेच आहे, पण या श्‍लोकामध्ये एक विपश्चित् हा एक विशिष्ट शब्द आहे. त्याचा अर्थ विद्वान किंवा ज्ञानमय असा होतो.

     आत्मा हा पूर्ण ज्ञानमय आणि नित्य पूर्ण चेतनेने युक्त असतो. म्हणून चेतना हे आत्म्याचे लक्षण आहे. हृदयस्थ आत्म्याला जरी कोणी शोधू शकत नसला तरी तो आत्म्याची उपस्थिती केवळ चेतनेच्या उपस्थितीवरूनही जाणू शकतो. कधीकधी आकाशातील ढगामुळे किंवा इतर काही कारणास्तव आपल्याला सूर्य दिसू शकत नाही. तरीही सूर्याचा प्रकाश त्या ठिकाणी नेहमी असतो आणि आपली खात्री होते की, ही दिवसाची वेळ आहे. अगदी पहाटे थोडासा प्रकाश जरी आकाशात दिसला तरी सूर्य आकाशात आहे असे आपण समजू शकतो. त्याप्रमाणे सर्व शरीरांमध्ये मग तो मानव असो अथवा पशू असो, सर्वांमध्ये चेतना ही असतेच आणि यावरून आपण आत्म्याची उपस्थिती जाणू शकतो. तरही आत्म्याची ही चेतना परमात्म्याच्या चेतनेहून भिन्न आहे कारण परमात्म्याला भूत, वर्तमान आणि भविष्य या सर्वांचे पूर्ण ज्ञान असते. व्यक्तिगत जीवात्म्याच्या चेतनेचा, विस्मरणशील होण्याकडें कल असतो. जेव्हा तो आपल्या वास्तविक स्वरुपाला विसरतो तेव्हा तो श्रीकृष्णाच्या दिव्य उपदेशांद्वारे ज्ञान आणि प्रबुद्धता प्राप्त करतो. परंतु जीवात्म्याप्रमाणे श्रीकृष्ण विस्मरणशील नसतात, जर ते विस्मरणशील असते तर भगवद्गीतेतील श्रीकृष्णांची शिकवणूक निरुपयोगी झाली असती.

     आत्म्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे सूक्ष्म अणुरुप आत्मा आणि दुसरा म्हणजे परमात्मा किंवा विभुआत्मा. याची सुद्धा कठोपनिषदात (1.2.20) पुढीलप्रमाणे पुष्टी करण्यात आली आहे.

अणोरणीयान्महतो महीयानात्मास्य जन्तोर्निहितो गुहायाम् ।
तमक्रतु: पश्यति वीतशोको धातु: प्रसादान्महिमानमात्मन:॥

     ‘‘परमात्मा आणि जीवात्मा दोघेही जीवाच्या एकाच वृक्षरुपी शरीरामधील हृदयामध्ये स्थित आहेत. जो भौतिक इच्छा व शोक यामधून मुक्त झाला आहे केवळ तोच भगवद्कृपेने आत्म्याचा महिमा जाणू शकतो.’’ पुढील अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे  श्रीकृष्ण हे परमात्म्याचेही उगमस्थान आहेत आणि आपले मूळ स्वरूप विसरणारा अर्जुन हा अणुरुप जीवात्मा आहे. म्हणून त्याला श्रीकृष्ण किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून (आध्यात्मिक गुरु) ज्ञान-प्राप्ती करून घेणे आवश्यक आहे.

« Previous Next »