No edit permissions for मराठी

TEXT 60

yatato hy api kaunteya
puruṣasya vipaścitaḥ
indriyāṇi pramāthīni
haranti prasabhaṁ manaḥ

यतत:- प्रयत्न करीत असताना; हि-निश्चितपणे; अपि-तरीसुद्धा; कौन्तेय- हे कौंतेय; पुरुषस्य- पुरुषाचे; विपश्चित:- तारतम्य, विवेकपूर्ण; इन्द्रियाणि- इंद्रिये; प्रमाथीनि-उच्छृंखल; हरन्ति: -हरवून टाकतात; प्रसभम्-जबरदस्तीने,  बळजबरीने; मन:- मनाला.

इंद्रिये इतकी प्रबळ आणि उच्छृंखल आहेत की, हे अर्जुना! इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरूषाच्या मनाला सुद्धा ती बळजबरीने ओढून नेतात.

तात्पर्य : असे अनेक विद्वान ऋषी, तत्वज्ञानी आणि अध्यात्मवादी आहेत. जे इंद्रियांवर विजय मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांच्या दृढ प्रयत्नानेही त्यांच्यातील सर्वांत श्रेष्ठ असा व्यक्तीही  क्षुब्ध मनामुळे भौतिक इंद्रियोपभोगाला कधीकधी बळी पडतो. विश्‍वामित्रासारखे महर्षी आणि परिपूर्ण असे योगी जरी कठोर तपश्चर्या आणि योगाच्या आचरणाद्वारे इंद्रियनिग्रह करण्याचा प्रयत्न करीत होते तरी त्यांना मेनकेने लैंगिक सुखासाठी भुलविले. अर्थातच जागतिक इतिहासामध्ये याच प्रकारच्या इतर अनेक घटना आढळून येतात. म्हणून पूर्णपणे कृष्णभावनाभावित झाल्याशिवाय मन आणि इंद्रियांना नियंत्रित करणे अत्यंत कठीण आहे. मनाला श्रीकृष्णांच्या ठायी पूर्णपणे रममाण केल्याशिवाय अशा भौतिक कार्यांमधून निवृत्त होणे मनुष्याला अशक्यप्राय आहे. महान संत आणि भक्त श्रीयमुनाचार्य यांनी एक प्रत्यक्ष उदाहरण दिले आहे. ते म्हणतात.

यदवधि मम चेत: कृष्णपदारविन्दे
नवनवरसधामन्युद्यतं रन्तुमासीत् ।
तदविध बत नारीसंगमे स्मर्यमाने
भवति मुखविकार: सुष्ठु निष्ठीवनं च॥

     ‘‘माझे मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांमध्ये रममाण झाल्यापासून आणि नित्य नवीन दिव्य रसाचे आस्वादन करीत असल्यापासून, जेव्हा पण मी एखाद्या स्त्रीबरोबर लैंगिक सुखाचा विचार करतो तेव्हा तात्काळ माझे मुख विकाराने भरून त्या विचारावर मी थुंकतो.’’

     कृष्णभावना ही इतकी दिव्य गोष्ट आहे की, भौतिक उपभोगाबद्दलची रुची आपोआपच नाहीशी होते. एखाद्या भुकेल्या मनुष्याने पुरेपुर पौष्टिक अन्नपदार्थ खाऊन आपली भूक भागविल्याप्रमाणेच ही कृष्णभावना आहे. महाराज अंबरीष यांचे मन केवळ कृष्णभावनेमध्ये रममाण झाल्यानेच त्यंनी महान योगी दुर्वास मुनी यांच्यावर विजय प्राप्त केला होता. (स वै मन: कृष्णपदारविन्दयो: वचांसि वैकुण्ठगुणानुवर्णने)

« Previous Next »