TEXT 72
eṣā brāhmī sthitiḥ pārtha
naināṁ prāpya vimuhyati
sthitvāsyām anta-kāle ’pi
brahma-nirvāṇam ṛcchati
एषा-ही; ब्राह्मी- आध्यात्मिक; स्थिति:- स्थिती; पार्थ - हे पार्थ; न-कधीच नाही; एनम्- ह्या; प्राप्य- प्राप्त होऊन; विमुह्यति-मोहित होतो; स्थित्वा-अशा रीतीने स्थित होऊन; अस्याम्- अशा या; अन्त-काले-मृत्यूच्या शेवटच्या क्षणी; अपि- सुद्धा; ब्रह्म-निर्वाणम् - भगवंतांचे आध्यात्मिक विश्व, भगवद्धाम; ऋच्छति-प्राप्त होते.
आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवद्धामात प्रवेश करू शकतो.
तात्पर्य: मनुष्याला कृष्णभावनेची किंवा दैवी जीवनाची प्राप्ती त्वरीत एका क्षणातही होऊ शकते किंवा त्याला लक्षावधी जन्मांनंतरही कृष्णभावनेची प्राप्ती होऊ शकणार नाही. ही फक्त सत्य जाणून घेण्याची आणि सत्याचा स्वीकार करण्याची बाब आहे. श्रीकृष्णांना शरण जाऊन खटवांग महाराजांनी जीवनाच्या या स्थितीची प्राप्ती आपल्या मृत्यूच्या केवळ काही क्षणापूर्वीच केली. निर्वाण म्हणजे भौतिक जीवनाचा अंत करण्याचा मार्ग होय. बौद्ध तत्वज्ञानानुसार भौतिक जीवन संपल्यानंतर केवळ शून्यच उरतो; पण भगवद्गीतेची शिकवण निराळी आहे. वास्तविक जीवनाचा प्रारंभ भौतिक जीवन संपल्यावर होतो. जे स्थूल भौतिकवादी असतात त्यांना इतके जाणणे पुरेसे असते की, या भौतिकवादी जीवनाचा शेवट केला पाहिजे. परंतु जे आध्यात्मिकदृष्टया प्रगत असतात, त्यांच्यासाठी या भौतिक जीवनानंतर निराळे असे दुसरे जीवन असते. या जीवनाचा अंत होण्यापूर्वी सुदैवाने एखादा जर कृष्णभावनाभावित झाला तर त्याला त्वरित ब्रह्मनिर्वाणाची स्थिती प्राप्त होते. भगवद्धाम आणि भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा यामध्ये काहीच फरक नाही. भक्तिपूर्ण सेवा आणि भगवद्धाम दोन्हीही परम किंवा आध्यात्मिक स्तरावर असल्याने भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होणे म्हणजेच भगवद्धामाची प्राप्ती केल्याप्रमाणे आहे. भौतिक जगतामध्ये इंद्रियतृप्तीसाठी कर्म केले जाते तर आध्यात्मिक जगतामध्ये कृष्णभावनाभावित कर्म केले जाते. या जीवनात सुद्धा कृष्णभावनेची प्राप्ती म्हणजेच त्वरित ब्रह्मप्राप्ती होय आणि जो कृष्णभावनेमध्ये स्थित आहे त्याने निश्चितपणे भगवद्धामात पूर्वीच प्रवेश केला आहे.
ब्रह्म हे जडतत्त्वाच्या अगदी विरुद्ध आहे म्हणून ब्राह्मीस्थिती म्हणजे ‘भौतिक कर्मांच्या स्तरावर नसणे.’ भगवद्गीतेमध्ये भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेचा मोक्षावस्था म्हणून स्वीकार करण्यात आला आहे. (स गुणान्समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते) म्हणून ब्राह्मी स्थिती म्हणजे भौतिक बंधनातून मुक्तता होय.
श्रील भक्तिविनोद ठाकूर यांनी हा भगवद्गीतेचा दुसरा अध्याय म्हणजे संपूर्ण ग्रंथाचा सारांश आहे असे म्हटले आहे. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे भगवद्गीतेमधील विषय आहेत. दुसऱ्या अध्यायात कर्मयोग आणि ज्ञानयोग यांची स्पष्टपणे चर्चा करण्यात आली आहे आणि ग्रंथांच्या निरुपणातील भक्तियोगाचे दर्शनही घडविले आहे.
या प्रकारे भगवद्गीतेच्या ‘सांख्ययोग’ या दुसऱ्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.