TEXT 19
tasmād asaktaḥ satataṁ
kāryaṁ karma samācara
asakto hy ācaran karma
param āpnoti pūruṣaḥ
तस्मात्-म्हणून; आसक्त:- आसक्तीरहित; सततम्-सतत; कार्यम्-कर्तव्य म्हणून; कर्म-कर्म; समाचार-कर; असक्त:- अनासक्त होऊन; हि-निश्चितच; आचरन्-करीत असताना; कर्म-कर्म; परम्-परमेश्वर, भगवान; आप्नोति-प्राप्ती करतो; पूरुष:- मनुष्य.
म्हणून कर्मफलांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वरप्राप्ती होते.
तात्पर्य: भक्तासाठी पुरूषोत्तम श्रीभगवान सर्वांत श्रेष्ठ आहेत तर निर्विशेषवाद्यांसाठी मोक्ष किंवा मुक्ती सर्वांत श्रेष्ठ आहे. म्हणून जो मनुष्य योग्य मार्गदर्शनाखाली कर्मफलांवर आसक्ती न ठेवता श्रीकृष्णांप्रीत्यर्थ किंवा कृष्णाभावनाभावित कर्म करीत असतो तो निश्चितच जीवनाच्या सर्वश्रेष्ठ ध्येयाप्रत प्रगती करीत असतो. कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाला श्रीकृष्णांप्रीत्यर्थ युद्ध करण्यास सांगण्यात आले. कारण त्याने युद्ध करावे अशी श्रीकृष्णांची इच्छा होती. सज्जन असणे किंवा अहिंसक असणे ही वैयक्तिक आसक्तीची बाब आहे; परंतु परमेश्वरासाठी कर्म करणे म्हणजे फलांची अपेक्षा न ठेवता कर्म करणे होय. पुरूषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले कर्म म्हणजे सर्वोच्च दर्जाचे परिपूर्ण कर्म होय.
यज्ञकर्मासारखी वैदिक कर्मकांडे ही इंद्रियतृप्तीच्या क्षेत्रात केलेल्या पापकर्मांचे शुद्धीकरण होण्यासाठी केली जातात; परंतु कृष्णभावनाभावित कर्म हे शुभाशुभ कर्मफलांच्या पलीकडे असणारे दिव्य कर्म असते. कृष्णभावनाभावित मनुष्याला कर्मफलांवर मुळीच आसक्ती नसते, कारण तो केवळ श्रीकृष्णांप्रीत्यर्थ कर्म करीत असतो. तो सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरीही पूर्णपणे अनासक्तच असतो.