No edit permissions for मराठी

TEXT 41

tasmāt tvam indriyāṇy ādau
niyamya bharatarṣabha
pāpmānaṁ prajahi hy enaṁ
jñāna-vijñāna-nāśanam

तस्मात्-म्हणून; त्वम्-तू; इन्द्रियाणि-इंद्रिये; आदौ-आरंभी; नियम्य-नियमित करून; भरत-ऋषभ-हे भरतवंशीयामधील श्रेष्ठा; पाप्मानम्- पापाचे महान प्रतीक; प्रजहि-निग्रह किंवा दमन कर; हि-निश्चितच; एनम्-या; ज्ञान-ज्ञानाचे; विज्ञान-विशुद्ध आत्म्याचे वैज्ञानिक ज्ञान; नाशनम्-विनाश करणारा.

म्हणून हे भरतर्षभ अर्जुन! इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा (काम) प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर.

तात्पर्य: भगवंतांनी अर्जुनाला प्रथमपासूनच इंद्रियसंयमन करण्याचा सल्ला दिला ज्यामुळे तो महान पापमय शत्रूचा, कामाचा निग्रह करू शकेल. हा काम आत्मसाक्षात्काराची तीव्र इच्छा तसेच आत्म्याचे ज्ञान नष्ट करतो. ज्ञान म्हणजे, इतर गोष्टींहून भिन्न असणाऱ्या आत्म्याचे ज्ञान किंवा आत्मा म्हणज शरीर नव्हे हे ज्ञान होय. ‘विज्ञान’ म्हणजे आत्म्याची स्वरुपस्थिती आणि त्याचा परमात्म्याशी संबंध याचे विशिष्ट ज्ञान होय. याचे वर्णन श्रीमद्भागवतात (2.9.31) पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे:

ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितम्।
सरहस्यं तदङ्ग च गृहाण गदितं मया॥

     ‘‘आत्मा आणि परमात्मा यांचे ज्ञान अत्यंत गुह्य आणि रहस्यमय आहे. असे ज्ञान आणि विज्ञान (अनुभूती) त्यांच्या विविध रूपांसहित जर स्वत: भगवंतांनी विवेचन करून सांगितले तरच ते जाणणे शक्य आहे.’’ आत्म्याचे ते सामान्य आणि विशिष्ट ज्ञान श्रीमद्भगवद्गीता आपल्याला देते. जीव हे भगवंतांचे अंश आहेत आणि म्हणून त्यांचे स्वरुप केवळ भगवंतांची सेवा हेच आहे. या भावनेला कृष्णभावना असे म्हटले जाते. म्हणून आयुष्याच्या अगदी आरंभापासूनच कृष्णभावनेचे शिक्षण घेतले पाहिजे. त्यायोगे त्याला पूर्णपणे कृष्णभावनाभावित होऊन कर्म करता येईल.

     जीवांसाठी स्वाभाविक असणाऱ्या भगवत्प्रेमाचे विकृत स्वरुप म्हणजे काम होय, परंतु जर मनुष्याला अगदी आरंभापासून कृष्णभावनेमध्ये प्रशिक्षित केले तर स्वाभाविक भगवत्प्रेमाची अधोगती भौतिक कामामध्ये होणार नाही. जेव्हा भगवत्प्रेमाची कामविकारामध्ये अधोगती होते तेव्हा पुन्हा पूर्वस्थितीवर येणे अत्यंत कठीण असते. तरीही कृष्णभावना इतकी प्रभावशाली आहे की, कृष्णभावनेचा उशिरा प्रारंभ करणाराही भक्तीच्या नियामक तत्त्वांचे पालन करून भगवत्प्रेमी बनू शकतो. म्हणून जीवनाच्या कोणत्याही अवस्थेतून किंवा कृष्णभावनेचे महत्व जाणण्याच्या वेळेपासून मनुष्य कृष्णभावनेद्वारे अथवा भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेद्वारे, इंद्रियनियमन  करण्यास प्रारंभ करू शकतो. या प्रकारे मनुष्य, जीवनाच्या परिपूर्ण अवस्थेमध्ये म्हणजेच भगवत्प्रेमामध्ये कामाचे रुपांतर करू शकतो.

« Previous Next »