No edit permissions for मराठी

TEXT 40

indriyāṇi mano buddhir
asyādhiṣṭhānam ucyate
etair vimohayaty eṣa
jñānam āvṛtya dehinam

इन्द्रियाणि - इंद्रिये; मन-मन; बुद्धि:- बुद्धी; अस्य-या कामाचे; अधिष्ठानम्-निवासस्थान; उच्यते-म्हटले जाते; एतै:- या सर्वांच्या योगाने; विमोहयति- मोहित करतो; एष:-हा काम; ज्ञानम्-ज्ञान; आवृत्य-आच्छादून; देहिनम्-देहधारी जीवाचे.

इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहेत. यांच्याद्वारे काम आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाला आच्छादित करतो आणि त्याला मोहित करतो.

तात्पर्य: शत्रूने बद्ध जीवाच्या शरीरातील निरनिराळी महत्त्वाची ठिकाणे काबीज केली आहेत. म्हणून ज्या मनुष्याला या शत्रूंवर विजय प्राप्त करावयाचा आहे त्याने शत्रू कोठे सापडेल हे जाणावे यासाठीच भगवान श्रीकृष्ण शत्रूची ठिकाणे सूचित करीत आहेत. मन हे इंद्रियांच्या सर्व कृतींचे केंद्रबिंदू आहे. जेव्हा आपण इंद्रियविषयाबद्दल ऐकतो तेव्हा साधारणपणे मन हे इंद्रियतृप्तीबद्दलच्या सर्व कल्पनांचे आगर बनते व परिणामी मन आणि इंद्रिये कामाची भांडारे बनतात. नंतर बुद्धिविभाग अशा कामप्रवृत्तींचे भांडवल बनतो. बुद्धी ही जीवात्म्यांची अत्यंत निकटवर्ती आहे, कामुक बुद्धीच आत्म्याला मिथ्या अहंकार प्राप्त करण्यासाठी, कामुक प्रवृत्तींशी तसेच मन आणि इंद्रियांशी तादात्म्य करण्यास प्रभावित करते. आत्मा भौतिक इंद्रियांचा भोग करण्याच्या अधीन होतो व चुकीने त्यातच वास्तविक सुख आहे असे समजतो. आत्म्याच्या या मिथ्या तादात्म्याबद्दल श्रीमद्भागवतात (10.84.13) सुंदर विवेचन करण्यात आले आहे.

यस्यात्मबुद्धि: कुणपे त्रिधातुके स्वधी: कलत्रादिषु भौम इज्यधी:॥
यत्तीर्थबुद्धि: सलिले न कर्हिचिज्जनेष्वभिज्ञेषु स एव गोखर:॥

     ‘‘जो मनुष्य या त्रिधातू शरीरालाच आत्मा समजतो, शरीराच्या उपफलांना स्वत:चे नातलग मानतो, आपले जन्मस्थान पूजनीय मानतो आणि दिव्य ज्ञानी पुरुषांना भेटण्याऐवजी केवळ स्नान करण्यासाठीच तीर्थस्थळांची यात्रा करतो तो एखाद्या गाढवाप्रमाणे किंवा गायीप्रमाणे आहे.’’

« Previous Next »