No edit permissions for मराठी

TEXT 40

ajñaś cāśraddadhānaś ca
saṁśayātmā vinaśyati
nāyaṁ loko ’sti na paro
na sukhaṁ saṁśayātmanaḥ

अज्ञ:- प्रमाणित शास्त्रांचे ज्ञान नसलेला मूर्ख मनुष्य; -आणि; अश्रद्दधान:- शास्त्रांविषयी ज्यांना श्रद्धा नाही; -सुद्धा; संशय-संशयी; आत्मा-मनुष्य; विनश्यति-पतन होते; -कधीच नाही; अयम्-या; लोक:- जग; अस्ति-आहे; -नाही; पर:- पुढील जन्मी; न- नाही; सुखम्-सुख; संशय-संशयी; आत्मन:- मनुष्याला.

परंतु, प्रमाणित शास्त्रांबद्दल संशयी असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना भगवद्भावनेची प्राप्ती होत नाही, तर त्यांचे पतन होते. संशयी आत्म्याला या लोकामध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही.

तात्पर्य: अनेक प्रमाणित आणि आदर्श शास्त्रांपैकी भगद्गीता ही सर्वोत्तम आहे. पशुवत मनुष्यांना प्रमाणित शास्त्रांवर विश्‍वासही नसतो आणि त्यांचे ज्ञानही नसते आणि त्यांच्यापैकी काही लोकांना जरी शास्त्रांचे ज्ञान असले किंवा शास्त्रांमधील संदर्भ देता येत असले तरी त्यांची वास्तविकपणे शास्त्रांवर श्रद्धाच नसते. इतरांचा जरी भगवद्गीतेसारख्या शास्त्रांवर विश्‍वास असला तरी त्यांचा भगवान श्रीकृष्णांवर किंवा श्रीकृष्णांच्या भक्तिपूर्ण सेवेबद्दल विश्‍वास नसतो. अशा मनुष्यांना कृष्णभावनेचे काहीच ज्ञान नसल्यामुळे त्यांचे पतन होते. वर सांगितलेल्या सर्व मनुष्यांपैकी जे श्रद्धाहीन आणि संशयी आहेत, ते मुळीच प्रगती करू शकत नाहीत. भगवंतांवर आणि भगवंतांच्या शब्दज्ञानावर श्रद्धा नसलेल्या व्यक्तींचे या इहलोकात किंवा परलोकातही कल्याण होत नाही. त्यांना कोणत्याच प्रकारची सुखप्राप्ती होत नाही. म्हणून मनुष्याने श्रद्धापूर्वक, शास्त्रांमधील विधींचे पालन करून त्यायोगे ज्ञानस्तर प्राप्त केल पाहिजे. केवळ हेच ज्ञान त्याला आध्यात्मिक ज्ञानाच्या दिव्य स्तराची प्राप्ती करण्यास साहाय्यकारक ठरते. दुसऱ्या शब्दांत सांगावयचे तर, संशयखोर मनुष्यांना आध्यात्मिक उद्धाराच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे स्थान नाही. म्हणून व्यक्तींने गुरुशिष्य परंपरेतील महान आचार्यांच्या चरणचिह्नांचे अनुसरण करून यशप्राप्ती केली पाहिजे.

« Previous Next »