TEXT 8
paritrāṇāya sādhūnāṁ
vināśāya ca duṣkṛtām
dharma-saṁsthāpanārthāya
sambhavāmi yuge yuge
परित्राणाय-उद्धार करण्यासाठी;साधूनाम- भक्तांचा; विनाशाय- विनाश करण्याकरिता; च-आणि; दुष्कृताम्-दुर्जन किंवा दुष्टांचा; धर्म-धर्मतत्वे; संस्थापन-अर्थाय- पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी; सम्भवामि- मी प्रकट होतो; युगे- युग; युगे-युगानंतर
भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्मांची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वत: युगायुगात प्रकट होतो.
तात्पर्य: भगवद्गीतेनुसार साधू म्हणजे कृष्णभावनाभावित मनुष्य होय. एखादा मनुष्य अधार्मिक आहे असे दिसू शकते; पण जर तो कृष्णभावनेच्या गुणांनी संपूर्णपणे युक्त असेल तर त्याला साधू समजले पाहिजे आणि जे कृष्णभावनेची मुळीच पर्वा करीत नाहीत, त्यांना दुष्कृताम् हा शब्द लागू पडतो. असे दुष्ट किंवा दुष्कृताम् लोक भौतिक शिक्षणाने जरी विभूषित असले तरी त्यांचे वर्णन मुर्ख आणि मानवजातीतील अत्यंत निकृष्ट म्हणून करण्यात आले आहे. परंतु जे पूर्णपणे कृष्णभावनेमध्ये संलग्न आहेत ते जरी अशिक्षित किंवा असंस्कृत असले तरी त्यांना साधू म्हणून मानले पाहिजे. नास्तिक लोकांबद्दल सांगावयाचे तर, ज्याप्रमाणे रावण किंवा कंस या असुरांचा विनाश करण्यासाठी स्वत: भगवंतांना अवतरित व्हावे लागले त्याप्रमाणे नास्तिक लोकांचा विनाश करण्यासाठी स्वत: अवतरित होण्याची आवश्यकता नाही. असुरांचा विनाश करण्यास समर्थ असे भगवंतांचे अनेक प्रतिनिधी आहेत, परंतु आपल्या अनन्य भक्तांच्या सांत्वनार्थ ते विशेषकरून अवतरित होतात, कारण आसुरी लोक भक्तांचा नेहमी छळ करीत असतात. एखादा भक्त जरी असुरांचा नातलग असला तरी असुरांकडून त्या भक्ताचा छळ होतो. प्रल्हाद महाराज जरी हिरण्यकशिपूचे पुत्र असले तरी त्यांच्या पित्याकडून त्यांचा छळ झालाच, श्रीकृष्णांची माता देवकी जरी कंसाची बहीण असली तरी तिचा आणि तिचे पती वसुदेव यांचा कंसाने एवढ्याचसाठी छळ केला की, त्यांच्या पोटी श्रीकृष्णांचा जन्म होणार होता. म्हणून भगवान श्रीकृष्ण मुख्यत: कंसाचा वध करण्यापेक्षा देवकीचा उद्धार करण्यासाठी अवतरित झाले. पण दोन्ही कार्ये त्यांनी एकाच वेळी केली. यास्तव या ठिकाणी सांगण्यात आले आहे की, भक्तांचा उद्धार आणि दुष्ट असुरांचा विनाश करण्याकरिता भगवंत विविध अवतार धारण करतात.
कृष्णदास कविराज कृत चैतन्यचरितामृतात खालील श्लोकामध्ये अवतारविषयक तत्वांचा सारांश दिला आहे. (मध्य (2.263-264)
सृष्टीहेतू एइ मूर्ति प्रपञ्चे अवतरे।
सेइ ईश्वरमूर्ति ‘अवतार’ नाम धरे॥
मायातीत परव्योमे सबार अवस्थान।
विश्वे अवतरि धेर ‘अवतार’ नाम॥
‘‘भौतिक सृष्टीत प्रकट होण्याकरिता भगवद्धामातून भगवंतांचा अवतार होतो. याप्रमाणे भगवंतांचे जे विशिष्ट रूप अवर्तीण होते यालाच ‘अवतार’ म्हटले जाते. असे अवतार भगवद्धामात-परव्योमात स्थित असतात. ते जेव्हा भौतिक सृष्टीत प्रकट होतात तेव्हा त्यांना अवतार म्हणून संबोधले जाते.’’
पुरुषावतार, गुणावतार, लीलावतार, शक्त्यावेश अवतार, मन्वन्तर अवतार आणि युगावतार असे अवतारांचे विविध प्रकार आहेत आणि ते सर्व संपूर्ण विश्वामध्ये ठरावीक वेळी अवतरित होत असतात, पण भगवान श्रीकृष्ण हेच आद्युपुरुष आहेत आणि तेच सर्व अवतारांचे मूळ आहेत. भगवान श्रीकृष्ण आपल्या विशुद्ध भक्तांच्या दु:खाचे निवारण करण्यासाठी विशेषकरून अवतरित होतात. हे शुद्ध भक्त भगवंतांना त्यांच्या मूळ वृंदावन लीलांमध्ये पाहण्यास अत्यंत उत्सुक असतात. म्हणून कृष्णावताराचे मुख्य प्रयोजन त्यांच्या अनन्य भक्तांना संतुष्ट करणे हे आहे.
भगवंत सांगतात की, ते प्रत्येक युगात अवतीर्ण होतात. यावरून दर्शित होते की, कलियुगातही ते अवतरित होतात. श्रीमद्भागवतात सांगितल्याप्रमाणे कलियुगातील अवतार म्हणजे भगवान श्री चैतन्य महाप्रभू आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंनी संकीर्तन आंदोलनाद्वारे (सामुहिक पवित्र हरिनामाचे कीर्तन) कृष्णभक्तीचा प्रसार केला आणि संपूर्ण भारतभर कृष्णभावना पसरविली. त्यांनी भविष्यवाणी केली की, या संकीर्तन आंदोलनाचा प्रचार जगामध्ये सर्वत्र, नागरीनगरी आणि खेडोपाडी होईल. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा, भगवान श्रीकृष्णांचे अवतार म्हणून उपनिषदे, महाभारत, भागवत इत्यादी शास्त्रांच्या गोपनीय प्रकरणांत, प्रत्यक्षपणे नव्हे तर गुप्त वर्णन करण्यात आले आहे. श्री चैतन्य महाप्रभूंच्या संकीर्तन आंदोलनाद्वारे भगवान श्रीकृष्णांचे भक्त अत्यंत आकर्षित होतात. भगवंतांचा हा अवतार दुष्टांचा वध करीत नाही तर आपल्या अहैतुकी कृपेद्वारे त्यांचा उद्धार करतो.