No edit permissions for मराठी

TEXT 2

yaṁ sannyāsam iti prāhur
yogaṁ taṁ viddhi pāṇḍava
na hy asannyasta-saṅkalpo
yogī bhavati kaścana

 
यम्-ज्याला; सन्न्यासम्-संन्यास; इति-याप्रमाणे; प्राहु:-ते म्हणतात; योगम्-योग, परब्रह्माशी युक्त होणे; तम्-ते; विद्धि-तू जाण; पाण्डव-हे पांडुपुत्र; -कधीच नाही; हि-निश्‍चितच; आसन्न्यस्त-त्याग न करता; सङ्कल्प:-स्वतृप्तीची इच्छा; योगी-योगी; भवति-होतो; कश्चन-कोणीही.

हे पांडुपुत्रा! ज्याला संन्यास म्हणतात तोच योग किंवा ब्रह्माशी युक्त होणे होय. कारण जोपर्यंत मनुष्य इंद्रियतृप्तीच्या इच्छेचा त्याग करीत नाही तोपर्यंत तो योगी होऊच शकत नाही.

तात्पर्य: वास्तविक संन्यास योग किंवा भक्ति म्हणजे, मनुष्याने जीवात्मा म्हणून आपली स्वरुपस्थिती जाणून आणि त्याप्रमाणे कार्य करणे होय. जीवाला आपले स्वतंत्र अस्तित्व नसते. जीव म्हणजे भगवंतांची तटस्था शक्ती आहे. जेव्हा तो भौतिक शक्तीद्वारे वश होतो, तेव्हा तो बद्ध होतो आणि जेव्हा तो कृष्णभावनाभावित होतो किंवा त्याला आध्यात्मिक शक्तीची जाणीव होते तेव्हा तो आपल्या वास्तविक आणि स्वाभाविक स्वरुपस्थितीमध्ये स्थित होतो. म्हणून मनुष्य जेव्हा परिपूर्ण ज्ञानाने युक्त होतो तेव्हा तो सर्व प्रकारची इंद्रियतृप्ती किंवा इंद्रियतृप्ती करविणाऱ्या कर्मांना थांबवितो. याचाच अभ्यास भौतिक आसक्ती रोखणारे योगिजन करतात, परंतु कृष्णभावनाभावित व्यक्तसाठी, श्रीकृष्णांच्या सेवेव्यतिरिक्त इतर कुठेही आपल्या इंद्रियांना युक्त करण्याची शक्यताच नसते. म्हणून ती एकाच वेळी संन्यासी आणि योगी असते. ज्ञान आणि योगपद्धतीमध्ये सांगितल्याप्रमाणे, ज्ञानप्राप्ती आणि इंद्रिये संयमित करण्याचा हेतू हा कृष्णभावनेमध्ये आपोआच साध्य होते. जर मनुष्य स्वार्थ वृत्तीने प्रेरित झालेल्या कर्माचा त्याग करण्यामध्ये समर्थ नसेल तर ज्ञान आणि योगापासून काहीच लाभ होत नाही. जीवाचे वास्तविक ध्येय म्हणजे सर्व स्वार्थतृप्त्यर्थ कर्माचा त्याग करणे आणि भगवत्संतुष्टीप्रीत्यर्थ कर्म करण्यास तयार होणे हे आहे. कृष्णभावनाभावित मनुष्याला स्वत: आनंदाचा उपभोग घेण्याची मुळीच इच्छा नसते. तो सतत भगंवंताच्या आनंदप्रीत्यर्थ कर्म करण्यास संलग्न असतो. म्हणून ज्या मनुष्याला भगवंतांचे मुळीच ज्ञान नसते तो निश्‍चितच स्वार्थरत असतो, कारण कोणीही निष्क्रिय राहूच शकत नाही. कृष्णभावनेच्या आचरणाद्वारे सर्व हेतू पूर्णपणे साध्य होतात.

« Previous Next »