TEXT 7
jitātmanaḥ praśāntasya
paramātmā samāhitaḥ
śītoṣṇa-sukha-duḥkheṣu
tathā mānāpamānayoḥ
जित-आत्मन:- ज्याने मनावर विजय मिळविला आहे; प्रशान्तस्य - मनावरील अशा संयमामुळे ज्याने शांती प्राप्त केली आहे; परम-आत्मा- परमात्मा; समाहित:- पूर्णपणे प्राप्त झालेला; शीत-थंडीमध्ये; उष्ण-उष्णता; सुख-सुख; दु:खेषु- आणि दु:ख; तथा-सुद्धा; मान- सन्मानात; अपमानयो:- आणि अपमानात.
ज्याने मन जिंकले आहे त्याला परमात्मा प्राप्तच झालेला असतो. त्याने शांती प्राप्त केलेली असते. अशा मनुष्यासाठी सुख आणि दु:ख, शीत आणि उष्ण, मान आणि अपमान, सर्व काही सारखेच असते.
तात्पर्य: प्रत्येकाच्या हृदयात परमात्मारुपाने स्थित असणाऱ्यापुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञांचे पालन करणे हे प्रत्येक जीवाचे वास्तविक लक्ष्य आहे. मन जेव्हा बाह्य मायाशक्तीद्वारे चुकीच्या मार्गाने नेले जाते तेव्हा मनुष्य भौतिक क्रियांमध्ये गुंतला जातो. म्हणून कोणत्याही एका योगाद्वारे मन संयमित केले जाते तेव्हा मनुष्याने ध्येयप्राप्ती केल्याप्रमाणेच आहे. मनुष्याने अधिकारी व्यक्तीच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे. जेव्हा मनुष्याचे मन परा प्रकृतीमध्ये स्थित होते तेव्हा त्याला भगवंतांच्या आज्ञांचे पालन करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय नसतो. मनाला कोणता तरी श्रेष्ठ आदेश मानावा लागतो आणि त्याचे अनुसरण करावेच लागते. मन संयमित करण्याचा परिणाम म्हणजे मनुष्य आपोआपच परमात्म्याच्या आदेशांचे पालन करू लागतो. या दिव्य स्थितीची प्राप्ती कृष्णभावनाभावित मनुष्याला तात्काळ प्राप्त होत असल्यामुळे, भगवद्भक्तावर, सुख आणि दु:ख, शीत आणि उष्ण इत्यादी भौतिक अस्तित्वाच्या द्वंद्वांचा मुळीच परिणाम होत नाही. ही अवस्था म्हणजे प्रत्यक्ष समाधी किंवा परमात्म्याच्या ठिकाणी तल्लीनता होय.