TEXT 12
ye caiva sāttvikā bhāvā
rājasās tāmasāś ca ye
matta eveti tān viddhi
na tv ahaṁ teṣu te mayi
ये-जे; च-आणि; एव-खचित; सात्विका:-सत्वगुणामध्ये; भावा:-भाव; राजसा:- रजोगुणामध्ये; तामसा:-तमोगुणामध्ये; च-सुद्धा; ये-जे; मत्तः-माझ्यापासून; एव-खचित; इति-याप्रमाणे; तान्-त्यांना; विद्धि-जाणण्याचा प्रयत्न कर; न-नाही: तु-परंतु; अहम्-मी ; तेषु-त्यांच्यामध्ये ते-ते मयि-माझ्यामध्ये.
सात्विक, राजसिक किंवा तामसिक, हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत.
तात्पर्य: भौतिक जगतातील सर्व प्राकृतिक क्रिया, तीन प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली होत असतात. या प्राकृतिक गुणांची निर्मिती जरी भगवान श्रीकृष्णांपासून झाली असली तरी श्रीकृष्ण गुणांच्या अधीन नसतात. उदाहरणार्थ, राष्ट्राच्या कायद्यानुसार मनुष्याला शिक्षा होऊ शकते; परंतु कायदे बनविणारा राजा कायद्यांच्या अधीन नसतो. त्याचप्रमाणे भौतिक प्रकृतीचे सत्व रज आणि तम हे तिन्ही गुण भगवान श्रीकृष्णांपासून निर्माण होतात. परंतु भगवान श्रीकृष्ण या गुणांच्या अधीन नाहीत. म्हणून ते निर्गुण आहेत. अर्थात, हे प्राकृतिक गुण जरी भगवंतांपासून प्रकट झाले असले तरी त्यांचा भगवंतांवर कधीही परिणाम होत नाही. भगवंतांचा हा एक विशिष्ट गुण आहे.