No edit permissions for मराठी

TEXT 16

catur-vidhā bhajante māṁ
janāḥ su-kṛtino ’rjuna
ārto jijñāsur arthārthī
jñānī ca bharatarṣabha

चतुः-विधाः--चार प्रकारचे; भजन्ते-सेवा करतातः माम्-माझी; जनाः—लोकः; सु-कृतिनः-जे पुण्यवान आहेत; अर्जुन-हे अर्जुन, आर्त:-आर्त किंवा पीडित; जिज्ञासु-जिज्ञासू, अर्थअर्थी-भौतिक लाभप्राप्तीची इच्छा करणारा; ज्ञानी-जो प्रत्येक गोष्ट यथार्थ रूपात जाणतो; -सुद्धा; भरत-ऋषभ-हे भरतश्रेष्ठ अर्जुना.

हे भरतश्रेष्ठ अर्जुना! चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करीत असतात-आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी.

तात्पर्यः दुष्कृती लोकांहून एकदम विपरीत असे हे लोक शास्त्रांच्या विधिविधानांचे दृढपणे पालन करतात आणि म्हणून यांना सुकृतिनः असे म्हणतात. हे लोक शास्त्रांच्या नियमांचे व नैतिक आणि सामाजिक नियमांचे पालन करतात आणि कमी-अधिक प्रमाणात भगवत्-परायण असतात. अशा लोकांमध्ये चार प्रकार असतात-जे पीडित आहेत, ज्यांना धनाची अभिलाषा आहे, जे जिज्ञासू आहेत आणि जे परम सत्याच्या ज्ञानाच्या शोधात आहेत. असे हे विविध परिस्थितीमध्ये भगवद्भक्ती करण्यासाठी भगवंतांकडे जातात. ते शुद्ध भक्त नसतात, कारण भगवद्भक्ती करण्यामागे त्यांना आपली इच्छापूर्ती करून घेण्याची इच्छा असते. शुद्ध भक्ती ही आकांक्षा आणि भौतिक लाभेच्छारहित असते. भक्तिरसामृतसिंधूमध्ये (१.१.११) भक्तीची व्याख्या पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे.

अन्याभिलषिताशून्यं ज्ञानकर्माद्यनावृतम्‌।
आनुकूल्येन कृष्णानुशीलनं भक्तिरूत्तमा।।

          ‘‘ज्ञान, सकाम कर्म आणि भौतिक लाभेच्छेने रहित होऊन मनुष्याने भगवान श्रीकृष्णांची अनुकूल रूपाने दिव्य प्रेममयी सेवा केली पाहिजे. यालाच शुद्ध भक्ती असे म्हणतात.‘'

          जेव्हा हे चार प्रकारचे लोक भगवद्भक्तीसाठी भगवंतांकडे येतात आणि शुद्ध भक्ताच्या संगतीत राहून शुद्ध होतात तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त बनतात. दुष्कृतींचा विचार केल्यास, त्यांचे जीवन स्वार्थी, अनियमित आणि आध्यात्मिक ध्येयरहित असल्याकारणाने त्यांच्यासाठी भगवद्भक्ती ही अत्यंत कठीण असते; परंतु यांच्यातील काहीजण जेव्हा योगायोगाने शुद्ध भक्ताच्या सहवासात येतात तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त बनतात.

          जे लोक नेहमी सकाम कर्म करण्यामध्ये व्यग्र असतात ते संकटसमयी भगवंतांकडे येतात आणि त्या वेळी शुद्ध भक्तांच्या सहवासामुळे ते संकटकाळी भगवद्भक्त बनतात. जे वैफल्यग्रस्त असतात ते सुद्धा कधी कधी शुद्ध भक्ताच्या सहवासात येतात आणि भगवत्ज्ञानामध्ये जिज्ञासू होतात. त्याचप्रमाणे जेव्हा शुष्क ब्रह्मज्ञानी, ज्ञानाच्या प्रत्येक मार्गामध्ये विफल होतात तेव्हा ते भगवंतांकडे भगवद्भक्ती करण्यासाठी येतात. याप्रमाणे ते निर्विशेष ब्रह्म आणि परमात्म्याच्या ज्ञानाच्याही अतीत होतात आणि भगवंत किंवा शुद्ध भक्ताच्या कृपेने त्यांना भगवंतांच्या साकार रूपाचा बोध होतो. एकंदरीत जेव्हा आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी सर्व भौतिक कामनांतून मुक्त होतात आणि जेव्हा त्यांना पूर्णपणे समजून येते की, भौतिक लाभाचा आध्यात्मिक उन्नतीशी मुळीच संबंध नाही तेव्हा ते शुद्ध भक्त बनतात. जोपर्यंत अशी शुद्धावस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करणारे भक्त, सकाम कर्म किंवा भौतिक ज्ञानप्राप्तीच्या इच्छेने दूषित असतात. म्हणून शुद्ध भगवद्भक्ती प्राप्त होण्यापूर्वी मनुष्याने या सर्व गोष्टींतून पार पडणे आवश्यक आहे.

« Previous Next »