No edit permissions for मराठी

TEXT 20

kāmais tais tair hṛta-jñānāḥ
prapadyante ’nya-devatāḥ
taṁ taṁ niyamam āsthāya
prakṛtyā niyatāḥ svayā

कामैः-कामनांनी; तैः तैः-त्या त्या; हृत-हिरावलेले आहे; ज्ञानाः-ज्ञान; प्रपद्यन्ते-शरण जातात; अन्य-अन्य: देवताः--देवतांना; तम् तम्--त्या त्याः नियमम्-नियमः आस्थाय-पालन करून; प्रकृत्या-स्वभावानुसार; नियताः-वश झालेले; स्वया-स्वत:च्या.

ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे, ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात.

तात्पर्यः जे सर्व भौतिक कल्मषांतून मुक्त झाले आहेत ते भगवंतांना शरण जाऊन त्यांच्या प्रेममयी सेवेमध्ये युक्त होतात. जोपर्यंत भौतिक कल्मष पूर्णपणे नाहीशी होत नाहीत तोपर्यंत ते स्वभावतःच अभक्त असतात. परंतु जे केवळ भौतिक इच्छप्राप्तींसाठी भगवंतांचा आश्रय घेतात ते सुद्धा बाह्य प्रकृतीद्वारे आकर्षित होत नाहीत, कारण ते वास्तविक ध्येयप्राप्तीच्या प्रयत्नात असतात आणि म्हणून ते लौकरच सर्व भौतिक कामवासनांतून मुक्त होतात. श्रीमद्भागवतात सांगण्यात आले आहे की, मनुष्य सर्व भौतिक वासनांतून मुक्त असो किंवा सर्व भौतिक वासनांनी परिपूर्ण असो किंवा भौतिक कल्मषांतून मुक्त होण्याची त्याला इच्छा असो, सर्व बाबतीत त्याने श्रीवासुदेवांना शरण जाऊन त्यांची आराधना केली पाहिजे. श्रीमद्भागवतात (२.३.१०) सांगितले आहे की:

अकामः सर्वाकामी व मोक्षकाम उदारधी: |
तीव्रेण भक्तियोगेन यजेत पुरुषं परम् ।।

          ज्या अल्पबुद्धी लोकांनी आपली आध्यात्मिक जाणीव गमावली आहे, ते तात्काळ भौतिक इच्छापूर्ती होण्यासाठी देवदेवतांचा आश्रय घेतात. सामान्यतः असे लोक भगवंतांचा आश्रय घेत नाहीत, कारण ते रजोगुण आणि तमोगुणात स्थित असतात आणि म्हणून ते निरनिराळ्या देवतांची उपासना करतात. विशिष्ट विधिविधानंचे पालन करण्यातच ते समाधानी असतात. देवतांचे पूजक हे तुच्छ अशा आकांक्षांनी प्रेरित झालेले असतात आणि त्यांना परमलक्ष्याची प्राप्ती कशी करावी हे माहीत नसते; परंतु भगवद्भक्त त्यांच्याप्रमाणे चुकीच्या मार्गाने जात नाही. वेदांमध्ये निरनिराळ्या हेतूंप्रीत्यर्थ निरनिराळ्या देवतांची पूजा करण्यास सांगण्यात आले आहे. उदाहरणार्थ, रोगी मनुष्यास सूर्योपासना करण्यास सांगितली आहे. म्हणून जे भगवद्भक्त नाहीत त्यांना वाटते की, विशिष्ट हेतुप्राप्ती करून घेण्यासाठी देवदेवता या भगवंतांपेक्षा श्रेष्ठ आहेत. परंतु विशुद्ध भक्ताला माहीत असते की, भगवान श्रीकृष्ण हे सर्वेश्वर आहेत. चैतन्य चरितामृतामध्ये सांगण्यात आले आहे की, (आदि-५.१४२) एकले ईश्वर कृष्ण, आर सब भृत्य-केवळ भगवान श्रीकृष्ण हेच स्वामी आहेत आणि इतर सर्वजण सेवक आहेत. म्हणून शुद्ध भक्त, आपल्या भौतिक गरजांच्या तृप्तीकरिता देवदेवतांकडे कधीही याचना करीत नाही. तो भगवंतांवर पूर्णपणे विसंबून असतो आणि भगवंत जे काही देतात त्यामध्येच संतुष्ट असतो.

« Previous Next »