No edit permissions for मराठी

TEXT 21

yo yo yāṁ yāṁ tanuṁ bhaktaḥ
śraddhayārcitum icchati
tasya tasyācalāṁ śraddhāṁ
tām eva vidadhāmy aham

यः यः-जो जो; याम् याम्-ज्या ज्या; तनुम्-देवतेची; भक्तः-भक्तः; श्रद्धया-श्रद्धेने; अर्चितुम्-उपासना करणे; इच्छति-इच्छा करतो; तस्य तस्य-त्याची त्याची; अचलाम्-स्थिर; श्रद्धाम्—श्रद्धा; ताम्—त्या; एव-निश्चितपणे; विदधामि—देतो; अहम्—मी.

मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो, तेव्हा त्या विशिष्टदेवतेवर मी त्याची श्रद्धा दूढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो.

तात्पर्यः परमेश्वराने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे, म्हणून जर मनुष्याला भौतिक सुखोपभोग प्राप्त करण्याची इच्छा असेल आणि खरोखरच अशा सुविधा जर त्याला भौतिक देवतांकडून प्राप्त करून घ्यावयाची इच्छा असेल तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने स्थित असलेले भगवंत त्या मनुष्याची इच्छा जाणतात आणि त्याला सर्व सुविधा उपलब्ध करून देतात. सर्व जीवांचे परमपिता या नात्याने भगवंत जीवाच्या स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करीत नाहीत, उलट ते प्रत्येकाला सर्व सुविधा उपलब्ध करून देतात, जेणेकरून ते आपल्या भौतिक इच्छांची पूर्ती करू शकतील. यावर कोणी विचारील की, सर्वशक्तिमान भगवंत भौतिक सुखोपभोग घेण्यासाठी जीवांना सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना मायेच्या जंजाळात का पडू देतात? तर या सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर जीवांच्या स्वातंत्र्याला काहीच अर्थ राहात नाही. म्हणून भगवंत प्रत्येकाला पूर्ण स्वातंत्र्य देतात, ज्याला जे आवडेल ते प्रदान करतात; परंतु अंतिम उपदेश आपल्याला भगवद्गीतेत आढळतो की, मनुष्याने इतर सर्व कार्यांचा त्याग करून त्यांना पूर्णपणे शरण गेले पाहिजे. केवळ यामुळेच मनुष्य सुखी होऊ शकतो.

          जीव आणि देवदेवता दोघेही भगवंतांच्या इच्छेच्या अधीन आहेत. म्हणून जीव स्वत:च्या इच्छेने देवतांची आराधना करू शकत नाहीत तसेच भगवंतांच्या इच्छेवाचून देवता कोणता वरही प्रदान करु शकत नाहीत. असे सांगितले जाते की, भगवंतांच्या इच्छेविना गवताचे पातेही हलत नाही. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे सामान्यत: भौतिक जगात पीडित झालेले लोक देवतांकडे जातात. मनुष्याला जर विशिष्ट गोष्टींची आवश्यकता असेल तर तो त्यानुसार विशिष्ट देवतेची उपासना करू शकतो. उदाहरणार्थ, रोगी मनुष्य सूर्यदेवाची उपासना करू शकतो, विद्यार्जन करण्याची इच्छा असणारा मनुष्य सरस्वतीदेवीची उपासना करू शकतो आणि सुंदर पत्नी प्राप्त करण्याची इच्छा असणारा मनुष्य भगवान शंकराची अर्धांगिनी, उमादेवीची उपासना करू शकतो. याप्रमाणे वैदिक शास्त्रांमध्ये विविध देवदेवतांनुसार विविध प्रकारचे उपासना विधी सांगण्यात आले आहेत. जीवाला विशिष्ट सुखाचा उपभोग घ्यायचा असल्याकारणाने, भगवंत त्या जीवाला विशिष्ट देवतेकडून तो वर प्राप्त करून घेण्यासाठी प्रबळ इच्छेने प्रेरित करतात. याप्रमाणे अभिष्ट वर प्राप्त करून घेण्यात जीव यशस्वी होतो. विशिष्ट देवतांप्रीत्यर्थ असणारा जीवाचा विशिष्ट पूजाभावही भगवंतच नियोजित करतात. अशा प्रकारचा भाव देवतासुद्धा जीवांमध्ये निर्माण करू शकत नाहीत; परंतु पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण सर्वांच्या अंतर्यामी उपस्थित असणारे परमात्मा असल्यामुळे, ते मनुष्याला विशिष्ट देवतेची उपासना करण्याची प्रेरणा देतात. वस्तुत: देवदेवता या भगवंतांच्या विराटरूपी शरीराचे निरनिराळे भाग आहेत आणि म्हणून त्यांना स्वातंत्र्१य नसते. वेदांमध्ये सांगण्यात आले आहे की, भज़गवंत परमात्मा रूपाने देवदेवतांच्याही हृदयामध्ये स्थित आहेत. म्हणून ते देवदेवतांद्वारे जीवाच्या इच्छा पूर्ण करण्याची व्यवस्था करतात. परंतु जीव आणि देवता दोघेही भगवंतांच्या इच्छेवर विसंबून आहेत. जीव आणि देवता स्वतंत्र नाहीत.

« Previous Next »