No edit permissions for मराठी

TEXT 22

sa tayā śraddhayā yuktas
tasyārādhanam īhate
labhate ca tataḥ kāmān
mayaiva vihitān hi tān

स:-तो; तया-त्या; श्रद्धया-श्रद्धा किंवा प्रेरणा; युक्त:-युक्त झालेला; तस्य-त्या देवतेची; आराधनम्-आराधना; ईहते-आकांक्षा करतो; लभते-प्राप्त करतो; -आणि; ततः-त्यापासून; कामान्-त्याच्या इच्छा;मया-माझ्याद्वारे; एव-केवळ; विहितान्-व्यवस्था; हि-निश्चितच; तान्-त्या.

अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो.

तात्पर्य: भगवंतांच्या अनुमतीवाचून, देवता आपल्या भक्तांना वरदान देऊ शकत नाहीत. सर्व काही भगवंतांच्या मालकीचे आहे याचे विस्मरण जीवाला होऊ शकते; परंतु देवतांना होत नाही. म्हणून देवतांची उपासना आणि लाभेच्छांची प्राप्ती ही देवतांमुळे होत नाही, तर भगवंतांच्या अनुमतीने होत असते. अल्पज्ञानी जीवाला याचे ज्ञान नसते, म्हणून तो लाभप्राप्तीकरिता मूर्खपणाने देवतांकडे जातो. परंतु शुद्ध भगवद्‌भक्ताला जेव्हा कशाची गरज असते तेव्हा तो भगवंतांचीच प्रार्थना करतो. तरीही लाभप्राप्तीची इच्छा करणे हे शुद्ध भक्ताचे लक्षण नव्हे. सामान्यतः जीव हा देवतांना शरण जातो, कारण तो आपल्या कामवासनांची तृप्ती करण्यामध्ये अत्यंत आसत झालेला असतो. असे घडण्याचे कारण म्हणजे, जीव अयोग्य गोष्टीची इच्छा करतो आणि भगवंत स्वत: अशा प्रकारची इच्छा तृप्त करीत नाहीत. चैतन्य चरितामृतात म्हटले आहे की, जो भगवंतांची आराधना करतो व त्याच वेळी विषयोपभोगाची इच्छा करतो. त्यांच्या इच्छा परस्परविरोधी किंवा विसंगत आहेत. भगवंतांची भक्तीपूर्ण सेवा आणि देवतांची उपासना ही एकाच स्तरावर असू शकत नाही, कारण देवतांची उपासना ही भौतिक आहे आणि भगवंतांची भक्तीपूर्ण सेवा करणे ही पूर्णपणे आध्यात्मिक बाब आहे.

          ज्या जीवाला भगवद्धामात परत जाण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी भौतिक इच्छा विघ्नकारी असतात. म्हणून अल्पबुद्धी जीवांना इच्छित असलेले भौतिक लाभ विशुद्ध भगवद्भक्ताला प्रदान करण्यात येत नाहीत, कारण असे इच्छित लाभ प्राप्त झाल्यामुळे अल्पबुद्धी जीव हे भगवंतांच्या भक्तीपूर्ण सेवेमध्ये युक्त होण्यापेक्षा प्राकृत जगतातील देवदेवतांची उपासना करणे पसंत करतात.

« Previous Next »