No edit permissions for मराठी

TEXT 24

avyaktaṁ vyaktim āpannaṁ
manyante mām abuddhayaḥ
paraṁ bhāvam ajānanto
mamāvyayam anuttamam

अव्यक्तम्—अव्यक्त; व्यक्तिम्—व्यक्तित्व किंवा स्वरूप; आपन्नम्—प्राप्त झाले; मन्यन्ते—मानतात; माम्-मला; अबुद्धयः-अल्पबुद्धी लोक किंवा अल्पज्ञ, परम्-परम, भावम्-अस्तित्व किंवा सक्ता; अजानन्तः--न जाणून; मम-माझ्या; अव्ययम्-अविनाशी; अनुत्तमम्-सर्वोक्तम.

मला पूर्णपणे न जाणणा-या अल्पबुद्धी लोकांना वाटते की, मी (पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण) पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत.

तात्पर्य: देवतांच्या उपासकांना अल्पज्ञ म्हणण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी निर्विशेषवादी लोकांचेही अल्पज्ञ म्हणून वर्णन करण्यात आले आहे. येथे भगवान श्रीकृष्ण आपल्या साकार रूपामध्ये अर्जुनाशी बोलत आहेत, पण तरीही अज्ञानवश निर्विशेषवादी वाद घालतात की, परमेश्वर हा अंतिमतः निराकार आहे. श्रील रामानुजाचार्यांच्या परंपरेतील महान भगवद्भक्त यमुनाचार्यांनी या संदर्भात दोन सुंदर श्लोक रचिले आहेत, ते म्हणतात की, (स्तोत्र रत्न १२)

त्वां शीलारूपचरितै: परमप्रकृष्टैः
सत्वेन सत्विकतया प्रबलैश्च शास्त्रै:।
प्रख्यातर्देवपरमार्थविदां मतैश्र्च
नैवासुरप्रकृतय: प्रभवन्ति बोद्‌धुम्‌ ।।

          ‘हे प्रभो! व्यासदेव आणि नारदांसारखे भक्त तुम्हाला पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतात. वेदाध्यनाद्वारे मनुष्य तुमचे रूप, गुण आणि लीला जाणू शकतो व अशा रीतीने त्याला तुमच्या पुरुषोत्तम भगवान रूपाची अनुभूती होते. परंतु रज आणि तमोगुणामध्ये असणारे असुर आणि अभक्त यांना तुचे ज्ञान होऊ शकत नाही. तुम्हाला जाणणे त्यांच्यासाठी अशक्य आहे. वेदान्त आणि उपनिषदांवर वादविवाद करण्यामध्ये असे अभक्त कितीही निपुण असले तरी ते तुम्हाला जाणू शकत नाहीत."

          ब्रह्मसंहितेत सांगण्यात आले आहे की, केवळ वेदाध्ययनांद्वारे भगवद्‌ज्ञान होणे शक्य नाही, केवळ भगवंतांच्या कृपेनेच आपण त्यांना जाणू शकतो. म्हणून या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, केवळ देवतांचे उपासकच नव्हे तर कृष्णभावनेचा लेशमात्रही गंध नसलेले आणि वेदान्तावर भाष्य करणारे अभक्तही अल्पबुद्धीच आहेत आणि अशा अल्पबुद्धींना परमेश्वराच्या साकार रूपाचे ज्ञान होणे शक्य नाही. परम सत्य निराकार असल्याचे ज्यांना वाटते त्यांचे वर्णन अबुद्धय: म्हणून करण्यात आले आहे, अर्थात ज्यांना परम सत्याच्या अंतिम स्वरुपाचे ज्ञान नाही. श्रीमद्‌भागवतात सांगण्यात आले आहे की, परम सत्याच्या साक्षात्काराच्या प्रारंभी निर्विशेष ब्रह्माची अनुभूती होते. त्यानंतर अंतर्यामी परमात्म्याची आणि सर्वांत शेवटी पुरुषोत्तम भगवत्-स्वरूपाची अनुभूती होते, आजकालचे निर्विशेषवादी तर अधिकच अज्ञानी आहेत, कारण ते निर्विशेषवादाचे आद्य प्रवर्तक शंकराचार्यांचेही अनुसरण करीत नाहीत. शंकराचार्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्रीभगवान आहेत. म्हणून निर्विशेषवाद्यांना परम सत्याचे ज्ञान नसल्यामुळे ते श्रीकृष्णांना साधारण, देवकी किंवा वसुदेव पुत्र अथवा राजकुमार अथवा महापुरुष असे मानतात. भगवद्गीतेमध्ये या गोष्टीची निंदा करण्यात आली आहे, अवजानति मां मूढा मानुषी तनुमश्रितम्-केवळ मूर्खच मला साधारण मनुष्य समजतात. (श्रीमद्भगवद्गीता ९.११).

          वस्तुतः भक्तीपूर्ण सेवा आणि कृष्णभावनेचा विकास केल्याशिवाय कोणीही श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. श्रीमद्भागवतातही (१०.१४.२९) याला पुष्टी देण्यात आली आहे:

अथापि ते देव पदाम्बुजद्वय प्रसादलेशानुगृहीत एव हि |
जानाति तत्वं भगवन्‌ महिम्नो न चान्य एकोऽपिं चिरं विचिन्वन्‌ ।।

          ‘'हे भगवन्! जर मनुष्यावर तुमच्या चरणकमलांची लेशमात्रही कृपा झाली तरी तो तुमचे महान स्वरूप जाणू शकतो. परंतु अनेकानेक वर्षे वेदाध्ययन करणारे आणि तुम्हाला किंवा मानसिक तर्कवादाच्या आधारे भगवान श्रीकृष्ण त्यांचे रूप, गुण किंवा नाम इत्यादी जाणणे शक्य नाही. केवळ भक्तियोगाद्वारेच मनुष्य श्रीकृष्णांना जाणू शकतो. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे/हरे राम हरे राम राम राम हरे हरे |या महामंत्राचा जप करून जेव्हा मनुष्य पूर्णपणे कृष्णभावनेमध्ये युक्त होतो तेव्हाच तो भगवंतांना जाणू शकतो. निर्विशेषवादी अभक्ताला वाटते की, श्रीकृष्णांचा विग्रह हा भौतिक आहे आणि त्यांच्या लीला, त्यांचे रूप इत्यादी सर्व काही मायाच आहे. अशा निर्विशेषवाद्यांना मायावादी म्हटले जाते. त्यांना परम सत्याचे ज्ञान नसते.

     विसाव्य श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, कामैस्तैस्तैर्हृतज्ञाना: प्रपद्यन्तेऽन्यदेवत:-'कामवासनेने अंध झालेले लोक निरनिराळ्या देवतांना शरण जातात.' भगवंतांच्या भगवद्धामाव्यतिरिक्त इतर देवदेवतांचे स्वत:चे ग्रहलोक आहेत. तेविसाव्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे देवान् देवयजा यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि-देवतांचे उपासक निरनिराळ्या देवलोकांमध्ये जातात आणि भगवान श्रीकृष्णांचे भक्त, कृष्णलोकामध्ये जातात. असे स्पष्टपणे सांगण्यात आलेले असतानाही मूर्ख निर्विशेषवादी म्हणतात की, भगवंत हे निराकार आहेत आणि ही सर्व रूपे काल्पनिक आहेत. गीतेच्या अध्ययनावरून असे वाटते का की, देवता व त्यांचे लोक हे निर्विशेष आहेत? स्पष्टच आहे की, देवता किंवा भगवान श्रीकृष्ण कोणीच निर्विशेष नाही. त्या सर्वांना स्वतंत्र व्यक्तित्व आहे. श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत; त्यांचे स्वत:चे धाम आहे. देवतांनाही स्वत:चे ग्रहलोक आहेत.

          त्यामुळे परम सत्य निराकार आहे आणि परम सत्याची रूपे ही काल्पनिक असल्याचे अद्वैतवाद्यांचे मत हे वस्तुस्थितीला अनुसरून नाही. या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे आणि भगवंतांची रूपेही एकाच वेळी अस्तित्वात असतात आणि भगवान श्रीकृष्ण हे सच्चिदानंद आहेत. वेदही स्पष्टपणे सांगतात की परम सत्य हे आनन्दमयोऽभ्यासात-सर्वगुणसंपन्न आहे आणि गीतेमध्ये भगवंत सांगतात की, ते जरी अजन्मा असले तरी ते अवतार धारण करतात. हे तथ्य आपण भगवद्गीतेपासून जाणून घेतले पाहिजे. भगवंत हे निराकार कसे असू शकतात हे आपण जाणू शकत नाही, गीतेप्रमाणे तरी, निर्विशेष अद्वैतवाद्यांचा सिद्धांत मिथ्या असल्याचे सिद्ध होते. या श्लोकावरून स्पष्ट होते की, परम सत्य भगवान श्रीकृष्णांना रूप तसेच व्यक्तित्व दोन्ही आहे.

« Previous Next »