No edit permissions for मराठी

TEXT 30

sādhibhūtādhidaivaṁ māṁ
sādhiyajñaṁ ca ye viduḥ
prayāṇa-kāle ’pi ca māṁ
te vidur yukta-cetasaḥ

-अधिभूत-आणि प्राकृत सृष्टीचे संचलन करणारे तत्व; अधिदैवम्-सर्व देवतांचे नियंत्रण करणारे; माम्-मला; -अधियज्ञम्-आणि सर्व यज्ञांचा अधिष्ठाता; -सुद्धा;ये-जे; विदुः-जाणतात; प्रयाण-मृत्यू; काले-समयी; अपि-जरी; -आणि; माम्-मला; ते-ते;विदुः-जाणतात; युत-चेतस:-त्यांचे मन मत्परायण होऊन.

पूर्णपणे मत्परायण झालेले, जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात.

तात्पर्य: कृष्णभावनाभावित कर्म करणारे, भगवंतांना पूर्णपणे जाणण्याच्या मार्गापासून कधीच विचलित होत नाहीत. कृष्णभावनेच्या दिव्य सान्निध्यात मनुष्य, भगवंत हे भौतिक सृष्टीचे संचालक, तसेच देवतांचेही नियंत्रक कसे आहेत हे जाणू शकतो. क्रमाक्रमाने अशा दिव्य सहवासामुळे मनुष्याची भगवंतांच्या ठायी दृढ निष्ठा निर्माण होते आणि मृत्यूसमयी असा कृष्णभावनाभावित मनुष्य, श्रीकृष्णांना कधीही विसरत नाही. म्हणून साहजिकच तो भगवद्धाम, गोलोक वृंदावनात प्रविष्ट होतो.

          मनुष्य पूर्णपणे कृष्णभावनाभावित कसा होऊ शकतो, याचे या सातव्या अध्यायात विशेषरूपाने प्रतिपादन करण्यात आले आहे. कृष्णभावनेचा प्रारंभ कृष्णभावनाभावित भक्तांच्या सत्संगामुळे होतो. असा सत्संग आध्यात्मिक असतो आणि त्यायोगे मनुष्यांचा भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध येतो आणि त्यांच्या कृपेने, श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान असल्याचे तो जाणू शकतो. त्याच वेळी खर्या अर्थाने आपल्या स्वरुपस्थितीचे त्याला ज्ञान होते. तसेच जीवाला, श्रीकृष्णांचे विस्मरण होऊन तो कसा प्राकृत क्रियांमध्ये गुंतला जातो हे समजते. सत्संगातील कृष्णभावनेच्या क्रमिक विकासामुळे जीव जाणू शकतो की, श्रीकृष्णांच्या विस्मरणामुळेच आपण प्राकृतिक नियमांनी बद्ध झालो आहे. कृष्णभावनेची पुन:प्राप्ती करण्याकरिता मनुष्यजीवन म्हणजे एक सुसंधीच आहे आणि भगवंतांची अहैतुकी कृपा प्राप्त करण्याकरिता या संधीचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे हे सुद्धा तो जाणू शकतो.

          या अध्यायात अनेक विषयांचे निरूपण करण्यात आले आहे-आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व्यक्तींचे तसेच ब्रह्मज्ञान, परमात्म्याचे ज्ञान, जन्म, मृत्यू आणि जरा यातून मुक्तता आणि भगवंतांची आराधना; तरीही वास्तविकपणे ज्याने कृष्णभावनेत उन्नती केली आहे तो इतर विविध पद्धतींची पर्वा करीत नाही. तो कृष्णभावनेच्या क्रियांमध्ये रममाण होतो आणि त्यायोगे भगवान श्रीकृष्णांचा नित्य दास या आपल्या वास्तविक स्वरूपस्थितीची प्राप्ती करतो. अशा शुद्ध भक्तियुक्त अवस्थेमध्ये तो श्रीकृष्णांचे गुणगान आणि कीर्तन करण्यामध्ये आनंद प्राप्त करतो. त्याला दृढ विश्वास असतो की, असे केल्यानेच आपली सर्व उद्दिष्टे सिद्ध होतील. अशा दृढ विश्वासालाच दृढ-व्रत असे म्हटले जाते आणि भक्तियोग किंवा दिव्य प्रेममयी सेवेचा हाच आरंभ आहे. हाच सर्व शास्त्राचा निर्णय आहे. भगवद्‌गीतेचा हा सातवा अध्याय म्हणजे त्या निश्चयात्मक किंवा दृढ विश्वासाचे सार आहे.

     या प्रकारे भगवद्‌गीतेच्या ‘भगवद्‌ज्ञान’ या सातव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.

« Previous