TEXT 12
moghāśā mogha-karmāṇo
mogha-jñānā vicetasaḥ
rākṣasīm āsurīṁ caiva
prakṛtiṁ mohinīṁ śritāḥ
मोघ-आशा:-निष्फळ आशा; मोघ-कर्माण:-निष्फळ सकाम कर्म; मोघ-ज्ञाना:-निष्फळ ज्ञान; विचेतसः-मोहित झालेले; राक्षसीम्-राक्षसी; आसुरीम्-नास्तिक; च-आणि; एव-- निश्चितच; प्रकृतिम्—प्रकृती; मोहिनीम्—मोहित करणारा; श्रिताः-आश्रय घेतो.
याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात. अशा मोहित अवस्थेमध्ये, त्यांची मुक्तीची आशा, त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते.
तात्पर्य: असे पुष्कळ भक्त आहेत, जे स्वत:ला कृष्णभावनेमध्ये आणि भक्तियोगामध्ये असल्याचे मानतात; पण अंत:करणपूर्वक ते भगवान श्रीकृष्णांचा परम सत्य म्हणून स्वीकार करीत नाहीत. त्यांना भक्तियोगाचे फळ, भगवद्धाम, कधीच प्राप्त होत नाही. त्याचप्रमाणे जे सकाम कर्मे करीत आहेत आणि त्यायोगे सरतेशेवटी, सांसारिक बंधनातून मुक्त होण्याची ज्यांना आशा आहे ते सुद्धा कधीच यशस्वी होत नाहीत, कारण ते भगवान श्रीकृष्णांचा उपहास करतात. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, जे लोक श्रीकृष्णांचा उपहास करतात ते राक्षसी किंवा आसुरी लोक असतात. भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे असे राक्षसी आणि दुष्कृती लोक श्रीकृष्णांना कधीच शरण जात नाहीत. म्हणून परम सत्य जाणण्याच्या त्यांच्या प्रयत्नात ते गोंधळून जातात आणि साधारण जीव आणि श्रीकृष्ण हे एकच आहेत या भ्रामक निष्कर्षाप्रत येतात. अशा भ्रामक समजुतीमुळे त्यांना वाटते की, कोणतेही मानव शरीर हे आता भौतिक प्रकृतीद्वारे केवळ आच्छादिलेले आहे आणि जेव्हा मनुष्य या भौतिक देहातून मुक्त होतो तेव्हा त्याच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये मुळीच भेद राहात नाही. श्रीकृष्णांशी एकरूप होण्याचा त्यांचा हा प्रयत्न मोहामुळे निष्फळ होईल. अशा प्रकारचे राक्षसी आणि अनीश्वरवादी आध्यात्मिक ज्ञान नेहमी व्यर्थच असते. अशा लोकांसाठी वेदान्तसूत्र आणि उपनिषद इत्यादींमधील ज्ञानाचे अध्ययन निरर्थकच असते.
म्हणून भगवान श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणे हा घोर अपराध आहे. जे असा घोर अपराध करतात ते मोहग्रस्त झालेले असतात, कारण ते श्रीकृष्णांचे शाश्वत स्वरूप जाणू शकत नाहीत. बृहद्विष्णू स्मृतीमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की,
यो वेत्ति भौतिकं देहं कृष्णस्य परमात्मन:।
स सर्वस्माद् बहिष्कार्य: श्रौतस्मार्तविधानत:।।
मुखं तस्यावलोक्यापि सचेल स्नानमाचरेतू |
‘‘जो श्रीकृष्णांच्या देहाला भौतिक समजतो त्याला श्रुती आणि स्मृतीच्या सर्व कर्मकांडांतून बहिष्कृत केले पाहिजे आणि जर कोणी कदाचित अशा मनुष्याचे तोंडही पाहिले तर त्या दृष्टिसंसर्गातून स्वतःला मुक्त करण्याकरिता त्याने तात्काळ गंगास्नान केले पाहिजे.' लोक श्रीकृष्णांचा उपहास करतात, कारण त्यांना भगवंतांविषयी मत्सर वाटतो. त्यांच्यासाठी जन्मजन्मांतर राक्षसी आणि अनीश्वरवादी योनीतील जन्म हा निश्चित असतो. त्यांच्या वास्तविक ज्ञानावर अनंत काळासाठी मोहांचे आवरण राहील आणि हळूहळू त्यांचे सृष्टीतील अंधकारमय प्रदेशात अध:पतन होत जाईल.