मनोगत
‘भगवद्गीता-जशी आहे तशी’ या ग्रंथाचे आता जे स्वरुप आहे, या स्वरुपातच मी प्रथम हा ग्रंथ लिहिला. तथापि, जेव्हा हा ग्रंथ पहिल्या वेळेस प्रसिद्ध झाला, तेव्हा दुर्दैवाने मूळच्या हस्तलिखितातील पाने कापून त्याची संख्या चारशे पानांपेक्षा कमी करण्यात आली. त्या वेळी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात चित्रे नव्हती आणि भगवद्गीतेतील बहुतेक मूळ श्लोकांचे विवरणही नव्हते. श्रीमद्भागवत, श्रीईशोपनिषद इत्यादी माझ्या इतर सर्व पुस्तकांतील पद्धत अशी आहे की, मी प्रथम मूळ श्लोक देतो, नंतर प्रत्येक संस्कृत शब्दाचा अर्थ देतो व नंतर श्लोकाचे भाषांतर आणि त्यावरचे भाष्य देतो. या पद्धतीमुळे पुस्तक फार सप्रमाण व विद्वत्तापूर्ण होते आणि श्लोकाचा मूळ अर्थ अगदी स्पष्ट होतो. म्हणून जेव्हा गीतेवरील माझ्या मूळच्या हस्तलिखितांची पाने कमी करण्यात आली तेव्हा मला काही फार बरे वाटले नाही; परंतु नंतर जेव्हा ‘भगवद्गीता-जशी आहे तशी’ या ग्रंथाची मागणी फार वाढली तेव्हा पुष्कळ विद्वानांनी आणि भक्तांनी मला आग्रह केला की, पुस्तक मूळ मोठ्या स्वरुपात प्रस्तुत करावे. तेव्हा मॅकमिलन ऍण्ड कंपनी त्यांनी पुस्तकाची संपूर्ण आवृत्ती प्रकाशित करण्याचे मान्य केले. याप्रमाणे सध्याचा हा माझा प्रयत्न म्हणजे कृष्णभावनामृत आंदोलन अधिक दृढ आधारावर स्थापित व्हावे आणि अधिक प्रगतीपर व्हावे याकरिता पूर्ण परंपरा (गुरु-शिष्यपंरपरा-मान्य) स्पष्टीकरणांसह या महान ज्ञानग्रंथावरील मूळ हस्तलिखित प्रस्तुत करणे हा आहे.
आमचे कृष्णभावनामृत आंदोलन अत्यंत शुद्ध स्वरुपाचे, ऐतिहासिकदृष्ट्या अधिकृत, स्वाभाविक आणि दिव्य आहे, कारण ते ‘भगवद्गीता-जशी आहे तशी’ वर आधारलेले आहे. हे आंदोलन हळूहळू संपूर्ण विश्वातील, विशेषकरून तरुण पिढीत सर्वांत लोकप्रिय होत आहे. जुन्या पिढीलासुद्धा या आंदोलनात स्वारस्य वाटू लागले आहे. प्रौढ वर्गाची रुची इतकी वाढत चालली आहे की, माझ्या शिष्यांचे वडील व आजोबा आमच्या आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ या महान संस्थेचे आजीवन सदस्य होऊन आम्हाला प्रोत्साहन देत आहेत. लॉस एँजिलिस (अमेरिकेतील एक शहर) मध्ये अनेक माता-पिता माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यायचे की, मी जगभर कृष्णभावनामृत आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे. त्यापैकी काही लोकांच्या मते अमेरिकन लोक अत्यंत भाग्यवान आहेत, कारण मी कृष्णभावनामृत आंदोलनाचा शुभारंभ अमेरिकेत केला आहे; परंतु वास्तविक या आंदोलनाचे मूळ जनक स्वत: भगवान श्रीकृष्ण आहेत, कारण हे आंदोलन फार प्राचीन काळी सुरु झाले हाते व गुरुशिष्य पंरपेरद्वारे मानव समाजात चालू राहिले आहे. जर यासंबंधी माझे काही श्रेय असेल तर ते माझे वैयक्तिक श्रेय नसून, माझे नित्य आध्यात्मिक गुरु ॐ विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य 108 श्री श्रीमद्भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज प्रभुपाद, यांचे आहे.
या बाबतीत माझे स्वत:चे जर काही श्रेय असेल तर ते हेच की, भगवद्गीता कोणतीही भेसळ न करता, जशी आहे तशी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘भगवद्गीता जशी आहे तशी’ माझ्याकडून सादर होण्यापूर्वी भगवद्गीतेच्या बहुतेक सर्व इंग्रजी आवृत्त्या अशा होत्या की, त्यात कोणाची तरी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा हेतू होता. परंतु ‘भगवद्गीता-जशी आहे तशी’ सादर करण्याचा माझा प्रयत्न म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा संदेश सादर करणे हा आहे. श्रीकृष्णांची इच्छा प्रकट करणे हे आमचे कार्य आहे.एखादा राजकारणी, तत्त्वज्ञानी किंवा शास्त्रज्ञ अशा भौतिक तार्किकांची इच्छा प्रकट करणे हे आमचे कार्य नव्हे. याचे कारण असे की, अशा लोकांची इतर प्रकारची विद्वत्ता जरी असली तर त्यांना भगवान श्रीकृष्णांसंबंधी फारच अल्प ज्ञान असते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम् नमस्कुरु- इत्यादी तेव्हा, तथाकथित विद्वानांप्रमाणे आम्ही असे म्हणत नाही की, भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा अंतरात्मा यांच्यात भिन्नता नाही. श्रीकृष्ण पूर्ण आहेत. श्रीकृष्णांचे नाम, गुण, रूप, लीला इत्यादीकांत कोणतीही भिन्नता नाही. जो मनुष्य गुरुशिष्य परंपरेनुसार कृष्णभक्त होत नाही त्याला श्रीकृष्णांचे पूर्णत्व समजणे अतिशय अवघड आहे. साधारणपणे, तथाकथित विद्वान, राजकारणी, तत्त्वज्ञानी व ‘स्वामी’ हे जेव्हा भगवद्गीतेवरील भाष्य लिहितात, तेव्हा ते श्रीकृष्णांची हकालपट्टी करण्याचा किंवा सरळ त्यांचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. भगवद्गीतेवरील अशा अप्रामाणिक भाष्याला ‘मायावाद भाष्य’ असे म्हणतात आणि अशा अप्रामाणिक भाष्यकारांपासून, श्री चैतन्य महाप्रभू यांनी आपल्याला सावध राहाण्याबद्दल सांगितले आहे. श्री चैतन्य महाप्रभू स्पष्टपणे सांगतात की, जो कोणी मायावाद दृष्टिकोणातून भगवद्गीता समजण्याचा प्रयत्न करणारा असा विद्यार्थी आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या पथावर गोंधळून जाईल व त्यामुळे त्याला स्वगृही, भगवद्धामात जाता येणार नाही.
‘भगवद्गीता-जशी आहे तशी’ सादर करण्याचा आमचा हेतू केवळ हा आहे की, ब्रह्मदेवाच्या एका दिवसात म्हणजे 8,600,000,000 इतक्या वर्षात भगवान श्रीकृष्ण या पृथ्वीतलावर ज्या उद्देशाकरिता अवतरित होतात, त्याच उद्देशाबद्दल बद्ध जीवाला मार्गदर्शन करता यावे. हा उद्देश कोणता ते भगवद्गीता तज्ज्ञांनी सांगितला आहे आणि आपल्याला तो उपदेश जसा आहे तसा मान्य केला पाहिजे. तसे केले नाही तर भगवद्गीता आणि त्या गीतेचा प्रवक्ता भगवान श्रीकृष्ण यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. भगवान श्रीकृष्णांनी कोट्यवधी वर्षांपूर्वी भगवद्गीता प्रथम सूर्यदेवाला सांगितली. आपल्याला या वस्तुस्थितीचा स्वीकार केला पाहिजे अणि कोणताही चुकीचा अर्थ न लावता भगवान श्रीकृष्णांच्या प्रमाणावर भगवद्गीतेचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेतले पाहिजे. श्रीकृष्णांची इच्छा काय आहे हे न जाणता भगवद्गीतेचा अर्थ लावणे हा एक मोठा अपराध आहे. या अपराधापासून स्वत:चे रक्षण करण्याकरिता मनुष्याने भगवान श्रीकृष्णांचा प्रथम शिष्य अर्जुन, याच्याप्रमाणेच श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणून घेतले पाहिजे. भगवद्गीतेचे असे ज्ञान खरोखरीच लाभप्रद आहे व जीवनाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी मानव -समाजाच्या कल्याणाकरिता प्रमाणित आहे.
कृष्णभावनामृत आंदोलन मानव -समाजात अत्यंत आवश्यक आहे. कारण ते जीवनाची परमसिद्धी प्राप्त करून देते. हे कसे घडते याचे पूर्ण स्पष्टीकरण भगवद्गीतेत दिले आहे. दुर्दैवाने वितंडवादी लोकांनी भगवद्गीतेचा फायदा घेऊन स्वत:च्या आसुरी वृत्तींचा प्रचार केला आहे व जीवनाची साधी तत्त्वे समजून घेण्यापासून सुद्धा लोकांना मार्गभ्रष्ट केले आहे. प्रत्येक मनुष्याला परमेश्वर किंवा श्रीकृष्ण किती महान आहेत व जीवात्म्यांचे सत्य स्वरुप काय आहे ते समजले पाहिजे. प्रत्येकाने जाणले पाहिजे की, जीवात्मा हा नित्य दास आहे व श्रीकृष्णांची सेवा करावयाची जर त्याला इच्छा नसेल तर मायेची (भ्रमाची) सेवा करणे त्याला भाग पडते. मायेची सेवा भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या विविध अवस्थेत करावी लागते व अशा रीतीने जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून सतत भटकावे लागते. तथाकथित मुक्त झालेल्या मायावादी तार्किकांनासुद्धा याच चक्रातून जावे लागते. हे ज्ञान म्हणजे एक महान शास्त्र आहे आणि प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या हिताकरिता ते स्वीकारले पाहिजे.
सामान्य लोक, विशेषकरून कलियुगात, श्रीकृष्णांच्या बहिरंगा शक्तीने मोहित होतात आणि त्यांना चुकीने असे वाटते की, भौतिक सुखाच्या साधनांचा विकास केला तर प्रत्यक मनुष्य सुखी होईल. त्यांना ही मुळी जाणीवच नाही की, बहिरंगा शक्ती किंवा भौतिक प्रकृती अत्यंत बलवान आहे, कारण भौतिक प्रकृतीच्या कडक नियमांनी प्रत्येकाला दृढपणे बांधून ठेवलेले असते. परमेश्वराचा अंश या नात्याने जीवात्मा अतिशय आनंदी असतो आणि अशा प्रकारे परमेश्वराची तत्परतेने सेवा करणे हा त्याचा नैसर्गिक स्वभावधर्म आहे. मायाशक्तीद्वारे मोहित झाल्यामुळे मनुष्य वेगवेगळ्या प्रकारे स्वत:च्या इंद्रियांना संतुष्ट करून सुखी होण्याचा प्रयत्न करतो; परंतु या पद्धतीने तो कधीही सुखी होत नाही. स्वत:च्या भौतिक इंद्रियांचे लाड पुरविण्याऐवजी त्याने परमेश्वराच्या इंद्रियांना संतुष्ट केले पाहिजे. हिच जीवनाची परमसिद्धी आहे. परमेश्वराला हे हवे असते व तसा त्यांचा आग्रह असतो. मनुष्याने भगवद्गीतेचा हा केंद्रबिंदू समजून घेतला पाहिजे. आमचे कृष्णभावनामृत आंदोलन या केंद्रबिंदूबद्दल संपूर्ण जगभर प्रचार करीत आहे.जो काणी भगवद्गीतेचा अभ्यास करून तिचा लाभ घ्यावयाचा विचार करीत असेल त्याला या संबंधात आमचे कृष्णभावनामृत आंदोलन परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली मदत करू शकते. म्हणून आम्हाला आशा आहे की ‘भगवद्गीता-जशी आहे तशी’ ही ज्या स्वरुपात आम्ही सादर करीत आहोत तिचा लोक अभ्यास करून सर्वांत जास्त फायदा उठवतील आणि जर एक मनुष्य देखील भगवंताचा विशुद्ध भक्त झाला तर आमचा प्रयत्न यशस्वी झाला असे आम्ही समजू.
ए.सी.भक्तिवेदांत स्वामी
12 मे 1971
सिडनी, ऑस्ट्रलिया