No edit permissions for मराठी

TEXT 17

kathaṁ vidyām ahaṁ yogiṁs
tvāṁ sadā paricintayan
keṣu keṣu ca bhāveṣu
cintyo ’si bhagavan mayā

कथम्—कसे; विद्याम् अहम्—मी जाणावे; योगिन्—हे योगेश्वरा; त्वाम्—तुम्हाला; सदा— सदैव; परिचिन्तयन्—चिंतन करीत; केषु—कोणत्या; केषु—कोणत्या; -सुद्धा; भावेषु-रूपात; चिन्त्यः असि-तुमचे स्मरण करावे; भगवन्-हे भगवन;मया-मी.

हे योगेश्वर कृष्णा! मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे? हे भगवन्! कोणकोणत्या विविध रूपांत मी तुमचे स्मरण करावे?

तात्पर्य: पूर्वीच्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे भगवंत हे योगमायेने आवृत आहेत. केवळ शरणागत जीव आणि भक्तगणच त्यांना पाहू शकतात. आता अर्जुनाला खात्री पटली आहे की आपला मित्र श्रीकृष्ण हा स्वयं भगवान आहे. परंतु सामान्य मनुष्य सर्वव्यापी भगवंतांना कोणत्या पद्धतीने जाणू शकेल हे अर्जुनाला जाणून घ्यावयाचे आहे. असुर आणि अनीश्वरवादींसहित सामान्य मनुष्य श्रीकृष्णांना जाणू शकत नाही, कारण भगवंत हे आपल्या योगमायेद्वारे आच्छादित असतात. आता अर्जुनाने अशा लोकांच्या हितार्थ हे प्रश्न पुन्हा विचारले आहेत. त्यांचे ज्ञान केवळ आपल्यालाच व्हावे असे महान भक्ताला वाटत नाही, तर भगवंतांचे ज्ञान सा-या मानवजातीला व्हावे असे त्याला वाटते. म्हणून अर्जुन हा वैष्णव असल्याकारणाने दयाळू होऊन भगवंतांच्या सर्वव्यापकत्वाचे ज्ञान सामान्य मनुष्यांसाठी प्रकट करीत आहे. तो श्रीकृष्णांना विशेषत: योगिनू म्हणून संबोधित आहे, कारण श्रीकृष्ण हे ज्या योगमायेद्वारे सामान्य मनुष्यांसाठी प्रकट आणि अप्रकट होतात, त्या योगमायेचे स्वामी आहेत. सामान्य मनुष्याला श्रीकृष्णांविषयी प्रेम नसल्यामुळे तो सतत कृष्णस्मरण करू शकत नाही म्हणून त्याला भौतिकदृष्ट्या त्यांचे चिंतन करावे लागते. या जगातील भौतिकवादी लोकांच्या चिंतन करण्याच्या प्रकाराबद्दल अर्जुन विचार करीत आहे. केषु केषु च भावेषु हे शब्द भौतिक प्रकृतीला उद्देशून आहेत. भाव शब्दाचा अर्थ 'प्राकृत गोष्ट' असा होतो. भौतिक लोकांना श्रीकृष्णांचे आध्यात्मिकदृष्ट्या ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी भौतिक गोष्टींवर मन केंद्रित करून श्रीकृष्ण हे भौतिक अभिव्यक्तींद्वारे कशा प्रकारे प्रकट झाले आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.

« Previous Next »