No edit permissions for मराठी

TEXT 12

śreyo hi jñānam abhyāsāj
jñānād dhyānaṁ viśiṣyate
dhyānāt karma-phala-tyāgas
tyāgāc chāntir anantaram

श्रेयः-श्रेष्ठ; हि-निश्चितपणे; ज्ञानम्-ज्ञान; अभ्यासात्-अभ्यासापेक्षा; ज्ञानात्-ज्ञानाहून; ध्यानम्-ध्यानापेक्षा; विशिष्यते-विशेष किंवा श्रेष्ठ समजले जाते; ध्यानात्-ध्यानापेक्षा; कर्मफल-त्यागः-कर्मफलांचा त्याग; त्यागात्-अशा त्यागामुळे; शान्तिः-शांती; अनन्तरम्‌-त्यानंतर.

तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग करणे श्रेष्ठ आहे, कारण अशा कर्मफलत्यागामुळे मनुष्याला मन:शांती प्राप्त होते.

तात्पर्य: पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णिल्याप्रमाणे भक्तीचे दोन विधी आहेत, 'साधनाभक्ती', अर्थात विधिविधानांचे पालन करणे आणि 'रागानुगाभक्ती', अर्थात भगवंतांविषयी अनुराग उत्पन्न करणे. ज्यांना कृष्णभावनेच्या तत्वांचे वास्तविकपणे पालन करता येत नाही त्यांनी ज्ञानाचे अनुशील करणे योग्य आहे, कारण ज्ञानाद्वारे मनुष्य आपली स्वरुपस्थिती जाणू शकतो. क्रमाक्रमाने ज्ञानाची परिणती ध्यानामध्ये होते. ध्यानाद्वारे हळूहळू मनुष्य भगवंतांना जाणू शकतो. असेही विधी आहेत, ज्याद्वारे मनुष्य स्वतःला परमतत्त्व समजतो आणि जर मनुष्य भक्तीमध्ये संलग्न होऊ शकत नसेल तर अशा ध्यानधारणेला प्राधान्य दिले जाते. जर मनुष्य या प्रकारे ध्यान करू शकत नसेल तर त्याच्यासाठी वेदांमध्ये विहित कर्माचे विधान करण्यात आले आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचे स्वधर्म कोणते याविषयी भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायात वर्णन आहे. परंतु सर्वच बाबतीत मनुष्याने कर्मफलांचा त्याग केला पाहिजे. अर्थात त्याने कर्मफलांचा विनियोग सत्कार्याकरिता केला पाहिजे.

          सारांश; परमलक्ष्याची, भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी दोन विधी आहेत: प्रथम क्रमिक विधी आणि दुसरी प्रत्यक्ष विधी. कृष्णभावनाभावित भक्ती ही प्रत्यक्ष विधी आहे आणि दुस-या विधीमध्ये कर्मफलत्यागाचा समावेश असतो. त्यानंतर मनुष्याची क्रमाक्रमाने ज्ञानप्राप्ती, ध्यान, परमात्मा साक्षात्कार आणि पुरुषोत्तम भगवान स्वरूपाचा साक्षात्कार अशी उन्नती होते. मनुष्य क्रमिक विधीचा अथवा प्रत्यक्ष विधींचा स्वीकार करू शकतो. प्रत्यक्ष पद्धतीचा स्वीकार करणे प्रत्येकालाच शक्य नसते, म्हणून अप्रत्यक्ष पद्धतीसुद्धा चांगलीच आहे. तरीही या ठिकाणी जाणणे आवश्यक आहे की, अर्जुनाला अप्रत्यक्ष विधी सांगितलेली नाही. कारण पूर्वीपासूनच तो प्रेमभक्तीच्या स्तरावर स्थित आहे. जे या प्रेमभक्तीमध्ये स्थित नाहीत त्यांच्यासाठी अप्रत्यक्ष विधी योग्य आहे. त्यांनी कर्मफलत्याग, ज्ञान, ध्यान, परमात्म्याची आणि ब्रह्माची अनुभूती या अनेक पद्धतींद्वारे स्वतःला उन्नत करावे. परंतु भगवद्गीतेबद्दल सांगावयाचे तर, भगवद्गीतेत प्रत्यक्ष पद्धतीवर जोर देण्यात आला आहे. सर्वांनी प्रत्यक्ष पद्धतीचा स्वीकार करून भगवान श्रीकृष्णांना शरण जावे, असे सूचित करण्यात आले आहे.

« Previous Next »