No edit permissions for मराठी

TEXT 11

athaitad apy aśakto ’si
kartuṁ mad-yogam āśritaḥ
sarva-karma-phala-tyāgaṁ
tataḥ kuru yatātmavān

अथ-जरी; एतत्-या; अपि-सुद्धा; अशक्तः-असमर्थः; असि-तू आहेस; कर्तु -करण्यासाठी; मत्-माझ्या ठायी; योगम्-भक्तीमध्ये; आश्रित:-आश्रय घेऊन; सर्व-कर्म-सर्व कर्माचे; फल-फळ; त्यागम्-त्याग; ततः-तर; कुरु-कर;यत-आत्म-वान्-आत्मस्थित.

तथापि, तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर.

तात्पर्य: कधी असे होते की, सामाजिक, कौटुंबिक किंवा धार्मिक बांधीलकीमुळे अथवा इतर अडचणींमुळे मनुष्याला कृष्णभावनाभावित कार्यासाठी सहानुभूती देखील व्यक्त करता येत नाही. प्रत्यक्षपणे जर कृष्णभावनेच्या कार्यामध्ये स्वतःला निमग्न केले तर त्याला कुटुंबीयांकडून विरोध होऊ शकतो अथवा इतर अनेक अडचणी उद्भवू शकतात. ज्याला अशी समस्या आहे त्याने आपल्या सर्व कर्मफलांचा त्याग सत्कार्याकरिता करावा असे सांगण्यात आले आहे. वेदांमध्ये अशा विधींचे वर्णन करण्यात आले आहे. तेथे यज्ञ आणि विशिष्ट पुण्यकर्माचेही वर्णन आहे, ज्यामध्ये कर्मफलांचा विनियोग करता येतो. याप्रमाणे त्याला क्रमश: ज्ञानप्राप्ती होऊ शकते. असे आढळून येते की, ज्या मनुष्याला कृष्णभावनाभावित कार्यामध्येही रुची नसते तो जेव्हा रुग्णालयाची उभारणी करण्याकरिता किंवा इतर सामाजिक संस्थाना दान देतो, तेव्हा तो आपल्या कष्टार्जित कर्मफलांचा त्याग करीत असतो. याचे सुद्धा या ठिकाणी विधान करण्यात आले आहे, कारण आपल्या कर्मफलांचा त्याग करण्याच्या अभ्यासाने मनुष्याचे मन क्रमश: शुद्ध होते आणि अशा शुद्ध मनाद्वारे कृष्णभावना जाणणे शक्य होते. अर्थात, कृष्णभावना ही इतर कोणत्याही अनुभवांवर अवलंबून नाही, कारण कृष्णभावना ही स्वतःमध्येच इतकी प्रभावी आहे की, तिच्यामुळे मनुष्याचे मन शुद्ध होऊ शकते, परंतु कृष्णभावनेचा स्वीकार करण्यामध्ये जर अडचणी असतील तर मनुष्य आपल्या कर्मफलांचा त्याग करण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा परिस्थितीत समाजसेवा, जातीसेवा, राष्ट्रसेवा, देशाकरिता त्याग इत्यादींचा स्वीकार करता येतो. जेणेकरून मनुष्याला कधी तरी शुद्ध भगवद्भक्ती प्राप्त होईल. भगवद्गीतेत (१८.४६) आपल्याला आढळते की, यतः प्रवृतिभूतानम्-जर मनुष्याने श्रेष्ठ सत्कार्याकरिता त्याग करण्याचा निश्चय केला तर मग कृष्णकर्म हेच सर्वश्रेष्ठ सत्कर्म असल्याचे जरी त्याला माहीत नसले तरी तो कर्मफलत्यागरूपी यज्ञांमुळे श्रीकृष्ण हेच परमकारण असल्याचे क्रमश: जाणू शकतो.

« Previous Next »