TEXT 16
anapekṣaḥ śucir dakṣa
udāsīno gata-vyathaḥ
sarvārambha-parityāgī
yo mad-bhaktaḥ sa me priyaḥ
अनपेक्षः-तटस्थः शुचिः-पवित्रः दक्षः-कुशल; उदासीनः-चिंतामुक्तः; गत-व्यथः-दुःखमुक्त; सर्व-आरम्भ—सर्व प्रयत्नांचा; परित्यागी-परित्यागी; यः—जो; मत्-भक्तः—माझा भक्तः; सः -तो; मे-मला; प्रियः-अत्यंत प्रिय.
जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत्प्रयास करीत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे.
तात्पर्य: एखाद्याने भक्ताला धन देऊ केले तरी ते मिळविण्याकरिता त्याने धडपड करू नये. भगवंतांच्या कृपेने जर आपोआपच भक्ताला धनप्राप्ती झाली तर त्यामुळे तो हुरळून जात नाही. स्वाभाविकच भक्त दिवसातून निदान दोन वेळा तरी स्नान करतो आणि आपली साधना करण्यासाठी प्रात:काली लवकर उठतो. याप्रमाणे साहजिकच तो अंतर्बाह्य पवित्र असतो. जीवनातील सर्व कर्माचे सार माहीत असल्याने भक्त हा नेहमी दक्ष असतो आणि वैदिक शास्त्रांवर त्याचा दृढ विश्वास असतो. भक्त हा कोणत्याही एका विशिष्ट पक्षाची बाजू घेत नसल्यामुळे तो चिंतामुक्त असतो. तो सर्व उपाधींतून मुक्त असल्यामुळे कधीच दुःखी होत नाही; शरीर हीच एक उपाधी आहे, हे जाणून शारीरिक दुःखांपासून तो मुक्त असतो. भक्तीला प्रतिकूल असणा-या कोणत्याही गोष्टीचा शुद्ध भक्त स्वीकार करीत नाही. उदाहरणार्थ, प्रचंड इमारतीच्या बांधकामासाठी पुष्कळशक्ती खर्च पडते आणि जर असे बांधकाम त्याला भक्तीमध्ये प्रगती करण्यास लाभदायक ठरत नसेल तर तो त्याचा अंगीकार करीत नाही. भगवंतांसाठी तो मंदिर बांधू शकेल आणि त्यासाठी सर्व प्रकारचे कष्टही करील; परंतु स्वतःसाठी एखादे मोठे घर बांधणार नाही.