No edit permissions for मराठी

TEXT 46

yāvān artha uda-pāne
sarvataḥ samplutodake
tāvān sarveṣu vedeṣu
brāhmaṇasya vijānataḥ

यावान् - जितके सर्व; अर्थ:- उपयोग असतो; -पाने-विहिरीत; सर्वंत:- सर्व प्रकारे; सम्प्लुत-उदके- मोठ्या जलाशयामध्ये; तावान्-त्याप्रमाणे; सर्वेषु- सर्व; वेदेषु - वैदिक वाङ्मय; ब्राह्मणस्य - परमब्रह्माचे ज्ञान असणाऱ्या मनुष्याला; विजानत:- ज्याला पूर्ण ज्ञान आहे.

लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्ये मोठ्या जलाशयाकडून त्वरीत होऊ शकतात. त्याप्रमाणे ज्याला वेदांमागचा हेतू माहीत आहे त्या ज्ञानी मनुष्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्ये सहजपणे प्राप्त होतात.

तात्पर्य : वैदिक वाङ्मयाच्या कर्मकांड विभागामध्ये वर्णित धार्मिक विधी आणि यज्ञांचा उद्देश, मनुष्या आत्मसाक्षात्कारामध्ये यथावकाश प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. भगवद्गीतेमधील पंधराव्या अध्यायात (15.15) आत्मसाक्षात्काराचे प्रयोजन स्पष्टपणे सांगण्यात आले आहे-वेदाध्ययाचे प्रयोजन हे सर्व गोष्टींचे आदिकारण, भगवान श्रीकृष्ण यांना जाणणे हे आहे. म्हणून श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा शाश्वत संबंध म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय. जीवांचा श्रीकृष्णांशी असणाऱ्या संबंधांचा उल्लेखही भगवद्गीतेमध्ये (15.7) करण्यात आला आहे. जीव हे श्रीकृष्णाचे अंश आहेत म्हणून जीवाने कृष्णभावनेचे पुनरुज्जीवन करणे ही वैदिक ज्ञानाची परमोच्च पूर्णावस्था आहे. याची श्रीमद्भागवतात (3.33.7) पुढीलप्रमाणे पुष्टी करण्यात आली आहे.

अहो बत श्वपचोऽतो गरीयान् यज्जिह्वाग्रे वर्तते नाम तुभ्यम् ।
तेपुस्तपस्ते जुहुव: सस्नुरार्या ब्रह्मानूचुर्नाम गृणन्ति ये ते ॥

     ‘‘हे भगवान! जो मनुष्य तुमच्या पवित्र नामाचे स्मरण करीत आहे, तो जरी चांडाळासारख्या (कुत्र्याचे मांस भक्षण करणारा) नीच कुळात जन्मला असला तरी तो आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च अवस्थेत स्थिर आहे. अशा मनुष्याचे वैदिक विधिविधानांनुसार सर्व प्रकारचे यज्ञ आणि तप केले असले पाहिजे आणि सर्व तीर्थस्थळांमध्ये अनेक वेळा स्नान करून त्याने वेदांचे अध्ययन केले असले पाहिजे. असा मनुष्य आर्यवंशीयांमध्ये सर्वोत्तम समजला जातो.’’

     यास्तव मनुष्याने केवळ कर्मकाडंवर आसक्त न राहता वेदांचे प्रयोजन जाणण्याइतपत बुद्धिमान असणे आवश्यक आहे आणि उत्तमोत्तम इंद्रियतृप्तीसाठी स्वर्गलोकाप्रत उन्नत होण्याची इच्छा त्याने धरु नये. सर्वसामान्य मनुष्याला या युगामध्ये वैदिक कर्मकांडातील सर्व विधिविधानांचे पालन करणे शक्य नाही. तसेच संपूर्ण वेदान्त आणि उपनिषदांचे अध्ययन करणेही त्याला शक्य नाही. वैदिक विधिविधानांचे प्रत्यक्ष पालन करण्यासाठी पुष्कळ शक्ती, काळ, ज्ञान आणि साधनसामग्रीची आवश्यकता असते. या युगात हे क्वचितच शक्य आहे. तरीसुद्धा पतित जीवांचे उद्धारक श्री चैतन्य महाप्रभू यांनी सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या पवित्र नामाचे स्मरण केल्यास, वैदिक संस्कृतीचा मूळ उद्देश योग्य रीतीने साध्य होतो. महान वैदिक पंडित प्रकाशानंद सरस्वतींनी जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना विचारले की, ‘‘वेदाध्ययन करण्याऐवजी एखाद्या भावुक व्यक्तीप्रमाणे तुम्ही भगवंतांच्या पवित्र नामाचे कीर्तन का करता?’’ तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू उत्तरले की,‘‘माझ्या आध्यात्मिक गुरुंना मी महामूर्ख आहे असे आढळल्याने त्यांनी मला श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे कीर्तन करण्यास सांगितले आहे.’’ या आदेशाचे पालन केल्यामुळे चैतन्य महाप्रभू  भावविभोर झाले. या  कलियुगामधील अधिकतर लोक हे मूर्ख आहेत आणि वेदान्त तत्वज्ञान जाणण्याइतपत ते शिकलेले नाहीत; परंतु भगवंतांच्या पवित्र नामाच्या अपराधरहित कीर्तनाने वेदान्त तत्वज्ञानाचे ध्येय उत्तम प्रकारे साध्य होते. वेदान्त हा वैदिक ज्ञानातील शेवटचा टप्पा आहे. वेदान्त तत्वज्ञानाचे निर्माता आणि ज्ञाताही भगवान श्रीकृष्णच आहेत. भगवंतांच्या पवित्र नामाचे कीर्तन करण्यात जो रममाण होतो तोच सर्वश्रेष्ठ वेदान्ती महात्मा होय. हाच वैदिक रहस्याचा अंतिम उद्देश आहे.

« Previous Next »