TEXT 12
yuktaḥ karma-phalaṁ tyaktvā
śāntim āpnoti naiṣṭhikīm
ayuktaḥ kāma-kāreṇa
phale sakto nibadhyate
युक्त:-भगवत्सेवेमध्ये युक्त असणारा मनुष्य; कर्म-फलम्-सर्व कर्मांचे फळ; त्यक्त्वा-त्याग करून; शान्तिम्-पूर्ण शांती; आप्नोति-प्राप्त करतो; नैष्ठिकीम्-निष्ठापूर्ण किंवा दृढ; अयुक्त:-जो कृष्णभावनाभावित नाही; काम-कारेण-कर्मफलाचा उपभोग घेण्यासाठी; फले-फलामध्ये; सक्त:- आसक्त; निबध्यते-बद्ध होतो.
निष्ठेने भक्ती करणारा जीव अढळ शांतता प्राप्त करतो. कारण तो आपल्या सर्व कर्मांची फळे मला अपर्ण करतो; परंतु जो भगवंतांशी संबंधित नाही आणि जो आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफलांचा लोभी आहे तो बद्ध होतो.
तात्पर्य: कृष्णभावनाभावित मनुष्य आणि देहात्मबुद्धी असणारा मनुष्य यातील भेद हाच आहे की, कृष्णभावनाभावति मनुष्य श्रीकृष्णांवर आसक्त असतो तर देहात्मबुद्धी असणारा मनुष्य, आपल्या कर्मफलांवर आसक्त असतो. जो व्यक्ती श्रीकृष्णांवर आसक्त आहे आणि केवळ श्रीकृष्णांप्रीत्यर्थच कर्म करीत आहे तो निश्चितच मुक्तात्मा आहे आणि त्याला आपल्या कर्मफलांबद्दल मुळीच चिंता नसते. श्रीमद्भागवतात सांगण्यात आले आहे की, परम सत्याच्या ज्ञानाच्या अभावी म्हणजेच द्वंद्वभावामध्ये केलेले कर्म हेच मनुष्याच्या कर्मफलावरील आसक्तीचे कारण बनते. भगवान श्रीकृष्ण हेच परम सत्य आहेत. कृष्णभावनेमध्ये द्वंद्व नसते. असित्वातील सर्व वस्तू श्रीकृष्णांच्या शक्तीमुळे निर्माण होतात आणि श्रीकृष्ण हे सर्वमंगलमय आहेत म्हणून कृष्णभावनाभावित कर्मे ब्रह्मस्तरावरील असतात तसेच ती दिव्य असतात आणि त्यांना भौतिक कर्मफल नसते. यास्तव कृष्णभावनाभावित मनुष्याला शांती प्राप्त होते; परंतु इंद्रियतृप्तीकरिता जो लाभगणतीत गुंतलेला आहे याला अशी शांती प्राप्त होऊ शकत नाही. श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कशाचेही अस्तित्व नाही याचा साक्षात्कार होणे हाच निर्भयता व शांतीचा स्तर आहे आणि हेच कृष्णभावनेचे रहस्य आहे.