No edit permissions for मराठी

TEXTS 20-23

yatroparamate cittaṁ
niruddhaṁ yoga-sevayā
yatra caivātmanātmānaṁ
paśyann ātmani tuṣyati

sukham ātyantikaṁ yat tad
buddhi-grāhyam atīndriyam
vetti yatra na caivāyaṁ
sthitaś calati tattvataḥ

yaṁ labdhvā cāparaṁ lābhaṁ
manyate nādhikaṁ tataḥ
yasmin sthito na duḥkhena
guruṇāpi vicālyate

taṁ vidyād duḥkha-saṁyoga-
viyogaṁ yoga-saṁjñitam

यत्र-ज्या अवस्थेमध्ये; उपरमते-बंद होते (कारण मनुष्याला दिव्य सुखाची प्राप्ती होते); चित्तम्-मानसिक क्रिया; निरुद्धम्-विषयांपासून निवृत्ती; योग-सेवया-योगाभ्यासाद्वारे; यत्र-ज्या; -सुद्धा; एव-निश्‍चितच; आत्मना-विशुद्ध मनाने; आत्मानम्-आत्मा; पश्यन्-स्थितीचा साक्षात्कार होऊन; आत्मनि-आत्म्यामध्ये; तुष्यति-संतुष्ट होतो; सुखम्-सुख; आत्यन्तिकम्-परम; यत्-जे; तत्-ते; बुद्धि-बुद्धीने; ग्राह्यम्-ग्राह्य; अतीन्द्रियम्-दिव्य किंवा इंद्रियातीत; वेत्ति-जाणतो; यत्र-ज्यामध्ये; -कधीच नाही; -सुद्धा; एव-निश्‍चितपणे; अयम्-तो; स्थित:-स्थित; चलति-विचलित होतो; तत्वत:- तत्वापासून किंवा सत्यापासून; यम्- जे; लब्ध्वा-प्राप्ती झाल्यावर; -सुद्धा; अपरम्-इतर काही; लाभम्-लाभ; मन्यते-मानतो; न-कधीच नाही; अधिकम्-अधिक; तत:-त्याहून; यस्मिन्-ज्यामध्ये; स्थित:-स्थित झालेला; -कधीच नाही; दु:खेन-दु:खाने; गुरुणा अपि-जरी अतिशय कठीण असले तरी; विचाल्यते-विचलित किंवा डळमळीत होतो; तम्-त्याला; विद्यात्-तू जाणले पाहिजेस; दु:ख-संयोग-भौतिक संसर्गामुळे होणारे दु:ख; वियोगम्-समूळ नाश किंवा वियोग; योग-संज्ञितम्-योगस्थ समाधी म्हटले जाते.

योगाभ्यासामुळे मनुष्याचे मन जेव्हा सांसरिक मानसिक क्रियांपासून पूर्णपणे संयमित होते, तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असे म्हणतात. या समाधी अवस्थेचे लक्षण आहे की, यामुळे मनुष्य विशुद्ध मनाद्वारे आत्म्याचे अवलोकन करण्यात आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होण्यात व आनंद प्राप्त करण्यात समर्थ होतो. त्या आनंदमय अवस्थेत दिव्य इंद्रियांद्वारे साक्षात्कार झालेल्या अमर्याद दिव्य सुखामध्ये मनुष्य स्थित होतो. याप्रमाणे स्थित झाल्यावर, सत्यापासून कधीच ढळत नाही आणि या सत्याची प्राप्ती झाल्यावर, याहून अधिक श्रेष्ठ असे काही असेल असे त्याला वाटत नाही. अशा अवस्थेमध्ये स्थित झाल्यावर मोठमोठ्या संकटांमध्येही विचलित होत नाही. भौतिक संसर्गामुळे निर्माण होणार्‍या दु:खापासून हीच यथार्थ वास्तविक मुक्ती आहे.

तात्पर्य: योगाभ्यासाद्वारे मनुष्य क्रमाक्रमाने भौतिक संकल्पनेपासून विरक्त होतो. योगतत्वांचे हे प्रमुख लक्षण आहे आणि यानंतर मनुष्य समाधिस्थ होतो अर्थात आत्म्याचे परमात्याशी तादात्म्य न करता, योगी व्यक्तीला दिव्य मन आणि दिव्य बुद्धीद्वारे परमात्म्याचा साक्षात्कार होतो. योगाभ्यास हा थोड्याफार प्रमाणात पतंजली योगपद्धतीवर आधारित आहे. काही अनधिकृत भाष्यकार आत्म्याचे परमात्म्याशी तादात्म्य करण्याचा प्रयत्न करतात आणि अद्वैतवादी यालाच मुक्ती समजतात. परंतु त्यांना पतंजली योगपद्धतीचा वास्तविक उद्देश ज्ञात नसतो. पतंजली योगामध्ये दिव्य आनंदाचा स्वीकार करण्यात आला आहे, पण अद्वैतवादी या दिव्य आनंदाचा स्वीकार करीत नाहीत, कारण अद्वैतवाद धोक्यात येण्याची त्यांना भीती वाटते. ज्ञान आणि ज्ञाता यांच्यामधील द्वैताचा स्वीकार अद्वैतवादी करीत नाहीत; परंतु या श्‍लोकामध्ये, दिव्य इंद्रियांद्वारे अनुभवाला येणार्‍या दिव्य आनंदाचा स्वीकार करण्यात आला आहे. योगपद्धतीचे प्रसिद्ध प्रतिपादक पतंजली मुनी आपल्या योगसूत्रामध्ये (3.34) सांगतात की पुरुषार्थशून्यांना गुणांना प्रतिप्रसव: कैवल्यं स्वरुपप्रतिष्ठा वा चितिशक्तिरिति.

ही चितिशक्ति किंवा अंतरंगा शक्ती दिव्य आहे. पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि शेवटी भगवंतांशी एक होण्याचा प्रयत्न होय. या भगवंतांशी विलीन होण्यालाच अद्वैतवादी कैवल्यम् असे म्हणतात, परंतु पतंजलीनुसार हे कैवल्यम् म्हणजे अंतरंगा किंवा दिव्य शक्ती होय, ज्याद्वारे जीवाला आपल्या मूळ स्वरुपाची जाणीव होते. श्री चैतन्य महाप्रभूंच्या शब्दांत, या अवस्थेला चेतोदर्पणमार्जनम् किंवा मनरुपी मलिन आरसा स्वच्छ करणे असे म्हणतात. हे मार्जन म्हणजेच वास्तविक मुक्ती किंवा भवमहादावाग्निनिर्वापणम् होय. निर्वाणाचा सिद्धांतही प्रारंभिक अवस्थेमध्ये या तत्वांशी मिळताजुळता आहे. श्रीमद्भागवतामध्ये (2.10.6) यालाच स्वरुपेण व्यवस्थिति: असे म्हटले आहे. भगवद्गीतेच्या या श्‍लोकामध्येही याचीच पुष्टी करण्यात आली आहे.

     निर्वाण किंवा भौतिक अंतानंतर आध्यात्मिक क्रियांची किंवा कृष्णभावना म्हटल्या जाणार्‍या भगवत्सेवेची अभिव्यक्ती होते. श्रीमद्भागवताच्या शब्दांत स्वरूपेण व्यवस्थिति: अर्थात, आत्म्याचे हेच वास्तविक जीवन आहे. भौतिक दोषांमुळे दूषित झालेल्या आध्यात्मिक जीवनाच्या अवस्थेला माया असे म्हणतात. याभौतिक विषयांपासून मुक्त होणे म्हणजे जीवाच्या मुळ श्‍वाश्‍वत स्वरुपाचा विनाश नव्हे. या गोष्टीचा स्वीकार पतंजलींनी कैवल्यं स्वरुपप्रतिष्ठा वा चितिशक्तिरिती या शब्दांत केला आहे. ही चितिशक्ती किंवा दिव्य आनंद म्हणजेच वास्तविक जीवन आहे. वेदान्त सूत्रामध्येही (1.1.12) याला आनन्दमयोऽभ्यासात् म्हणून पुष्टी देण्यात आली आहे. हा स्वाभाविक दिव्य आनंद म्हणजेच योगाचे अंतिम ध्येय आहे आणि हा दिव्यानंद भक्तियोगाच्या आचरणाने सहज साध्य होते. भक्तियोगाचे विस्तृत वर्णन भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायात करण्यात येईल.

या अध्यायामध्ये वर्णन केल्याप्रमाणे योगपद्धतीमध्ये संप्रज्ञात समाधि आणि असंप्रज्ञात समाधि असे समाधीचे दोन प्रकार आहेत. जेव्हा मनुष्य तात्विक अन्वेषणांनी दिव्य स्थितीमध्ये स्थित होतो तेव्हा त्याने संप्रज्ञात समाधी प्राप्त केल्याचे म्हटले जाते. असंप्रज्ञात समाधीमध्ये सांसरिक आनंदाशी मुळीच संबंध राहत नाही, कारण या अवस्थेत मनुष्य इंद्रियांपासून  प्राप्त होणार्‍या सर्व प्रकारच्या सुखांच्या पलीकडे गेलेला असतो. योगी एकदा या दिव्य अवस्थेत स्थिर झाला म्हणजे, तो त्यापासून कधीच विचलित होत नाही. जोपर्यंत तो या स्थानाची प्राप्ती करीत नाही तोपर्यंत तो अयशस्वीच राहतो. विविध प्रकारच्या इंद्रियतृप्तींनी युक्त आजचा तथाकथित योगाभ्यास म्हणजे विपर्यासच आहे. संभोग आणि मद्यपान करण्यात मग्न असलेला योगी म्हणजे एक थट्टा आहे. योगसाधनेतील सिद्धीकडे जे योगी आकर्षित होतात ते सुद्धा योगामध्ये पूर्णपणे स्थित नसतात. जर योगिजन, योगाच्या उपफळांनी आकर्षिले गेले तर, या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे, ते पूर्णावस्था प्राप्त करू शकत नाही. म्हणून ज्या व्यक्ती आसनांच्या कसरतीच्या प्रदर्शनात किंवा सिद्धी प्राप्तीच्या मागे लागल्या आहेत,  त्यांनी जाणले पाहिजे की, या प्रकारे त्यांनी योगाभ्यासाचा उद्देश गमावला आहे.

     या युगामध्ये सर्वोत्तम योगपद्धती म्हणजे कृष्णभावना आहे कारण, ती कधीच निष्फळ ठरत नाही. कृष्णभावनाभावित मनुष्य आपल्या कार्यामध्ये इतका सुखी असतो की, तो इतर कोणत्याही सुखाचीआकांक्षा करीत नाही. या दंभग्रस्त युगात हठयोग, ध्यानयोग आणि ज्ञानयोग यांच्या अभ्यासात अनेक विघ्ने येतात; पण कर्मयोग किंवा भक्तियोगाच्या आचरणात अन्य प्रश्‍नच उद्भवत नाही.

     जोपर्यंत भौतिक शरीर अस्तित्वात आहे तोपर्यंत आहार, निद्रा, भय आणि मैथुन या शारीरिक गरजा भगवाव्याच लागतात, परंतु विशुद्ध भक्तियोग किंवा कृष्णभावनेमध्ये स्थित झालेला मनुष्य आपल्या शरीरिक गरजा भागविताना इंद्रियांना उत्तेजित करीत नाही. याउलट वाईट गोष्टीचा चांगला उपयोग करून तो जीवनासाठी अनिवार्य अशाच गोष्टींचा स्वीकार करतो आणि कृष्णभावनेतील दिव्य सुखाचा उपभोग घेतो. अपघात, रोगराई, टंचाई, आपल्या प्रिय नातलगांचा मृत्यू इत्यादी आपत्कालीन घटनांबद्दल तो अनास्था दाखवितो; परंतु भक्तियोग किंवा कृष्णभावनायुक्त आपल्या कर्तव्यांचे पालन करण्यात तो सदैव तत्पर असतो. अपघातासारख्या आपत्तीमुळे तो आपल्या कर्तव्यापासून कधीच विचलित होत नाही. भगवद्गीतेत (2.14) सांगितले आहे की, आगमापायिनोऽनित्यस्तांस्तितिक्षस्व भारत. अशा सर्व आपत्कालीन आपत्तीना तो सहन करतो. कारण त्याला माहीत असते की अशा आपत्ती येतात आणि जातात आणि त्यामुळे आपल्या कर्तव्यांवर त्याचा काही परिणाम होत नाही. याप्रमाणे तो योगाभ्यासातील परमसिद्धी प्राप्त करतो.

« Previous Next »